Thursday, 8 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** राज्यातले निर्बंध शिथील करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दोन दिवसांत निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

** राज्याचा लस पुरवठा वाढवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री सकारात्मक- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

** बीडमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ७११ रुग्ण तर औरंगाबादमध्ये २१ रुग्णांचा मृत्यू

आणि

** राज्यात महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याची भारतीय जनता पक्षाची टीका

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात लागू निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात पंढऱपूर इथं या संदर्भात मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पवार यांनी हा दौरा आयोजित केला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

****

राज्याला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींचा पुरेसा पुरवठा होत नसून आपण यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्याला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असून सध्या आठवड्याला केवळ साडेसात लाख लसींची मात्रा उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात या संसर्गाच्या साडेचार लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संसर्गामुळे ५७ हजार मृत्यू झाल्याचं ते यावेळी म्हणाले. रेमडीसीवर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपण आज चर्चा करणार आहोत तसंच राज्यातल्या प्राणवायूच्या पुरवठ्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार १५ एप्रिल नंतर साडेसात लाखाऐवजी १७ लाख लसींची मात्रा पाठवणार असलं तरी ते देखिल पुरेसं नाही, असं टोपे म्हणाले.

****

बीड जिल्ह्यात आज ७११ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये  बीड १८९, अंबाजोगाई १५८, आष्टी १०२, माजलगाव ५६, गेवराई ५४, केज ४५,परळी ४४ पाटोदा २२, शिरुर १६, वडवणी १४ आणि  धारुर इथल्या ११  रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज २१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये १९ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील असून दोन रुग्ण हे जालना जिल्ह्यातील आहेत. या विषाणू ससर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक हजार ८९२ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२ हजार ७३८ झाली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाची राज्यातली गंभीर आणि भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्यानं, सामूहिकपणानं आपण सामोरं गेलंच पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केलं आहे. याला आता पर्याय राहिलेला नसून नाईलाजानं या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे नमुद केलं आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षीची संसर्गाची आकडेवारीही त्यांनी मांडली. त्यामध्ये औरंगाबादला गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या दहा हजार ५८ होती ती या महिन्यात २७, ८२१ असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.

****

देशात रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असल्यामुळे सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र, तसं मुद्दाम होऊ दिलं जात नसून महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतल्या काही लोकांची इच्छा दिसते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष व्यक्त होत आहे. विरोधी विचारांचं सरकार असल्यानं राज्याला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे. राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली आहे.

****

उच्च न्यायालयानं बाजू ऐकून न घेताच चौकशीचे आदेश दिल्यासंदर्भात दाद मागणारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. एक नागरीक म्हणून वैयक्तिक अधिकाराचा भंग या आदेशांमुळे झाल्याचं देशमुख यांनी या याचिकेत नमुद केलं होतं. ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. परमबीर सिंह यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असून, केंद्रीय अन्वेषण विभागानं या प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, त्या आधारे अन्वेषण विभागाचे संचालक पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

राज्यात महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ते आज दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी ही वास्तविक स्वरूपात महावसुली आघाडी असून त्याचं काम फक्त पोलिसांच्या मदतीनं पैसे वसुली करणं इतकच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवसेना पक्ष सत्य लपवायचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अटकेतले निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचं दिसत असून या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.

****

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याच्या अभियाना अंतर्गत दूध आणि  दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा आदी बाबींचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते यांच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या असून संबंधितांनी कोविड - १९ च्या शासनानं दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचंही केदार यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरणातल्या  रुग्णांच्या देखरेखीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय पथक प्रमुख डॉ. अभिजीत पाखरे यांनी केल्या आहेत. त्यांनी आज औरंगाबादमध्ये कोवीड उपचार केंद्रांना भेट देऊन पहाणी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन केलं. संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी या संसर्गावरच्या प्रतिबंधात्मक नियमावली संदर्भात जनजागृती करावी तसंच लोकांकडून नियमांचं पालन प्रभावीरित्या करुन घ्यावं संसर्गासाठीच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. खासगी रुग्णालयांकडून शासनानं ठरवून दिलेल्या दरानच उपचार होणं बंधनकारक असून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहीमेची अमंलबजावणी व्हावी, असं डॉ. पाखरे म्हणाले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसंच अन्य प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी झाले. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्याच्या अभियानामध्ये लागू निर्बँध हे टाळेबंदीच असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीनं याला विरोध केला आहे. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर केलं असून दुकानं उघडण्याचा इशारा दिला आहे. 

****

नांदेड - पनवेल ही विशेष रेल्वे ३१ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणचे काम सुरु असल्यामुळे ही रेल्वे रद्द् करण्यात आली असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

//********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...