Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव
आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका.
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे
दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा,
हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात
जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू
शकता.
****
·
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५२ वी जयंती; गांधीजींच्या
स्वप्नातला देश घडवण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन.
·
स्वच्छ भारत मिशन शहरी दोन, आणि अटल मिशनला पंतप्रधानांच्या
हस्ते प्रारंभ.
·
वनं आणि वन्यजीव संरक्षण विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा-मुख्यमंत्र्यांची
सूचना.
·
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘शरद शतम्’ योजना प्रस्तावित.
·
नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी काही नियमांचं पालन करुन परवानगी
·
राज्यात तीन हजार १०६ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात चौघांचा
मृत्यू तर नवे १३३ बाधित.
·
उत्तराखंडात झालेल्या हिमस्खलनात मुंबईहून गिर्यारोहणासाठी गेलेले
पाच जण बेपत्ता.
आणि
·
मराठवाड्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांची आज १५२ वी जयंती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या
नायडू यांनी, देशवासियांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गांधीजींची शिकवण,
आदर्श आणि मूल्यांचं पालन करत, भारताला गांधीजींच्या स्वप्नातला देश घडवण्यासाठी प्रयत्नरत
राहण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
देशाचे
दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती. देशभरात विविध कार्यक्रमांच्या
माध्यमातून गांधीजी तसंच शास्त्रीजींना अभिवादन करण्यात येत आहे.
राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी आज दुपारी तीन वाजता वर्धा इथं सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन, गांधीजींना
अभिवादन करणार आहेत. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थनेत राज्यपाल सहभागी होणार आहेत.
****
स्वच्छता
राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून, प्रत्येकानं भाग घेण्यासारखी एक चळवळ आहे
असं मत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या शहरांना कचरामुक्त
करण्याच्या आणि जलसुरक्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अटल अमृत भाग दोन योजनेचा
आरंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
देशातली
शहरं कचरा मुक्त करण्यासाठी आणि पाण्यापासून संरक्षित करण्याच्या उद्देशानं आखण्यात
आलेल्या, स्वच्छ भारत मिशन शहरी दोन, आणि अटल मिशनची सुरुवातही यावेळी करण्यात आली.
दरम्यान,
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज
इथं, स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. महिनाभर चालणारा हा कार्यक्रम आजादी का अमृत
महोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे. देशभरातल्या ७४४ जिल्ह्यांमधल्या सहा लाख गावांमध्ये
ही मोहीम राबवली जाणार आहे.
****
शालेय
विद्यार्थ्यांमध्ये वनं, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भात रुची निर्माण करण्यासाठी,
शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे
यांनी केली आहे. वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी
ते बोलत होते. विकासाचा ध्यास घेऊन आपण विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची
गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी, वन आणि वन्यजीव वैभव जपण्यासाठी जगा आणि जगू द्या
हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाण्याचं आवाहन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमात
दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी
झाडं लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा
त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’ असं संबोधून, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन
करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, पवार यांनी दिली.
****
ज्येष्ठ
नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि उपाय योजनांच्या दृष्टीनं ‘शरद शतम्’ नावाची योजना
प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या ६५ वर्षांवरील सर्व
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय्य विभागातर्फे, काल ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त मुंबईत घेण्यात
आलेल्या कार्यक्रमात, मुंडे बोलत होते. या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली
असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार
असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
महावितरणच्या
विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्यात आला. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल
घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातल्या चार हजार ५३४ उमेदवारांची निवडयादी जाहीर करण्यात
आली आहे.
****
नवरात्रोत्सवात
गरबा खेळण्यासाठी काही नियमांचं पालन करुन परवानगी मिळणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी सांगितलं आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी आरोग्य विभागाचे
सचिव तसंच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या सचिवांशी काल चर्चा केली, त्यानंतर ते जालना
इथं पत्रकारांशी बोलत होते. गरबा उत्सव मोकळ्या मैदानात, सभागृहात किंवा बंद हॉलमध्ये,
सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करून साजरा करावा, हॉलच्या क्षमतेच्या पन्नास टक्के
लोकांनाच सहभागाची परवानगी द्यावी, कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच
भोजन व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी, अशा सक्त सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यात
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लसीकरणानंतर तिसऱ्या लाटेची भीती राहणार नाही, असंही टोपे
यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टींग
किट बनवलं असून, ते उपयुक्त ठरेल असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.
****
राज्याचे माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयानं समन्स जारी केलं आहे. यात १६ नोव्हेंबरपर्यंत
देशमुख यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालय
-ईडीने आतापर्यंत देशमुख यांना तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही विविध कारणे देत त्यांनी
चौकशीला येण्याचे टाळले. त्यामुळे तपास यंत्रणांनी ‘लूक आउट’ नोटीस जारी केली. गेल्या
तीन महिन्यांपासून त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने सीबीआयने त्याबाबत मुख्य सचिव सीताराम
कुंटे तसंच पोलीस महासंचालक संजीव पांडे यांना समन्स बजावल आहे.
****
परभणी
जिल्ह्यात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी, तसंच शहरी भागातले इयत्ता आठवी ते
बारावीचे वर्ग परवा चार ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती,
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. शासन परिपत्रकात नमूद असलेल्या सूचनांच्या अधिन
राहून ही परवानगी दिली जात असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यात
काल तीन हजार १०६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५३ हजार, ९६१ झाली आहे. काल ५० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार
११७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार १६४ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७४ हजार ८९२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३६
हजार, ३७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल १३३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड
जिल्ह्यात काल ४८ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ३८, औरंगाबाद २५, लातूर १५,
परभणी चार, नांदेड दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. जालना जिल्ह्यात काल
कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
अनाथ
आहे म्हणून खचून न जाता शासनानं उपलब्ध करून दिलेल्या अनाथ संवर्गातील आरक्षणाचा लाभ
घ्यावा, असं आवाहन, राज्य सेवा परीक्षेत अनाथ संवर्गातून पहिले प्रादेशिक वन अधिकारी
झालेले नारायण इंगळे यांनी केलं आहे. अनाथांना आरक्षणाची संधी दिल्याबद्दल त्यांनी
राज्य शासनाचे आभार मानले. ते म्हणाले –
जो निकाल जाहीर झालेला आहे महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत त्यामधे आर एफ ओ ग्रेड बी या पदासाठी म्हणजेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर
या पदासाठी माझी निवड झालेली आहे. जी भविष्यामध्ये आता पदभरती होईल त्यासाठी अनाथांनी
सुध्दा या शासनाने जी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे, या संधीचा फायदा घ्यावा.
मी अनाथ आहे असं खचून न जाता त्यांनी येणाऱ्या परिस्थितीशी सामना करून स्पर्धा परीक्षेची
तयारी करावी जसं मला यश प्राप्त झालेलं आहे इथून पुढे आपणही यश संपादन करावं.
****
उत्तराखंडात
त्रिशूळ पर्वतावर काल हिमस्खलन झालं, मुंबईहून गिर्यारोहणासाठी गेलेले नौदलाचे पाच
सैनिक या हिमस्खलनात बेपत्ता झाले आहेत. या अपघातात एकूण दहा सैनिक अडकले होते. त्यापैकी
पाच जणांना बचाव पथकानं सुरक्षित बाहेर काढलं आहे. २० गिर्यारोहक सैनिकांच्या या पथकाला
३ सप्टेंबर रोजी मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं होता.
****
मराठवाड्यातल्या
अनेक भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.
परभणी
शहरासह परिसरात पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही काल सायंकाळी अनेक भागात विजेच्या
कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्णा शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे
बाजारपेठेतील नागरिकांची एकच धावपळ उडाली. पूर्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने तालुक्यातल्या
तीन गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.
