Sunday, 22 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरण शिबीरं भरवण्याची डॉ नीलम गोऱ्हे यांची घोषणा

** ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामीने यांचं आज सकाळी नाशिक इथं निधन

** हुतात्मा सुधाकर शिंदे यांच्या पार्थिव देहावर नांदेड जिल्ह्यात बामणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आणि

** रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं साजरा

****

स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरणाची शिबीरं भरवण्यात येणार असल्याचं, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. प्राथमिक स्तरावर मुंबई, पुणे आणि औरंगाबाद मध्ये पुढच्या आठवड्यापासून ही शिबीरं सुरू होणार असल्याचं, डॉ गोऱ्हे यांनी सांगितलं. 'स्वयंसिद्धा भाग दोन' या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यामध्ये कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षित असलेल्या मदतीसंदर्भात सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. कामगार सेनेच्या माध्यमातून हजारोंना रोजगार उपलब्ध करून देणारे शिवसेना उपनेते, रघुनाथ कुचिक यांना गोऱ्हे यांनी राखी बांधून त्यांचा सत्कार केला. सैन्य दल, पोलीस विभागासोबत विविध सुरक्षा दलाच्या माध्यमातून कार्यरत असलेले तमाम रक्षणकर्ता भाऊ बहिणींचे देखील डॉ गोऱ्हे यांनी आभार मानले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनऊ इथं कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याण सिंह यांच्या कार्याला उजाळा देताना, कल्याण सिंह यांनी जनकल्याण हाच आपल्या आयुष्याचा मंत्र मानला असं मोदी यांनी नमूद केलं. कल्याण सिंह यांनी राष्ट्र उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं अशा शब्दात मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. कल्याण सिंह यांचं काल लखनऊ इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुलंदशहर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

अफगाणिस्तानवरून १०७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचं एक विशेष विमान आज पहाटे दिल्लीत दाखल झालं. १६८ नागरिकांना घेवून भारतीय वायू सेनेचं C-17 हे विमान काबूलहून गाजियाबादच्या हिंडन इथल्या वायु सेनेच्या तळावर उतरलं. ज्यामध्ये १०७ भारतीय आणि उर्वरित अफगान शीख तसंच हिंदू सहभागी आहेत. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत. यासर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

****

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी  शहरातल्या पारनाका इथंल्या बाजारपेठेत एका इमारतीच्या तळमजल्याला आज भीषण आग लागल्याने, या आगीत कपड्यांची चार दुकानं खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

****

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२१ व्या  जयंती दिनानिमित्ताने सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केलं. शासनाच्या कृषि विभागासह विविध संस्था, संघटनांनी कृषी विषयक कार्यक्रम केले. कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन न करता प्रवरा परिवाराच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं पद्मश्री विखेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेकांनी विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली.

****

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामीने यांचं आज सकाळी नाशिक इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. साहित्याच्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या महामीने यांनी विनोदी एकांकिका, नाटके, कथा अशी सुमारे शंभर पुस्तकं लिहिली. राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, ताराराणी मोडक पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक  वाचनालयाचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. खाणावळ ते लिहिणावळ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

छत्तीसगडच्या नारायणपूर इथं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले सहाय्यक समादेशक सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालक्यातल्या बामणी इथं शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हुतात्मा सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

****

बहीण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सर्वत्र पारंपारिक पद्धतीनं साजरा होत आहे. बहीण भावाला राखी बांधून औक्षण करत, मांगल्याची कामना करते, तर भाऊ सुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन, संरक्षणाचं तसंच सर्व परिस्थितीत साथ देण्याचं वचन देतो. आज घरोघरी हा सोहळा साजरा झाला.

 

परभणी जिल्हयात वृक्षवंदन-रक्षाबंधन या सप्ताहाचे ३० ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आलं आहे. आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हा उपक्रम राबवण्यात आला. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह अनेकांनी झाडांना राख्या बांधल्या. वृक्षाला आपण राखी बांधून, लहानपणी त्यांचे संवर्धन करू. हेच वृक्ष भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणार आहेत, वृक्षास प्रतिकात्मकरित्या राखी बांधून वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्या बांधून घेत आहोत, असं सांगत, डॉ ढवण यांनी, सर्व नागरिकांना वृक्ष संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

 

परभणी इथं शेक हॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने टाकळगव्हाण इथल्या सीमा गणेश वाकुडे या भगिनीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेळी देण्यात आली. दोन मुली आणि एक मुलगा असलेल्या सीमा वाकुडे यांच्या पतीचं हृयविकाराने निधन झालं असून, त्या रोजंदारी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.

 

नांदेड शहरातील सिडको परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून औक्षण करण्यात आलं यावेळी जवानांनी महिलांना तुळशीची रोपं भेट म्हणून दिली.

 

औरंगाबाद इथे सिडको भागातल्या प्रियदर्शनी उद्यानात वृक्षप्रेमी नागरिकांच्या वतीने झाडांना राख्या बांधण्यात आल्या.

****

नांदेड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले ५ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आज पर्यत ९० हजार ७२२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोविडमुक्त झाल्याने ५ रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २ हजार ६६१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

//********//

No comments: