Wednesday, 20 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देश लवकरच १०० कोटी मात्रांचा टप्पा पार करणार आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात देशात ४१ लाख ३६ हजार १४२ नागरीकांना लस देण्यात आली.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानात सीरम इन्स्टिट्युटची भूमिका महत्त्वाची आहे, अशी भावना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केली. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर त्या काल बोलत होत्या. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्याशी पवार यांनी चर्चा केली.

****

कोविड साथीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं आजपासून सुरू होत आहेत. पन्नास टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह ही महाविद्यालयं उघडली जात आहेत. राज्यातली सर्व कृषी विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्न शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयंही आजपासून सुरू होत आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील मंग्याळ गावात कोविड लसीकरण जनजागृतीसाठी, शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह दिंडी काढली. जिल्हा परिषदेच्या प्राथमि‍क शाळेचे विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले.

****

दिवाळी निमित्त भेट देण्यासाठी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेलं साहित्य खरेदी करण्याचं आवाहन, अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वसेकर यांनी, उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला केलं आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लागेल, तसंच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळेल, असा विश्वास वसेकर यांनी व्यक्त केला.

****

भारतीय बॅडमिंटनपटू पी वी सिंधू हिनं डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुनं तुर्कीच्या नेसलिहान यिगीटला २१-१२, २१-१० असं पराभूत केलं. आता तिचा सामना बुसानन हिच्यासोबत होणार आहे. माजी विजेते किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा देखील या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...