Thursday, 21 October 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबवणार - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

·      राज्यात नवे एक हजार ८२५ कोविडग्रस्त; मराठवाड्यात चौघांचा मृत्यू तर ५८ नव्या बाधितांची नोंद

·      राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

·      मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न लवकरच मार्गी लावणार -रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही

·      सोयाबीन आणि डाळीचा साठा करण्याची मर्यादा वाढवावी-आमदार डॉ. राहुल पाटील यांची मागणी

आणि

·      मिशन कवचकुंडल अंतर्गत कोविड लसीकरणासाठी नांदेड जिल्ह्यात आजपासून ७५ तासांची विशेष मोही

****

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबवणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. काल मुंबईत माटुंगा इथं एका शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सामंत यांनी ही माहिती दिली. कोविड साथीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालयं कालपासून पन्नास टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह सुरू झाली. महाविद्यालयं प्रत्यक्ष सुरू झालेली असताना, एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं, उदय सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात काल शाहीर अमरशेख जयंती समारंभाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना सामंत यांनी, राज्याच्या विविध भागातल्या लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. आपली बहुमोल संस्कृती टिकवणं गरजेचं असून, आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, असं ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसंच त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल, सं आश्वासनही सामंत यांनी दिलं.

****

राज्यात काल एक हजार ८२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ९६ हजार, ६४५ झाली आहे. काल २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ८८६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ८७९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख २७ हजार ४२६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४३ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ७२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात २७ रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ११, बीड सात, तर जालना जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी, आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल, काल जाहीर झाला. दहावीचा राज्याचा निकाल २९ पूर्णांक १४ टक्के, तर बारावीचा निकाल २७ पूर्णांक ३१ टक्के इतका लागला. औरंगाबाद विभागातून दहावीत ३१ पूर्णांक ६४ टक्के, तर बारावीत ३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागात दहावीचा निकाल ३७ पूर्णांक ६९ शतांश टक्के तर बारावीचा निकाल ३६ पूर्णांक ४९ शतांश टक्के लागला आहे.

****

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातली अधिसूचना काल जारी करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

****

राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील, महिला आर्थिक विकास महामंडळातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. महिला आणि बाल विकास मंत्री विधीज्ञ यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. यावर्षीच्या एक जुलैपासून हा लाभ लागू होणार आहे.

****

मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागात मराठवाड्यातल्या खासदारांची बैठक काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत सर्व खासदारांनी नांदेड ते मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी करणं, तसंच विद्युतीकरण आणि पीटलाईन संदर्भात मागण्या केल्या, नांदेड-मनमाड रेल्वमार्गावरील विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचं, दानवे यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले...

नांदेड पासून ते मनमाड पर्यंत २०२३ पर्यंत आपण इलेक्ट्रीफिकेशन करु. नांदेड पासून ते मनमाड पर्यंत दुहेरीकरण झालं पाहिजे. चाळीसगाव औरंगाबाद असू द्या किंवा औरंगाबाद पुणे मार्ग नगर असूद्या, पीट लाईन झाली पाहिजे, मग परभणी असेल, नांदेड असेल, पूर्णा असेल, जालना या भागातील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. आणि मराठवाड्यासाठी पूर्णपणाने लक्ष देवून हे विषय पुढच्या काळात पूर्णपणे डेव्हलप केले जाईल. मुंबई टू नागपूर या समृद्धी महामार्गानं आपल्याला ट्रेन आणता येईल का ? राज्य सरकार त्यासाठी जर तयार असेल तर त्याही प्रकल्पाला पूर्ण नेण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत

या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या प्रश्नांबाबत येत्या महिन्याभरात ठोस पावलं न उचल्यास तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीने अनुसुचित जाती जमाती, मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसंच दिव्यांगांसाठी टोलफ्री क्रमांक जारी केला आहे. संबंधितांना परीक्षेच्या अर्जप्रकियेसह अन्य चौकशीसाठी तसंच माहिती घेण्यासाठी ८००१ १८७११ या क्रमांकावर फोन करता येणार आहे. शासकीय कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळेत हा टोल फ्री क्रमांक सुरू राहणार आहे.

****

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन शाहरुख खान याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती व्ही. व्ही. पाटील यांनी फेटाळून लावला. कॉर्डेलिया क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीतून आर्यन आणि त्याच्या साथीदारांना दोन ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. काल आर्यनच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत, अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने आर्यनच्या सामाजिक माध्यमांवरचं संभाषण न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयाने आर्यन आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, जामीन अर्ज फेटाळण्याच्या या निर्णयाला आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोयाबीन आणि डाळीचा साठा करण्याची मर्यादा वाढवावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परभणी जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पण गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं. साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे आवश्यक आहे त्यासाठी ठाकरे सरकारने पुढाकार घ्यावा, असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. शासकीय खरेदी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची समिती गठीत करावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

****

नांदेड जिल्ह्यात मिशन कवचकुंडल अंतर्गत कोविड लसीकरणासाठी आजपासून ७५ तासांची विशेष मोही  राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यापासून ते महानगरापर्यंत लसीकरण प्रभावी करण्याच्यादृष्टीने आज सकाळी ८ वाजेपासून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या लसीकरण मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, सं आवाहन त्यांनी नागरीकांना केलं आहे. ग्रामीण पातळीवर ज्या गावांमध्ये लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला अशा ठिकाणी प्राधान्यानं ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

****

इंधन दरवाढ, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल परभणी जिल्ह्यात पाथरी इथं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भवन ते तहसील कार्यालयापर्यंत केंद्र सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत निदर्शनं करण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी काल सोयाबीन आणि उडीद या धान्याची होळी करत आंदोलन करण्यात आलं. परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापोटी आघाडी सरकारने तुटपुंजी मदत करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली असून जिरायती शेतीला पन्नास हजार रुपये आणि बागायती शेतीला एक लाख रुपये मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिक्रमण तसंच बंदिस्त रस्ते शेतकऱ्यांनी मोकळे करावेत, जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील बरबडी पॅटर्न राबवावा असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. बरबडी गावात महाराजस्व अभियानांतर्गत बरबडी ते देगाव सुमारे अडीच किलोमीटरचा अतिक्रमीत आणि बंदिस्त रस्ता काल शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोकळा करण्यात आला. रस्ता मोकळा करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

****

टी २० क्रिकेट विश्चचषक स्पर्धेच्या काल झालेल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५३ धावांचं आव्हान भारताने दोन गडी गमवून १८ व्या षटकात पूर्ण केलं. भारताने या आधी झालेल्या सराव सामन्यात इंग्लंड संघाचा पराभव केला होता. या स्पर्धेत येत्या रविवारी भारताचा पाकिस्तानसोबत सामना होणार आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...