Monday, 23 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मनमाड-नांदेड-लोहमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचं काम प्राधान्यानं मार्गी लावण्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं आश्वासन

·      आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सप्ताहाला आजपासून प्रारंभ

·      हिंगोली जिल्ह्यात १८ ते २० गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

·      राज्यात चार हजार १४१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ९८ बाधि

·      औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आवाहन

णि

·      परभणी जिल्ह्यात वृक्षवंदन-रक्षाबंधन सप्ताहाचं आयोजन

****

मनमाड-नांदेड-लोहमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचं काम आपण प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याचं आश्वासन, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. काल जालना रेल्वे स्थानकाजव रेल्वे भुयारी पुलाच्या कामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई-नागपूर जलदगती रेल्वे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यालाही रेल्वे विभागाचं प्राधान्य असल्याचं, दानवे यांनी सांगितलं. कोरोना काळात रेल्वे विभागाला सुमारे ३६ हजार कोटी रुपये तोटा झाला आहे. त्यामुळे जालना-खामगाव, सोलापूर-औरंगाबाद यासरख्या नवीन रेल्वे मार्गांची व्यवहार्यता तपासूनच, पुढील निर्णय घेण्याची रेल्वे विभागाची सध्या भूमिका असल्याचं, त्यांनी सांगितलं. जालना शहरात होणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभही काल मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कुंडलिका नदीवरच्या नवीन आणि जुना जालन्याला जोडणाऱ्या नवीन पुलाचं लोकार्पणही दानवे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

****

आझादी का अमृतमहोत्सव या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपासून २९ ऑगस्टपर्यंत विशेष सप्ताहाचं आयोजन केलं असून, विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्तविभाग धरोहर, निशान आणि अपराजिता सारखे विविध कार्यक्रम या निमित्ताने श्रोत्यांना ऐकवणार आहे. प्रादेशिक वृत्त विभाग पाच मिनिटांचे विशेष कार्यक्रम सादर करतील. पत्रसूचना कार्यालय याविषयी एक संकेतस्थळ सुरू करणार आहे तर ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन, अर्थात बीओसी घटनेची संरचना यावर ई-बुक प्रकाशित करणार आहे. तसेच बीओसी ७५ विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. यामध्ये स्वातंत्र्यसंग्रामातील अपरिचित वीरांच्या कथा, विविध क्षेत्रात भारतानं गाठलेली यशशिखरे, कोविड१९ प्रतिबंधक लसीबाबत जागरूकता आणि २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक्स मधील भारताची यशोगाथा याविषयी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या १८ ते २० गावांमध्ये काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक चार रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. काल पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पहिला, तर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दुसरा धक्का जाणवला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

****

राज्यात काल चार हजार १४१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख २ हजार ५१ झाली आहे. काल १४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३५ हजार ९६२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ७८० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९ टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५३ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ९८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३१ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात २७, लातूर २१, औरंगाबाद १३, नांदेड पाच, तर जालना जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

तेल कंपन्यांनी काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २० पैसे कपात केली आहे. पेट्रोलच्या दरातील गेल्या महिनाभरातली ही पहिलीच कपात आहे. कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतीलिटर १०१ रुपये ६४ पैसे, तर डिझेलचे दर प्रतीलिटर ८९ रुपये सार पैसे इतके झाले आहेत.

****

भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परिक्षा येत्या गुरुवारी २६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दोन सप्टेंबर पर्यंत ही परिक्षा चालणार असून, देशभरातून सुमारे ९२ हजारांहून अधिक विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत.

****

औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. औेरंगाबाद इथं काल सर्व उद्योग संघटना आणि औरंगाबाद फर्स्टच्या वतीनं कराड यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहराचा पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचं कराड यांनी यावेळी नमूद केलं.

