Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
नौदलाच्या भविष्यातल्या योजना,
रसद आणि भौतिक सज्जता अशा विविध विषयांवरची नौदल अधिकाऱ्यांची द्विवार्षिक बैठक, आज
सुरू होत आहे. पाच दिवसांच्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुख
जनरल बिपीन रावत आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख हे नौदल अधिकाऱ्यांशी
संवाद साधून, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड संकटकाळातही नौदलानं लढाऊ, विश्वासार्ह
आणि एकसंध शक्ती बनण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून, त्या दिशेनं नौदलाची अंमलबजावणी
सुरू आहे. लष्करी-सामरिक पातळीवरच्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार
आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणानं
९७ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल १२ लाख पाच हजार १६२ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात
आतापर्यंत या लसीच्या ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १३
हजार ५९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४० लाख ८१ हजार ३१५ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५२ हजार २९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
१९ हजार ५८२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३४ लाख ३९ हजार ३३१ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ८९ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचा
भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ऑगस्ट महिना
अखेरीला साठवणुकीतला कांदा बाजारात आणला असून, त्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होत आहेत.
तसंच टोमॅटोचा देखील भाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं खाद्य आणि उपभोक्ता व्यवहार
मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
ज्या राज्यांमध्ये कांद्याचा
भाव राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे, त्या राज्यांना साठवणुकीतला कांदा पुरवण्यात
आला आहे. तसंच कांद्याचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी खाद्य मंत्रालयानं सर्व राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांना २१ रुपये प्रति किलो दरानं कांदा उपलब्ध केला असल्याचं
या निवेदनात म्हटलं आहे.
****
देशभरातल्या असंघटीत कामगारांचा
माहितीसाठी गोळा करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सुरु केलेल्या ई-श्रम पोर्टलवर
आतापर्यंत चार कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार
आणि रोजगार मंत्री भुपेंदर यादव यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. या पोर्टलवर महाराष्ट्रातून
नऊ लाख ६३ हजारांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या एकूण असंघटित
कामगारांपैकी सुमारे ५० टक्के महिला तर ४९ पूर्णांक ९८ शतांश टक्के पुरुष कामगार आहेत.
कामाच्या वर्गवारीनुसार सर्वाधिक नोंदणी कृषी आणि बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांची
झाली आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानं या कामगारांना त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांचा
लाभ मिळवून देणं अधिक सुलभ होणार असल्याचं, यादव यांनी म्हटलं आहे. देशभरातले असंघटित
कामगार आपल्या मोबाईलवरून ई-श्रम या पोर्टलच्या माध्यमातून, तसंच राज्यातल्या समूह
सेवा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, टपाल कार्यालयाच्या डिजिटल
सेवा केंद्रांपैकी काही निवडक टपाल कार्यालयांमध्ये नोंदणी करू शकतात.
****
गुळ तयार करून बाजारात विक्रीसाठी
शेतकरी आणतात, तेव्हा भेसळविरोधी कायद्यातून गुळ व्यापाऱ्यांना वगळण्यात यावं, अशी
मागणी, सांगली इथल्या व्यापारी परिषदेत करण्यात आली. चेंबर ऑफ कॉमर्सने सांगली बाजार
समिती आवारात गुळ व्यापारी परिषद काल आयोजित केली होती. गुळ व्यापाऱ्यांच्या अडचणींवर
या परिषदेत चर्चा करण्यात आली. गुळात भेसळ आढळली की संबंधित व्यापाऱ्याला जबाबदार धरलं
जातं, मात्र तयार गुळ विक्री करणं एवढंच काम व्यापाऱ्यांमार्फत केलं जातं, त्यामुळे
गुळाचे नमुने व्यापाऱ्यांकडून घेऊ नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२४ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ८२ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि
विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही
ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे
एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
झाला, तर सहा प्रवासी जखमी झाले. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने
पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर तब्बल सहा वाहनं एकमेकांवर आदळली. यामध्ये दोन
टेम्पो, दोन कार, खाजगी बस यांचा समावेश आहे. अपघातामुळे विस्कळित झालेली वाहतूक काही
वेळानंतर सुरु झाली.
****
No comments:
Post a Comment