Sunday, 10 October 2021

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १० ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

 

ठळक बातम्या

****

**मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

** राज्याच्या विकास कामात पक्षभेद नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** शंभर कोटीचा टप्पा गाठण्यासाठी राज्यांनी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यांचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचं आवाहन

** मिशन कवच कुंडल मोहिमेस जालन्यातून प्रारंभ  

** राज्यात दोन हजार ४८६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर ११२ बाधि

** फोन टॅपिंगचं ध्वनीमुद्रण गहाळ झाल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक सुबोधकुमार जायस्वाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

** आणि

** बीड जिल्ह्यावक्फ मंडळाची ५६ एकर जमीन त्रयस्थाच्या नावे केल्या प्रकरणी बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉक्टर एन. आर. शेळके यांना अटक  

****

आता सविस्तर बातम्या

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान झालं असून केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषानुसार हे नुकसान चार हजार कोटी रूपयांचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. औरंगाबादमध्ये काल त्यांना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून राज्य सरकार शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगात मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर उद्या हा आढावा सादर केला जाईल, त्यानंतर त्यांच्या पातळीवर मदतीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.

या बैठकीस औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नांदेडचे अशोक चव्हाण, जालन्याचे राजेश टोपे, बीडचे धनंजय मुंडे, खासदार फौजीया खान, आमदार सतीश चव्हाण आणि जिल्हास्तरावरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

***

राज्याच्या विकास कामात सरकार पक्षभेद करत नाही, यापुढील काळात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झेंडा दाखवून लोकार्पण झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विमानतळावरच्या कोनशिलेच अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री शिंदे यांनी यावेळी मराठीतून संवाद साधत, सिंधुदुर्ग विमानतळच्या सुरुवातीने कोकणच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जात असल्याचं सांगितलं. गेल्या तीन दशकांचं हे स्वप्न आज साकार होतंय, पुढच्या पाच वर्षात २० ते २५ नवीन उड्डाण सुरु होतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

येत्या काही दिवसात लसीकरणाचा शंभर कोटीचा टप्पा गाठण्यासाठी राज्यांनी आपापल्या लसीकरण मोहिमांचा वेग वाढवावा असं आवाहन, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी केलं आहे. त्यांनी काल एकोणीस राज्यांचे प्रधान सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहिमेच्या संचालकांसोबत चर्चा करून कोविड स्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सणासुदीच्या काळात लोकांनी सण साजरे करताना कोविड नियमांचं पालन करावं असही त्यांनी सांगितलं.

**

कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग तसेच असंघटित कामगारांमध्ये लसीकरणाबाबत प्रभावी जनजागृती करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात मिशन कवच कुंडल सोबतच अमेरिकन इंडियन फाउंडेशनच्यावतीनं राबवल्या जाणाऱ्या मिशन कोरोना विजयची सुरुवात काल जालना इथं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. या विशेष मोहिमेबद्दल बोलताना टोपे म्हणाले….

 

अमेरिकन इंडियन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं राज्यात जालना, औरंगाबाद, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी 'मिशन कोरोना विजय' हा उपक्रम सुरू केला आहे.

****

मिशन कवचकुंडल या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाने वेग घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६ लाख ८० हजार नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून दोन लाख ७२ हजार नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. उर्वरित सहा लाख तीस हजार नागरिकांना पहिली मात्रा देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

कोविड लसीकरणासाठीच्या मिशन कवचकुंडल या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत ती यशस्वी करावी, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. यासंदर्भात जारी केलेल्या एका पत्रकात देशमुख यांनी सामाजिक संस्था संघटनांना जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. कवकुंडले मोहिम सुरू झाल्यानंतर जिल्हयात १० हजार २३५ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.

कवच कुंडल अभियानाअंतर्गत अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं आहे.

परभणी शहरामध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल प्रभागातील नगरसेवकांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल सत्कार केला.

****

राज्यात काल दोन हजार ४८६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ७ हजार, ५७८ झाली आहे. काल ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ५१४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ४४६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९ हजार ४६४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३३ हजार सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ११२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर लातूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात काल ३४ नवे रुग्ण आढळले,उस्मानाबाद जिल्ह्यात ३१, औरंगाबाद २६, जालना नऊ, लातूर आठ, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

 

राज्याच्या गुप्तचर विभागातून फोन टॅपिंगचं ध्वनीमुद्रण गहाळ झाल्या प्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालक, विद्यमान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक  सुबोधकुमार जायस्वाल यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं जायस्वाल यांना ई-मेलवरुन याबाबतचं समन्स पाठवलं असून येत्या १४ ऑक्टोबरला चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुह्यात येत्या बारा ऑक्टोबरला हजर राहण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. 

***

बीड जिल्ह्याआष्टी तालुक्यातील चिंचपूर इथली वक्फ मंडळाची ५६ एकर जमीन त्रयस्थाच्या नावे केल्या प्रकरणी बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉक्टर एन. आर. शेळके यांना काल अटक करण्यात आली. बीडमध्ये भूसधार उपजिल्हाधिकारी पदावर असतांना त्यांनी हा व्यवहार केला होता. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना औरंगाबादमधून काल ताब्यात घेतलं. या प्रकरणात वक्फ मंडळाची मिन मदतमास दाखवून खालसा केली आणि त्यानंतर ती कोणत्याही संचिकेशिवाय खासगी व्यक्तींच्या नावावर करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपी आढळले आहेत.

***

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खीरी इथल्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उद्या 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. या बंदला सर्वच नागरिकांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
मुंबई मध्ये काल महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शिवसेने खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत पत्रकार परिषदेला उपस्थित होते. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा दयावा, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.

दरम्यान, मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा काल लखनऊ पोलिसांसमोर हजर झाला. आशिष याच्याविरुद्ध लखीमपूर इथं चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे.

 ****

शारदीय नवरात्र महोत्सवात काल तिसऱ्या माळेला, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ तुळजाभवानी मातेस दिला, अशी आख्यायिका सांगण्यात येते. त्यामुळे या दिवशी रथ अलंकार महापूजा बांधण्यात येते.

दरम्यान, तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २१ ऑक्टोबरपर्यंत साजरा होणार आहे. तुळजापूर मार्गे होणारी हैदराबाद ते औरंगाबाद मार्गावरची अवजड वाहनांची वाहुतक या कालावधीत अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतली वाहनं, छोटी वाहनं तसंच एस टी बस मात्र नियमित मार्गावरून धावू शकणार आहेत

****

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं,  अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वाघोली इथं ऊस परिषदेला जाण्यापूर्वी शेट्टी यांनी काल तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. जनतेचा प्रश्न निर्माण झाला की, केंद्र आणि राज्य सरकार खोटं खोटं भांडण करून जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राजकीय सूड घेण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर केला जातो, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.

****

परभणी तालुक्यातील पेडगाव महसूल मंडळात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे भरपाई द्यावी या मागणीसाठी परभणी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काल परभणी - मानवत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेडगाव महसूल मंडळातील सर्व गावातील शेतकरी, भजनी मंडळ सहभागी झाले.

****

हवामान

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने येत्या १४ तारखेपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यात आज पाऊस होण्याचा अंदाज हवामान केंद्रानं वर्तवला आहे.

****

शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या

****

** मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

** राज्याच्या विकास कामात पक्षभेद नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

      ** आणि

** मिशन कवच कुंडल मोहिमेस जालन्यातून प्रारंभ  

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.

****

कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे, यासाठी नाका-तोंडावर मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवा तसंच आपलं लसीकरण करून घ्या. आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.

****

 

 

 

 

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...