Thursday, 24 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये भारताने ३० कोटीचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या तीस कोटी नऊ लाख ६९ हजार ५३८ मात्रा देण्यात आल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला करणार असल्याचं, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे राज्य निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार आहेत.

****

आगामी काळातल्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं बोलत होते. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, असं त्यांनी नमूद केलं.

****

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा आढावा, भविष्यातील वाटचालीसाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या सूचना तसंच अपेक्षा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आजपासून परिवार संवाद अभियान राबवण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून या अभियानाची सुरुवात करणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या पणन महामंडळाच्या मालकीच्या केळी प्रक्रिया केंद्रातील विद्युत संयंत्रातील तांब्याची तार, आणि ऑईल, असा पाच लाख २३ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. हा प्रकार १७ जून रोजी घडला असून, या प्रकरणी काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

****

No comments: