Sunday, 13 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा शुभारंभ.

·      शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा निर्णय अन्यायकारक - शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची टीका.

·      कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत.

·      दिव्यांग सहाय्यक उपकरणं मोफत वाटपासाठीच्या ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण.

·      पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं काल राज्यभरात निदर्शनं.

·      वीरशैव साहित्याचे अभ्यासक, शांतितीर्थ स्वामी यांचं निधन; आज चाकूर इथं अंत्यसंस्कार.

आणि

·      राज्यात काल ४ हजार २५९ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २७४ रुग्णांची नोंद.

****

महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते. एक हजार ६८०कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख गृहीत धरुन तयार केली जात आहे. या योजनेच्या कोनशिलेचं अनावरण आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारक, शहरालगत मिटमिटा परिसरात सफारी पार्क, तसंच औरंगाबाद शहरातल्या १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केली असल्याचं सांगितलं.

प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो, पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सकाळीच मी सूचना देऊन आलेलो आहे या शहराच्या गुंठेवारी बाबतीमध्ये आणि तो ही प्रश्न लवकरात लवकर मी तुम्हाला सोडवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग गुंठेवारीचा प्रश्न असेल, सिडकोतल्या घरांचा प्रश्न असेल, मालकी हक्काचा प्रश्न असेल सूचना दिलेल्या आहेत.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारकात फक्त बाळासाहेबांचा पुतळा नसेल, तर हे स्मारक पाहून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडेल, असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले –

शिवसेना प्रमुखांचं स्मारक त्यांच्या या लाडक्या शहरामध्ये होतंय. पण नुसता पुतळा नाही उभा करणार. जे शिवसेना प्रमुखांनी प्रत्यक्ष त्यांच्या हयातीमधे संभाजीनगरला दिलं तेच प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रीयत्व सांगणारे विचार ते देणारं ते स्मारक असेल. नुसता पुतळा नसेल. तर त्यांचे विचार तिकडे गेल्यानंतर एक बाहेर पडणारं माणूस त्याला एक हिंमत मिळेल, त्याला आत्मविश्वास येईल. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे त्याच्यामुळे कळेल.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची गेल्या आठवड्यात पाहणी केली, आणि येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत शिर्डीपर्यंतचा टप्पा पूर्ण करण्याची सूचना आपण संबंधितांना दिली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात स्मरण करून दिलं. औरंगाबाद शहरात काल शुभारंभ झालेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपण कधीही येऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पैठण शहराचाही पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले –

भाग्य मिळत असेल श्रीखंड्या होण्याचं आणि माझ्या कावडीनं जर का कोणाच्या घरामधे पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल, तर तेही पुण्य मी म्हणेल त्याला सुध्दा एक भाग्य लागतं. नाथांची आठवण काढल्यानंतर संदीपान म्हणाले साहेब आमच्याकडे काय? पैठणला पाणी नाही. म्हणलं थांबा जरा कावड घेऊन तुमच्याकडे पण येतो. तुमच्याही पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि सोडवणार.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या या समारंभाला राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाणीपुरवठा योजनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विमानतळ परिसरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला थकीत पगाराच्या मागण्यांचे फलक दाखवले. राज्य कामगार कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अभय टाकसाळ याच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी काल पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं.

व्हिडियोकॉन ग्रुप एमप्लाईज युनियनच्या वतीनंही काल उद्योगमंत्री तथा पालकमंत्री देसाई यांना निवेदन देण्यात आलं. वेतनाच्या मागणीसाठी हे कामगार गेल्या ४७३ दिवसांपासून साखळी उपोषण करत असल्याकडे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं.

****

माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा राज्य शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं केली आहे. या निर्णयाचा सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत असल्याचं, संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी म्हटलं आहे.

मान्यताप्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित शाळांमधले नाईक, पहारेकरी, रात्रीचे पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील, असं शिक्षण विभागानं आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.

हा शासन निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणे अपेक्षित होतं, असं खांडेकर यांनी म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून या यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या २५जानेवारीपासून होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी सरकारने सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखावी, अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी सात किंवा नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी सरकारनं करायला हवी होती, असंही मेटे यांनी नमूद केलं.

****

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत असून, अधिवेशनात दोन दिवस कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते, गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना आज सायंकाळी चहापानासाठी आमंत्रित केलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ पैकी आठ नावांवर आक्षेप घेत दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, ही आठ नावं निव्वळ राजकीय पार्श्वभूमीचे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावरची पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार असून, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****

राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठीच्या ‘महाशरद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण काल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड इथून सहभागी झाले. या माध्यमातून २९ लाख दिव्यांगापर्यंत विविध सहाय्यक उपकरणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या ‘ई-बार्टी’ या मोबाईल अँपचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं.

****

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल राज्यभरात शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं करण्यात आलं.

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. लातूर इथं जिल्हा प्रमुख नामदेव चाळक यांच्या नेतृत्वात, बीड इथं युवानेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत, हिंगोली इथं जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात तर परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातही परंडा, कळंब, उमरगा इथं शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा या सर्वच ठिकाणी निषेध करण्यात आला. लातूर इथं दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारुन दहन करण्यात आलं. जालना इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. नांदेड इथंही दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.

नंदुरबार आणि शहादा शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या ढकलत नेत, तर सोलापुरात सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यवतमाळ, अमरावती, बुलडाणा इथंही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून इंधन दरवाढीविरोधात निदर्शनं केली.

****

अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक, शांतितीर्थ संगय्या स्वामी चाकूरकर यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं रेणुका विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी यांनी कपिलधार मासिकाचे संपादक म्हणून काम करतानाच, वीरशैव साहित्यातली असंख्य हस्तलिखितं, पोथ्या, पुस्तिका, ओव्या, अभंग, आरत्या, पदं तसंच भारूडांचा मोठा संग्रह केला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वाराणसी इथं झालेल्या चौथ्या वीरशैव साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं, त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना काशी महापीठाचा ‘डॉ चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर अआज सकाळी लातूर जिल्ह्यात चाकूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी इथं गोपीनाथ गडावर काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबीराचं उद्धाटन केलं. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार मोनिका राजुळे, आमदार चित्रा महाले पाटील यांच्यासह हजारो मुंडे समर्थकांनी काल गोपीनाथगडावर मुंडे यांना अभिवादन केलं.

लातूर आणि औसा इथं गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं, आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

राज्य सरकारनं कालपासून सुरू केलेली शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणजे मनरेगातून ग्रामविकासाच्या औसा पॅटर्नची राज्यव्यापी आवृत्ती असल्याचं, आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. १३ ऑक्टोबर रोजी औसा इथं जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत औसा पॅटर्नची संकल्पना मांडली होती, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. जुन्या विहिरींचं मनरेगाअंतर्गत पुनर्भरण करता यावं यासाठी लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

राज्यात काल चार हजार दोनशे एकोणसाठ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख शहात्तर हजार सहाशे नव्व्याण्णव झाली आहे. काल ८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार एकशे एकोणचाळीस झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार नऊशे एकोणपन्नास रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख त्रेपन्न हजार नऊशे बावीस रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७३ हजार पाचशे बेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २७४ रुग्णांची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात काल तीन कोविडग्रस्तांचा, औरंगाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा, तर जालना, लातूर आणि परभणी इथं प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ५७ कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ५८, बीड ५३, लातूर ३८, जालना २७, परभणी २४, उस्मानाबाद १५ तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे कोविडबाधित रुग्ण आढळले.

****

कर्करोग प्रतिबंधासाठी अधिक संशोधन आणि नवीन निदान पद्धतींचा शोध घेणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात 'न्यू इलेक्ट्रा वर्सा एचडी' या अत्याधुनिक यंत्राचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यंत्राद्वारे कर्करोगाच्या अतिसूक्ष्म गाठी शोधता येणार असून, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय, सोप्या पद्धतीने कर्करोगाचं निदान होणार आहे

****

कोविड महामारीचा सामना करण्यासाठी देशभरातल्या धार्मिक, सामाजिक, तसंच स्वंयसेवी संस्थानी जे सेवा कार्य केलं, ते जगातल्या इतर कोणत्याही देशात झालेलं नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे. लातूर इथं संघाच्या जनकल्याण समितीअंतर्गत संवेदना प्रकल्पाच्या बहुद्देशीय इमारतीचं उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. संवेदना प्रकल्पाला १४ वर्ष पूर्ण होत आहेत, या १४ वर्षातल्या ठळक घटनांचं लिखाण करुन ठेवण्याची सूचनाही भैयाजी जोशी यांनी यावेळी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 28 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...