Monday, 23 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद - दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजीचे सकाळी ११.०० वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय मानक संस्थेनं हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे सोन्याची शुद्धता तपासणी करण्याच्या पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ, राज्यभरातल्या सुवर्णकारांनी आज एक दिवसाच्या लाक्षणिक संप पुकारला आहे. हॉलमार्किंग पद्धतीतले बदल चुकीचे आणि असंवैधानिक असल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केला आहे. सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले, त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार आहे असं त्यांनी सांगितलं.

****

गेले ५९ दिवस सुरु असलेल्या प्रतीकात्मक स्वरूपातल्या अमरनाथ यात्रेची काल सांगता झाली. काल रक्षाबंधनाच्या दिवशी छडी मुबारक पवित्र गुंफेपाशी आणण्यात आली आणि पारंपारिक पूजा होऊन या वर्षीच्या यात्रेची सांगता झाली.

****

नांदेड जिल्ह्यात आज पर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८१ पूर्णांक ९९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्याने वार्षीक सरासरी ओलांडली असून, तालुक्यात सरासरी १०१ पूर्णांक १७ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वात कमी ७७ पूर्णांक ४९ टक्के पाऊस नांदेड तालुक्यात झाला आहे.

****

वाशिम जिल्ह्यात मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदराच्या तुलनेनं कमी असल्यानं जिल्ह्यात “बेटी बचाओ-बेटी पढाओ” अभियान राबवण्यात येत आहे. मुलीच्या जन्माचं स्वागत होऊन, मुलींच्या बाबतीत समाजात आदराची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं वाशिम जिल्ह्यातील देपूळ इथे गावातील तब्बल ४०० लेकीबाळींचा काल साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.

****

नैरोबी इथं सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अँथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धेत, भारताचा धावपटू अमित खत्री ने पुरूषांच्या दहा हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. त्याचबरोबर महिलांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत शैली सिंह हिनंदेखील रौप्य पदक पटकावलं आहे. 

****

मराठवाड्यात काल ९८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

No comments: