आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या संसद मार्ग परिसरातल्या संसद भवनाच्या
नवीन इमारतीचं भूमीपूजन करणार आहेत. ही नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल.
२०२२ साली स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी नवीन संसद भवन नवभारताच्या अपेक्षांना
पूर्ण करेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्री भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला
सहभागी होणार आहेत.
****
केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी
नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर
तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी काल फेटाळून लावला.
त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटणं कठीण झाल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या
बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारनं तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी
संघटनांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, हे बदलही शेतकऱ्यांनी नाकारले आहे. त्यावर काल
शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही. तिन्ही कायदे
रद्द करावीत, तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असं पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या
नेत्यांनी सांगितलं.
****
ग्रामीण उपजिविका सुरक्षेच्या दृष्टीने पशुसंवर्धनातील महिला पशुवैद्यकांची
भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं खासदार डॉ.फौजिया खान यांनी म्हटलं आहे. परभणी इथं पशुवैद्यक
महाविद्यालय तसंच भारतीय महिला पशुवैद्यक संघटना यांच्या संयुक विद्यमाने घेण्यात आलेल्या
सोळाव्या राष्ट्रीय ई-परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. या दोन दिवसीय
परिषदेत देशातल्या १८० महिला पशुवैद्यक सहभागी झाल्या असल्याची माहिती डॉ.नितीन मार्कंडेय
यांनी दिली. आज या परिषदेचा समारोप होईल.
****
केंद्र सरकारचं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसंच भारत कृत्रीम
अवयव निर्माण कंपनी यांच्या विद्यमानं लातूर जिल्ह्यातल्या ८ हजार ७९७ दिव्यांगाना
आज उपयोगी साहित्याचं मोफत वाटप केलं. सामाजिक न्यायमंञी थावरचंद गहलोत यांच्या ऑनलाईन
उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल आढावा बैठक घेऊन
कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.
****
No comments:
Post a Comment