Saturday, 23 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** पुरेसं मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी न्यायालयीन व्यवस्थेचं बळकटीकरण होण्याची आवश्यकता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून व्यक्त

** यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एक विद्यार्थी-एक झाड उपक्रम

** संत नामदेव तीर्थयात्रा नांदेडहून एअर इंडियाच्या विमानाने पंजाबात घुमानकडे रवाना

आणि

** टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तानबरोबर

****

आता सविस्तर बातम्या

****

पुरेसं मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी न्यायालयीन व्यवस्थेचं बळकटीकरण होण्याची अत्यावश्यकता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या बी आणि सी विंगचं आज सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले अनेक न्यायमूर्ती, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रीय न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधीकरण स्थापन करण्याबाबत आपण केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असून, संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर विचार व्हावा, अशी अपेक्षा सरन्यायाधीशांनी व्यक्त केली. ते म्हणाले...

 I have therefore sent a proposal for the establishment of National Judicial Infrastructure Authority to the Honourable Minister of Law & Justice. I am hoping for a positive response soon. I ask on the Honourable Minister of Law & Justice to expedite the process & soon the proposal to create nation judicial Infrastructure Authority with statutory backing is taken up in the upcoming Winter Session of the Parliament.

 

केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी यावेळी बोलताना सर्वसामान्य माणूस आणि न्याय यामधलं अंतर मिटलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात केंद्र तसंच राज्यांच्या सार्वभौम अधिकारांकडे लक्ष वेधलं. मुंबई उच्च न्यायालयासाठी नवी इमारत बांधून देण्यात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले...

मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने दिपंकरजी आपल्याला वचन देतो की हमे हायकोर्ट के लिए बिल्डिंग चाहिये. वो सिर्फ आपका नही मेरा भी सपना है। आणि ते मी करणारच. आणि तारीख तर आपण ठरवूच पण मी आदरणीय रमण्णा साहेबांना आजच आमंत्रण देतोय की आपको भी आना होगा भूमिपूजन के लिए। आणि प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटन सुध्दा करायचं. हे मी का म्हणतो, की आत्ता चंद्रचूड साहेबांनी एक बाजू कोर्टाची, काय काय चाललेलं आहे, किती केसेस आहेत आणि न्यायमूर्ती किती काम करत असतात आम्हाला पूर्ण आदर आहे.

****

राष्ट्रीय विधी प्राधिकरणाच्या महाशिबीरातून उपेक्षित वंचित तसंच तळागाळातल्या लोकांना योजनेची माहीती करून देता येते, तसंच त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव होते, असं राष्ट्रीय विधी प्राधिकरणाचे राष्ट्रीय अध्यक्ष न्यायमूर्ती उदय ललित यांनी म्हटलं आहे. बीड इथं, आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण जनजागृती महाशिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

हा उपक्रम फक्त ४५ दिवसच सुरू न राहता सदैव यावर मंथन व्हावं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

२०१८ मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. कोरेगाव भीमा इथं १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता, तर ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा इथं एल्गार परिषद घेण्यात आली होती. तेव्हा रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तसेच परमवीर यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून एल्गार परिषदेशी निगडित अटक आरोपींकडील जप्त केलेले काही पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यामुळे या प्रकरणी या दोघांची साक्ष महत्त्वाची आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक विद्यार्थी-एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावणे अपेक्षित आहे, एक वर्ष कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे जे विद्यार्थी अशा प्रकारचे झाड लावतील आणि त्याचे सहा महिने संगोपन करतील त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून अभ्यासक्रमानुसार १० ते २५ गुण देण्यात येतील अशी माहिती, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यस्तरावर असून दरवर्षी पाच लाख विद्यार्थी विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेत असतात. विद्यापीठाच्या या प्रोत्साहन योजनेमुळे किमान पाच लाख झाडे राज्यभरात लावले जातील असा विश्वासही भोंडे यांनी व्यक्त केला आहे.

****

नांदेड ते घूमान संत नामदेव तीर्थयात्रा आज नांदेडहून एअर इंडियाच्या विमानाने घूमानकडे रवाना झाली. गेल्या सात वर्षांपासून नांदेडच्या नानक साई फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ही यात्रा काढली जाते अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी दिली. यावर्षी १२२ यात्रेकरू सहभागी झाले आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेड महापालिकेच्या महापौर जयश्री निलेश पावडे यांनी गुरू गोविंदसिंघजी विमानतळ इथं आयोजित कार्यक्रमात यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या. घूमान यात्रा महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील संस्कृती वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.            

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तानबरोबर होणार आहे. उद्या सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल. आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अबुधाबी इथं सामना सुरू आहे. दक्षिण आफ्रिका संघानं ऑस्ट्रेलियासमोर ११९ धावांचं लक्ष्य ठेवलं असून, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सातव्या षटकांत दोन बाद ३३ धावा झाल्या होत्या. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातला सामना दुबई इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.

 

दरम्यान, भारत - इंग्लंड यांच्यातल्या स्थगित कसोटी मालिकेतला पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. गेल्या महिन्यात इंग्लंड इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघाच्या मार्गदर्शक फळीतील काही सदस्यांना कोरोना विषाणूची  लागण झाल्यामुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला होता. हा सामना मँचेस्टरऐवजी एजबॅस्टन इथं खेळवण्यात येणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिली आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघ चार कसोटी सामन्यांनंतर २-१ अशा फरकानं आघाडीवर आहे.

****

अंमली पदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन शाहरुख खान याला अंमली पदार्थ पुरवल्याची कबुली अभिनेत्री अनन्या पांडे हिने दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरु असलेल्या चौकशीत अनन्याने अनेक खुलासे केले आहेत. आर्यनला दोन वेळा अंमली पदार्थ पुरवले आहेत मात्र कुठल्याही अंमली पदार्थ पुरवठादाराच्या संपर्कात नसल्याचं अनन्यानं सांगितलं. आपल्या एका मित्राकडून आर्यनला गांजा पुरवल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

//********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...