आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. आज आणि
उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेश, तसंच दहा विधेयकं
मांडण्यात येणार आहेत.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी
आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन केलं असून, सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात
आली.
****
नाशिक शहरात या पुढे वन्य प्राणी आल्यास त्याला पकडणाऱ्या शासकीय यंत्रणेशिवाय
अन्य कोणत्याही प्रकारची गर्दी करण्यास नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीरदृष्ट्या
मनाई केली आहे. शहरातल्या नागरी वसाहतीत एखादा वन्य प्राणी आल्यास तेथे होणाऱ्या गर्दी
मुळे अनेकदा त्या प्राण्याला पकडण्यासाठी संबंधित खात्यांना अडचणी येतात. अलीकडेच पुणे
इथं एका रानगव्याचा मृत्यू झाला होता त्यावेळी देखील बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
नाशिक शहरात अनेकदा बिबटे येत असून त्यावेळी देखील बघ्यांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
****
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असलेल्या बाजार सेस वसुलीच्या जाचक
नियमांच्या विरोधात धान्य व्यापारी संघटनेनं पुकारलेला बंद काल मागे घेतला. बाजार समितीनं
सेस बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानं बंद मागे घेण्यात आला असून, आजपासून
बाजार समिती आवारात घाऊक धान्याचे व्यवहार सुरू होतील, असं धान्य किराणा संघटनेचे अध्यक्ष
प्रफुल्ल संचेती यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधीच्या निमित्तानं कर्मभूमी
नेवासे इथं संत ज्ञानेश्वर माऊलींना काल दीपोत्सवानं अभिवादन करण्यात आलं. यावेळी दिव्यांच्या
प्रकाशाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर उजळून निघाले होते. ज्ञानासह अंतकरणातील ज्योत
ही मनामनात पेटवा असे आवाहन श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज
यांनी यावेळी केलं. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज
देशमुख यांनी आलेल्या संत महंतांचे यावेळी स्वागत केलं.
****
उस्मानाबाद इथं राष्ट्रीय लोक न्यायालयात, सहा हजार ५२३ प्रकरणं ठेवण्यात
आली होती. यापैकी नऊ कोटी ५६ लाख ३२ हजार रुपये रकमेची ९६७ प्रकरणं सामंजस्यानं निकाली
निघाली आहेत.
****
No comments:
Post a Comment