जालना
जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद शहर आणि
परिसरातही पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे.
रात्रीच्या सुमारास अनेक घरात पाणी शिरल्यानं, नागरिकांची तारांबळ उडाली.
बीड
शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला.
नांदेड
जिल्ह्याच्या, नांदेड, अर्धापूर या तालुक्यात काल सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान,
नांदेड तालुक्यातल्या सुगाव खुर्द, सुगाव बुद्रुक शिवारात गोदावरी नदीचं पाणी सलग चार
दिवसांपासून साचलेलं आहे. त्यामुळे सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवरील खरीपाची पिकं पाण्याखाली
गेली आहेत.
जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल अर्धापूर तालुक्यातल्या पिंपळगाव महादेव इथं, अतिवृष्टीग्रस्त
भागाची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यातल्या लोणी इथं बोलतांना चव्हाण
यांनी, अशा कठीण प्रसंगात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा विश्वास दिला.
सोयाबीन, हळद, केळी, ऊस यासह नुकसान झालेल्या इतर पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या
सूचनाही त्यांनी केली.
****
लातूर
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची आढावा बैठक पालकमंत्री अमित देशमुख
यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. यावेळी बोलतांना देशमुख यांनी, अतिवृष्टीच्या
संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या
पिक विम्याचे अर्ज ऑफलाईन तसंच ऑनलाईन पध्दतीनं ग्रामपातळीवर स्वीकारावेत. पंचनामे
आणि सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करुन त्याचा अहवाल त्वरीत सादर करावा, तसंच मदतीपासून एकही
शेतकरी वंचित रहाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना, देशमुख यांनी यावेळी केल्या.
****
ओबीसींचे
राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी
महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा,
अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणिस आमदार अतुल सावे यांनी केली आहे. ते
काल औरंगाबाद इथं बोलत होते. आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे
हे काम अजूनही सुरू झालेलं नाही, याकडे सावे यांनी लक्ष वेधलं.
****
माजी
आमदार उल्हास पवार हे अष्टपैलु नेतृत्व असून, विविध क्षेत्रातला त्यांचा वावर नव्या
पिढीतील राजकाण्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, ज्येष्ठ संपादक तसंच विचारवंत ज्ञानेश
महाराव यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा नववा ‘भगवानराव
लोमटे स्मृती राज्य पुरस्कार’, महाराव यांच्या हस्ते उल्हास पवार यांना प्रदान करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. स्मृतिचिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची शिल्प प्रतिमा, सन्मानपत्र,
शाल आणि २५ हजार रूपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराला उत्तर देताना पवार
यांनी, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचं काम भगवानराव लोमटे यांनी
केलं, अशी भावना व्यक्त केली.
****
भारतीय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन
करण्यात येत आहे. याच अनुषंगाने परभणी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्रामार्फत
आज ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील राजगोपालचारी उद्यानापासून
सकाळी आठ वाजता या दौडला सुरवात होणार आहे.
****
हवामान
बदलामुळे शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडत असून या बदलांना सामोरं जाण्यासाठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करणं क्रमप्राप्त असल्याचं, परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ अशोक ढवण यांनी म्हटलं आहे. विद्यापीठातल्या कृषी अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं यासंदर्भात घेण्यात आलेल्या, ऑनलाईन वेबिनारच्या
अध्यक्षीय भाषणात, ते बोलत होते. शेतीक्षेत्रात ड्रोन, रोबोट, आदीसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा
अवलंब करणं गरजेचं आहे. शेतीची उत्पादन क्षमता तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी कृषी
अभियंत्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं, कुलगुरु ढवण यांनी नमूद केलं.
****
मोसमी
पावसाचा परतीचा प्रवास सहा ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे. एक जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला,
तर राज्यात सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस झाला.
येत्या
दोन दिवसांत कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी
पावसाची शक्यता असून राज्यभरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा पुणे
वेधशाळेचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment