आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
मोहिमेत भारतानं १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या
१०० कोटी १५३ मात्रा देण्यात आल्या आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी फ्रंटलाईन वर्कर आणि डॉक्टरांशी
संवाद साधला.
दरम्यान, भारतीय पुरातत्व
सर्वेक्षणच्या वतीनं देशभरातल्या १०० स्मारकांवर विद्युत रोषणाई करुन ही ऐतिहासिक घटना
साजरी करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागात औरंगाबाद शहरातल्या बीबी का मकबरा, दौलताबाद
किल्ला आणि अहमदनगर इथल्या सलाबत खानचा मकबरा या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली
आहे.
****
आज पोलिस स्मृतिदिवस आहे.
कर्तव्य बजावताना हौतात्म्य आलेल्या पोलिसांना आज अभिवादन केलं जातं.
मुंबईत पोलीस स्मृतीदिन संचलन
कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून
शहीद वीरांना अभिवादन केलं. यावेळी पोलीस दलातील विविध पथकांनी संचलनातून मानवंदनाही
दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यावेळी उपस्थित होते.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त
सुनील केंद्रकर, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, खासदार इम्तियाज जलिल यांनी हुतात्मा
स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं, त्यांच्यावर अटकेची कारवाई न करण्याची
हमी यापुढे देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात मांडली.
आपल्याविरुद्ध अकोला आणि कल्याण इथं दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करावा याविषयीच्या
सिंग यांच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी सरकारनं हे स्पष्ट केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर
तालुक्यातल्या वडजी इथल्या विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयाचा सचिव नंदकुमार आव्हाळे
याला दीड हजार रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. ग्रामीण बँकेतून पीककर्ज
काढण्यासाठी बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
मराठवाड्यात काल ५८ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment