Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
राज्य विधिमंडळाचं आजपासून मुंबईत दोन
दिवसीय हिवाळी अधिवेशन; सहा अध्यादेश, तसंच दहा विधेयकं मांडण्यात येणार.
·
अधिवेशनाचा कालावधी कमी करून, सरकार
जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका.
·
इलेक्ट्रिक, एलएनजी तसंच सीएनजीवर चालणारी
वाहनं हे वाहनक्षेत्राचं भविष्य - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी.
·
बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना
१५ डिसेंबरपासून अर्ज करता येणार.
·
राज्यात तीन हजार ७१७ नवे कोविडग्रस्त;
मराठवाड्यात नव्या १७७ रुग्णांची नोंद.
·
परभणी जिल्ह्यात ऑटो आणि ट्रकच्या धडकेत
चौघांचा मृत्यू.
आणि
·
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उस्मानाबादच्या
रुद्राक्ष बिराजदारला सुवर्णपदक.
****
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून
मुंबईत सुरु होत आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. कोविड प्रादुर्भावाच्या
पार्श्वभुमीवर यंदा हिवाळी अधिवेशन, नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला,
त्या अनुषंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या अधिवेशनात सहा
अध्यादेश, तसंच दहा विधेयकं मांडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय
घेण्यात आले, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि बेमोसमी पाऊस, या संकटांशी सामना करत सरकार
मार्गक्रमण करत असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह
मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मराठा समाजाच्या न्याय
हक्काची लढाई पूर्ण ताकदीनं लढली जात असून, आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला
धक्का लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते, गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना,
चहापानाला आमंत्रित केलं होतं. सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं, विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस
यांनी, हे अधिवेशन किमान दोन आठवड्यांचं हवं होतं, असं सांगत, विधिमंडळ अधिवेशनाचा
कालावधी कमी करून, सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची टीका केली. अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांना दिलेलं हेक्टरी २५ हजार तसंच ५० हजार रुपये मदतीचं आश्वासन न पाळत, सरकारनं
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला. कोविड विरुद्धच्या
लढाईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पहायला मिळाला, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची
मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिला सुरक्षा, मेट्रो कारशेड, यासह
विविध मुद्यांवरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीका केली.
****
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये
सामील करण्याचं आश्वासन सरकारनं पाळावं, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते, प्रवीण
दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकर यांनी काल मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची भेट
घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आठ महिने
झाले तरी हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही, याकडे दरेकर यांनी लक्ष वेधलं.
****
इलेक्ट्रिक, एलएनजी तसंच सीएनजीवर चालणारी
वाहनं हे भारतीय वाहनक्षेत्राचं भविष्य असून, यासाठी लागणाऱ्या सुट्या भागाच्या निर्मितीचं
मुख्य केंद्र म्हणून नागपूर विकसित व्हावं, असं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी
यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं हिंगणा औद्योगिक वसाहतीत, केंद्रीय सुक्ष्म लघू
उद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा कामांचा प्रारंभ करताना बोलत होते.
विद्युत वाहनांचा वापर करून खर्चात बचत व्हावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. वाहन
उद्योगांना लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मीती करणाऱ्या कंपन्याना, एक सामायिक सुविधा
या अंतर्गत उपलब्ध होणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी
केलं आहे.
****
केंद्र सरकारनं लागू केलेले तीनही कृषी
कायदे शेतकऱ्यांचा हिताचे असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषी सुधार कायदे
रद्द करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी संघटना करत असले, तरी या मागणीशी आपण सहमत नाही,
येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संसदीय अधिवेशनात, या कायद्यात सुधारणा करण्याची
तयारी सरकारनं दर्शवली असल्याचंही, त्यांनी यावेळी सांगितलं. पुढील वर्षी होणाऱ्या
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणं
शक्य नाही, मात्र तसं झालं तर याचा मोठा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच होईल, असंही
आठवले म्हणाले.
****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांमुळे
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं
आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना
शेतमालाची स्पर्धात्मक विक्री करण्यासाठी परवानगी मिळाली असल्यानं, शेतमालाला जास्तीचा
दर मिळणं शक्य होणार आहे, त्यामुळे या कायद्यांबाबत पसरवले जात असलेले संभ्रम निरर्थक
असल्याचं, पाटील म्हणाले.
****
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेल्या तीन
कृषी कायद्यांसंदर्भात विरोधकांकरून चुकीचा प्रचार सुरू असून, मूठभर दलाल तसंच काळा
बाजार करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल दूर होणं आवश्यक असल्याचं, जळगावचे
खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या प्रवृत्ती हे आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचा खरा चेहरा समोर आणणं,
तसंच या कृषी कायद्यांबाबत वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं, पाटील
यांनी नमूद केलं.
****
कृषी सुधारणा कायद्याबाबत शेतकरी वर्गाला
योग्य आणि खरी माहिती मिळावी, तसंच विरोधी पक्षांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रचाराला
उत्तर देण्यासाठी, केंद्र सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. ‘पुटींग फार्मर्स
फस्ट’, असं पुस्तिकेचं नाव असून, पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका
उपलब्ध आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर
ते चार जानेवारी दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांना, पाच जानेवारी ते १८ जानेवारीदरम्यान अर्ज करता येईल. राज्य मंडळाचे
सचिव डॉ. अशोक भोसले यांनी, प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. खासगी विद्यार्थ्यांना
अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्यानं, या कालावधीत खासगी विद्यार्थ्यांनी
अर्ज भरू नयेत, असं डॉ. भोसले यांनी स्पष्ट केलं.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाला जम्मू
काश्मीरमधल्या नवसेरा भागात देशसेवा करत असताना वीरमरण आलं. मेजर सुरेश रघुनाथ घुगे
असं त्यांचं नाव असून, ते नांदगाव तालुक्यातल्या आस्ते गावाचे मूळ रहिवासी आहेत. घुगे
यांचा पार्थिव देह पुणे मार्गे आस्ते या त्यांच्या मूळ गावी आणला जाणार असून, उद्या
सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
महाराष्ट्रात सर्व जनतेला कोविडची लस
मोफत देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असं आवाहन धर्मनिरपेक्ष
जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष, रेवण भोसले यांनी केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं
बोलत होते. या वर्षी राज्यात चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टी आदी कारणांमुळे सर्वसामान्य
नागरिक अडचणीत आले आहेत, कोविड टाळेबंदीमुळे रोजगारावरही परिणाम झाला होता, याकडे भोसले
यांनी लक्ष वेधलं. अनेक राज्य सरकारांनी ही लस त्या त्या राज्यात मोफत वाटपाचा निर्णय
घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****
मराठी विज्ञान परिषदेच्या ५५ व्या वार्षिक
अधिवेशनात, लातूर विज्ञान केंद्राचे सचिव तथा दयानंद विज्ञान महाविद्यालयातले भौतिकशास्त्राचे
प्राध्यापक, डॉ.अजय महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. विज्ञानाच्या प्रचार
तसंच प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दूरदृश्य पद्धतीनं
झालेल्या या अधिवेशनात, मुंबईतल्या मराठी विज्ञान केंद्राचे पदाधिकारी, सदस्य आणि विज्ञानप्रेमी
मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
राज्यात काल तीन हजार ७१७ नवीन कोविड
बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८० हजार चारशे सोळा
झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे
झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार २०९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक
५६ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार ८३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ५७ हजार पाच रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ४४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७४ हजार
१०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १७७ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल चार, तर नांदेड
जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६७ नवे रुग्ण आढळले,
लातूर ४२, बीड २७, उस्मानाबाद १९, नांदेड जिल्ह्यात १६, परभणी आणि जालना प्रत्येकी
९, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन चार रुग्ण आढळले
****
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं
राज्यव्यापी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यास प्रारंभ केला आहे. ६ डिसेंबर ते २० डिसेंबर
या कालावधीत राज्यभरातून २५ हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचं उद्दीष्ट आहे, लातूर
शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं, त्यात १०१ जणानी
रक्तदान केलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले
यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड परळी रस्त्यावर
ऑटो आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ऑटो मधल्या चार व्यक्तींचा जागीच मृत्यू
झाला. सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम पाटीजवळ काल संध्याकाळी हा अपघात झाला.
हे चारही तरुण अंबाजोगाई इथले असून, सोनपेठ तालुक्यातल्या एका विवाह सोहळ्यातून हे
तरूण अंबाजोगाईला परतत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा इथल्या
रुद्राक्ष विजयकुमार बिराजदार यानं महाराष्ट्र योग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय
योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या
स्पर्धेसाठी राज्याच्या संघातही निवड झाली आहे. उस्मानाबाद जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष
विजयकुमार बेदमुथा, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी रुद्राक्षचं अभिनंदन
केलं आहे.
****
लातूर इथल्या विकासरत्न विलासराव देशमुख
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात, उसाच्या रसापासून निर्मित इथेनॉलचे टँकर विक्रीसाठी
रवाना करण्यात आले. देशातलं साखरेचं अतिरिक्त उत्पादन टाळण्यासाठी तसंच इंधनाची आयात
कमी करण्यासाठी, कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. त्या
आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत यंदा मांजरा कारखान्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल
निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
****
मराठा समाजाला नोकरी तसंच शिक्षणात
आरक्षण मिळावं या मागणीसाठी, नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातल्या सुगाव बुद्रुक
इथल्या नागरिकांनी, आगामी ग्रामपंचायत तसंच अन्य सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथं रुग्ण सेवा सदन उभारणीसाठी
खासदार सुधाकर शृंगारे यांनी ११ लाख रुपये वैयक्तिक देणगी दिली आहे. ही देणगी त्यांनी
पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे यांच्याकडे सुपूर्द
केली. विवेकानंद कर्करोग रुग्णालया शेजारी हे भव्य रुग्णसेवा सदन उभारलं जात आहे. अंदाजे
नऊ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प लोकसहभागातून उभारला जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव मार्गावर
पोलिसांनी एका कारमधून वाहतूक होत असलेला तीन लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला.
काल दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरु होती.
****
औरंगाबाद इथं वीजेच्या मीटरमध्ये फेरफार
करून वीज चोरी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत
या दोघांनी एक लाखांहून अधिक रकमेची वीज चोरी केल्याचं निदर्शनास आल्याची माहिती महावितरण
कंपनीकडून देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथल्या
शिवाजी विद्यालयाचा मुख्याध्यापक बबन झोटे याला एक हजार ८० रुपये लाच घेताना, लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. सहशिक्षकाला भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम
रकमेच्या मंजुरीसाठी झोटे यानं लाच मागितली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात
अल्ताफ सय्यद याच्या विरोधात तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरी
होणाऱ्या शारीरिक तसंच मानसिक त्रासाला कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीला त्यानं तोंडी
तलाक दिला, पत्नीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
****
No comments:
Post a Comment