****

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामीने यांचं काल सकाळी नाशिक इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. साहित्याच्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या महामीने यांनी, विनोदी एकांकिका, नाटकं, कथा अशी सुमारे शंभर पुस्तकं लिहिली. राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, ताराराणी मोडक पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक  वाचनालयाचा जीवन गौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. खाणावळ ते लिहिणावळ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्यावर काल नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

छत्तीसगडमध्ये नारायणपूर इथं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले सहाय्यक समादेशक सुधाकर शिंदे यांच्या पार्थिव देहावर, काल नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालक्यातल्या बामणी इथं शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हुतात्मा सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

****

बहीण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण काल सर्वत्र पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. बहीण भावाला राखी बांधून औक्षण करत, मांगल्याची कामना करते, तर भाऊ सुद्धा बहिणीला भेटवस्तू देऊन, संरक्षणाचं तसंच सर्व परिस्थितीत साथ देण्याचं वचन देतो. काल घरोघरी रक्षाबंधनाचा हा सोहळा साजरा झाला.

 

परभणी जिल्ह्यात वृक्षवंदन-रक्षाबंधन या सप्ताहाचं ३० ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आलं आहे. काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हा उपक्रम राबवण्यात आला. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह अनेकांनी झाडांना राख्या बांधल्या. वृक्षाला आपण राखी बांधून, लहानपणी त्यांचं संवर्धन करू, हेच वृक्ष भविष्यात पर्यावरणाचं रक्षण करणार आहेत, वृक्षास प्रतिकात्मकरित्या राखी बांधून वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्या बांधून घेत आहोत, असं सांगत, डॉ ढवण यांनी, सर्व नागरिकांना वृक्ष संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

 

परभणी इथं शेक हॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने टाकळगव्हाण इथल्या सीमा गणेश वाकुडे या भगिनीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेळी देण्यात आली. दोन मुली आणि एक मुलगा असलेल्या सीमा वाकुडे यांच्या पतीचं हृयविकाराने निधन झालं असून, त्या रोजंदारी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.

 

नांदेड शहरातील सिडको परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं अग्निशमन दलाच्या जवानांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून, औक्षण करण्यात आलं. यावेळी जवानांनी महिलांना तुळशीची रोपं भेट म्हणून दिली.

 

औरंगाबाद इथे सिडको भागातल्या प्रियदर्शनी उद्यानात वृक्षप्रेमी नागरिकांच्या वतीनं झाडांना राख्या बांधण्यात आल्या.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे.

यानिमित्त आज सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार, उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश दापके, आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी कार्यरत राहिलेले, मोहम्मद अब्दुल रज्जाक मोहम्मद अब्दुल जब्बार, यांना प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी साडेदहा वाजता हा मुख्य समारंभ होणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी, आणि विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार, तसंच आदर्श परीक्षा केंद्र पुरस्काराचं वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात काल दुचाकी आणि पाण्याचा टँकर यांच्या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला. पूर्णा -ताडकळस रस्त्यावर कानडखेड शिवारात हा अपघात झाला. पुर्णा तालुक्यातल्या खुजडा इथले ज्ञानेश्वर भालेराव काल रक्षाबंधनानिमित्त बहिणीकडे जात असताना, रस्त्यावर उभ्या टँकरवर त्यांची मोटारसायकल आदळली, या अपघातात ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेला पाच वर्षीय मुलगा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला.

****

नांदेड शहर आणि जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा उद्या २४ ऑगस्ट रोजी नांदेड इथं सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी शहरातल्या मुख्य रस्त्यांसह अनेक वस्त्यांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं, शहरातल्या शिवाजी चौक आणि गांधीपार्क इथंल्या रस्त्यावर पडलेले खड्डे स्वःखर्चाने बुजवत आंदोलन करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणात सध्या ७५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पाण्याची अवक अशीच सुरू राहिल्यास धरणातून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडावं लागेल, त्यामुळे संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन पूर नियंत्रण अधिकारी एच. एस. धुळगंडे यांनी, पुसद, उमरखेड, महागाव, कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जालना जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात नदी-नाल्यांना पाणी वाहत आहे. जालना तालुक्यातल्या गोलापांगरी शिवारात दुधना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

नांदेड जिल्ह्यात काल सरासरी १४ मिलीमीटर पाऊस झाला. मुखेड आणि नायगाव या दोन तालुक्यात मुसळधार तर बिलोली, मुदखेड, हदगाव, ऊमरी, देगलूर, हिमायतनगर या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. औरंगाबाद शहर परिसरात काल पावसानं उघडीप दिल्यानं तीन दिवसांनंतर सूर्यदर्शन झालं.

****

हवामान

राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments: