Wednesday, 16 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा रद्द.

·      विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप; विविध नऊ विधेयकं संमत.

·      सर्वोच्च न्यायालयातला मराठा आरक्षणाचा लढा निश्चितच जिंकू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      कोविड चाचणीच्या दरात दोनशे ८० रुपये कपातीची आरोग्य मंत्र्यांची घोषणा.

·      विधीमंडळाच्या एका दिवसाच्या अधिवेशनामुळे जनतेची निराशा - विरोधकांची टीका.

·      राज्याचा कोविडमुक्तीचा दर साडे ९३ टक्क्यांवर; मराठवाड्यात नव्या २६३ रुग्णांची नोंद.

·      ई कॉमर्स कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी.

आणि

·      परभणी जिल्ह्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. हिवाळ्याच्या प्रारंभी कोविड संसर्गात दिसून आलेली वाढ पाहता, हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत, एकमत झाल्याचं जोशी यांनी सांगितलं. येत्या जानेवारी महिन्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येईल, असं जोशी यांनी सांगितलं आहे.

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात विविध अकरा विधेयकं विधानसभेत मांडण्यात आली, यापैकी मुद्रांक शुल्क कपात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांना मुदतवाढ, मुंबई महापालिकेअंतर्गत नागरिकांना मालमत्ता करातून सूट, आदी नऊ विधेयकं विधीमंडळानं संमत केली. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च २०२१ पासून सुरू होणार असल्याचं, विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं.

****

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, सर्वोच्च न्यायालयातला लढा सर्वांच्या सहकार्यातून निश्चितच जिंकू असा विश्वास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना, ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, हा आपला शब्द असल्याचंही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पर्यावरणाचं संरक्षण करतानाच विकासाला प्राधान्य राहील असे सांगून, वन्यजीव असलेल्या जंगलाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या ‘धारावी मॉडेल’चं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनं केल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. कोरोनाची लस अद्याप आली नसल्यानं पुढील काळातही दक्षता घेण्याची गरज, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेत बालताना, केंद्र सरकारकडून मोठ्या निधीची अपेक्षा असताना निधी मिळत नाही, पीक विम्याबाबत केंद्राची भूमिका महत्त्वाची होती, पण कंपन्यांवर विम्याबाबत सक्ती करण्यात आली नाही, याकडे लक्ष वेधलं. मराठा आरक्षण प्रकरणी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं स्पष्ट करत, याप्रकरणी विनाकारण संभ्रम निर्माण करुन, ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र उभं केलं जात असल्याचं सांगितलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या कोविड परिस्थितीबाबत सदनाला माहिती दिली. कोविड चाचणीच्या दरात आणखी दोनशे ८० रुपये कपात करून या चाचणीचा दर ७०० रुपये करत असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केलं. कोविड उपचारांसाठी रुग्णालयांनी रुग्णांकडून अधिकचे घेतलेले कोट्यवधी रुपये, रुग्णांना परत केल्याची माहिती त्यांनी दिली.

****

विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाची मांडलेली सूचना, सभापतींनी फेटाळून लावल्यानं विरोधकांनी घोषणाबाजी केली. आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारं काळ्या रंगाचं कापड परिधान केलं होतं, ते कापड काढण्याचे निर्देश सभापतींनी दिले. जागतिक शिक्षक पुरस्कार मिळालेले सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा अभिनंदन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. डिसले गुरूजी यांना विधान परिषदेचं सदस्यत्व द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली तर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी डिसले गुरूजींना आगाऊ दोन वेतनवाढी देण्याची मागणी केली.

****

या एका दिवसाच्या अधिवेशनामुळे राज्यातल्या जनतेची निराशा झाली असून, कुठलीही घोषणा या अधिवेशनात झाली नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी, अधिवेशनाच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना केली. मराठा आरक्षणाबाबत सरकार संभ्रमित आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याची टीका, फडणवीस यांनी यावेळी केली.

****

पुण्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठीच्या विधेयकावरून विरोधकांनी औरंगाबाद इथं घोषीत क्रीडा विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी, औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ तसंच वाळूजला क्रीडांगण व्हावं, अशी मागणी लावून धरली. या संदर्भात चार वर्ष पाठपुरावा करून औरंगाबाद इथं जागा सुद्धा देण्यात आली असल्याकडे बंब यांनी लक्ष वेधलं.

****

महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रस्तावित शक्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी २१ सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढच्या अधिवेशनात या विधेयकावर चर्चा केली जाणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन मराठवाडा विभागीय माहिती संचालक गणेश रामदासी यांनी केलं आहे. 

****

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर केलेली आरक्षण सोडत रद्द करणार असल्याचं, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं, ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार थांबावा, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

दरम्यान, आरक्षण सोडत रद्द करून, निवडणुकीनंतर नव्यानं सोडत काढण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विधानसभेत याबाबतच्या चर्चेदरम्यान सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेस आणि डावे पक्ष अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नव्या कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आपण स्वत: हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं, दानवे यांनी स्पष्ट केलं. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाला सुधारित शेतकरी कायदे पूरक असल्याचं मत, त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यात काल तीन हजार ४४२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८६ हजार ८०७ झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ३३९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका आहे. काल चार हजार ३९५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ६६ हजार १० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ६० शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७१ हजार ३५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २६३ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात पाच, औरंगाबाद जिल्ह्यात दोन, तर जालना तसंच परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ९३ नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात ५२, जालना ३७, लातूर २९, उस्मानाबाद २४, परभणी १५, नांदेड ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन दोन रुग्ण आढळले.

****

लातूर महानगरपालिकेनं शहरात तीन नवी स्वॅब तपासणी केंद्र सुरू केली आहेत. शहरात सध्या एकच तपासणी केंद्र चालू होतं, महापालिकेला दररोज एक हजार १५० चाचण्या करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. त्यामुळे अधिक रुग्ण असणाऱ्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात, ही नवी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भारतीय कापूस निगमच्या कापूस खरेदी केंद्रावर दररोज दीडशेहून अधिक वाहनांमध्ये कापूस विक्रीसाठी येत आहे. मार्केट यार्डात उभ्या असलेल्या ७०० अधिक वाहनांमधल्या कापसाची खरेदी प्रलंबित आहे. मार्केट यार्डात वाहने उभी करण्यास जागा शिल्लक नसल्यानं, तसंच खरेदी झालेल्या कापसाचे जिनिंग बाकी असल्यानं, शेतकऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीस आणू नये, असं आवाहन बाजार समितीकडून करण्यात आलं आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे चार लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली आहे.

****

ई कॉमर्स कंपन्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं केली आहे. या मागणीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीचं निवेदन, महासंघानं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याकडे काल सादर केलं. या कंपन्यांनी कायद्यातल्या अनेक पळवाटा शोधून किरकोळ व्यापार ताब्यात घेत, केंद्र शासनाच्या लोकल फॉर व्होकल तसंच आत्मनिर्भर भारत संकल्पनेलाच आव्हान दिलं असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे. ई कॉमर्स कंपन्यांमुळे देशातला किरकोळ व्यापार उद्धस्त होत आहे, याकडे महासंघानं लक्ष वेधलं.

****

परभणी इथली एक व्यक्ती काल जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात वाहून गेली. रब्बी पिकांना पाणी पाळ्या देण्यासाठी या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. काल दुपारी एक व्यक्ती कालव्यात उतरली असता, तोल जाऊन वाहून गेली. नागरिकांनी प्रयत्न करूनही, या व्यक्तीचा शोध लागला नाही.

****

हिंगोली तालुक्यात दुर्ग धामणी शिवरात अज्ञात आरोपींनी केलेला रेती साठा, हिंगोली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी काल जप्त केला. या साठा सुमारे ४०० ब्रास एवढा असून, याची किंमत साधारणपणे पन्नास लाख रुपये असल्याची माहिती माचेवाड यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात करप्या रोगानं नुकसान झालेल्या तूर पिकाचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं. उपलब्ध असणारं पाणी शेतीला देता यावं, याकरता वीजपुरवठ्यासाठी रोहित्रं उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही निलंगेकर यांनी केली.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी केलं आहे. 

****

परभणी जिल्ह्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकानं काल अटक केली. गणेश पांचाळ, गोविंद आबूज, सचिन बनसोडे, आणि किशोर तोष्णीवाल अशी या चौघांची नावं असून, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेट लीग सामन्यांवर, ते लोकांकडून सट्ट्यावर पैसे लावून घेत असल्याचं दिसून आलं. त्यांच्याकडून पथकानं दहा मोबाईल, तीन मोटरसायकल असा एकूण तीन लाख आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा विधानसभा मतदारसंघात बिनविरोध निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना, २१ लाख रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा, आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. यासाठी निवडणूका होणाऱ्या गावांचे दौरे करून, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत, अल्पसंख्यांकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत, ऑनलाईन, वेबिनार पध्दतीनं व्याख्यानं, चर्चासत्रं घेण्याची सूचना राज्यशासनानं केली आहे, या सूचनानुसार अंमलबजावणीचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी दिले आहे.

****

कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना वनविभागाचं सुवर्ण पदक जाहीर झालं आहे. धुळे वनविभागात काम करताना वन्यजीव सुरक्षा, अवैध लाकूडतोडीला प्रतिबंध, वनालगत असलेल्या सर्व गावांमध्ये एलपीजी गॅस वाटप तसंच इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांना हे सुवर्णपदक जाहीर झालं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत एक वृद्ध आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. तसंच काही जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी वन मंत्री राठोड यांची भेट घेतल्यानंतर राठोड यांनी संबंधितांची विधान भवनात बैठक घेऊन हे निर्देश दिले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...