Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात १०० कोटी कोविड
प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही
लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्याच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश.
· इंधन दरवाढ, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन.
· गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान ५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.
आणि
· मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही.
****
राज्याच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आपली बहुमोल संस्कृती टिकवणं गरजेचं असून, आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसंच त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल, असं आश्वासनही सामंत यांनी यावेळी दिलं.
****
नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच स्थापन करावेत, ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठं व्हावीत, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे. विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना केंद्राच्या समन्वयकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून १३, १४, तसंच २७ आणि २८ नोव्हेंबर या दिवशी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिबीरांचं आयोजन करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरला ग्रामसभेत ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
इंधन दरवाढ, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन ते तहसील कार्यालयापर्यंत केंद्र सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत निदर्शनं करण्यात आली.
नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला.
ठाणे इथं इंधन भरणाऱ्या वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच सत्कार करत निषेध नोंदवण्यात आला.
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात बैलगाडीवर मोटार सायकल आणि सिलिंडर ठेवून आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आलं.
****
सोलापूर जिल्ह्यात आज रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सोयाबीन आणि उडीद या धान्याची होळी करत आंदोलन करण्यात आलं. परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी आघाडी सरकारने तुटपुंजी मदत करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली असून जिरायती शेतीला पन्नास हजार रुपये आणि बागायती शेतीला दहा लाख रुपये मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार आहे. मात्र कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता, हा महोत्सव दूरदृश्यप्रणाली आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. महोत्सवामध्ये कोविड मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिनिधींना प्रवेशासाठी मान्यता दिली जाईल, असं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे. या चित्रपट महोत्सवात जगभरातील ३०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
****
रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकींना आदरांजली वाहण्यात आली
****
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४ ९२ १२ १२ किंवा ९९ ३० ९९ ७७ ०० या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.
****
मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागात मराठवाड्यातील खासदारांची बैठक आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत सर्व खासदारांनी नांदेड ते मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी करण, विद्युतीकरण आणि पीटलाईन संदर्भात मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेड-मनमाड रेल्वमार्गावरील विद्युतीकरण २०२३ पूर्ण करणार असल्याचं दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं. औरंगाबाद ते नगर रेल्वेमार्ग संदर्भात चर्चा सुरु असून राज्य सरकारनं पन्नास टक्के हिस्सा द्यावा असं ते यावेळी म्हणाले.
//********//
No comments:
Post a Comment