Tuesday, 30 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      विरोधी पक्षाच्या गदारोळात लोकसभेत दोन विधेयक सादर.

·      वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं स्पष्टीकरण.

·      देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया.

·      महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी, चैत्यभूमीवर जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास निर्बंध.

·      राज्यात उद्यापासून तर मुंबई आणि पुणे शहरात १५ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार.

आणि

·      औरंगाबाद शहरातील जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं निधन

****

लोकसभेत आज विरोधी पक्षानं केलेल्या गदारोळातच दोन विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यापूर्वी दोन वेळा स्थगित करण्यात आलं. दुसरीकडे राज्य सभेत विरोधकांच्या गदारोळातही कामकाज चालू ठेवण्यात आलं.

लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि डीएमकेच्या सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेच्या १२ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कामकाजावर बहिष्कार घातला. तेलंगाना राष्ट्र समितीच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात घोषणाबाजी केली. गदारोळ चालूच राहिल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केल. त्यानंतर दोन वाजता आणि तीन वाजेनंतरही सदस्यांची घोषणाबाजी कायम राहिल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केलं.

या गदारोळातच कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेतन आणि सेवा शर्ती सुधारीत विधेयक २०२१ आणि आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सहायक पुर्नप्रजनन तंत्रज्ञान नियमन विधेयक २०२० सभागृहात सादर केलं.

राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेली मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. हा निर्णय सभागृहानं घेतलेला आहे, मी घेतलेला नाही असं नायडू यांनी सांगितलं. या सदस्यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल साधी दिलगीरीही व्यक्त केलेली नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई अंतिम आहे, असं ते म्हणाले. त्यावर काँग्रेस, आप आणि राष्ट्रीय जनता दलासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली, नंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी कामकाज दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर ३ वाजेपर्यंत तहकूब केलं. ३ वाजेनंतर कामकाज सुरु झालं, मात्र त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं.

दरम्यान, काल निलंबित केलेल्या १२ विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबद्दल माफी मागितली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. या खासदारांना याआधीही दिलगीरी व्यक्त करण्याची संधी दिली होती, मात्र ती त्यांनी गमावली असं ते म्हणाले. खासदारांच्या अशा वर्तनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का असा सवाल ही त्यांनी केला.

****

वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितलं. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेत असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री राय यांनी सांगितलं.

****

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना दिली. कोविड काळात आपण अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत, प्रयोगशाळाही उभारल्या आहेत. हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करावी अशा सूचना केंद्र शासनानं दिल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात केंद्रशासित प्रदेश आणि राज्य शासनांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर ही कडक निगराणी आवश्यक असून, संक्रमण झाल्याचं स्पष्ट झाल्यास, तातडीनं नामांकित जीनोम सिक्वन्सिंग प्रयोग शाळांमध्ये त्यांच्या लाळेचे नमुने पाठवावेत असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.राज्य समन्वय अधिकाऱ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या या प्रयोगशाळांशी समन्वय साधून, जिनोमिक विश्लेषणाचे निष्कर्ष तातडीनं मंत्रालयात पाठवावेत असं ही या पत्रात नमूद केलं आहे.

****

किमान आधारभूत दरानं होणारी अन्नधान्याची खरेदी २०१४ च्या तुलनेत आता दुप्पट झाली आहे, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. ते संसद परिसरात बातमीदारांशी बोलत होते. पूर्वी फक्त तांदूळ आणि गव्हाची खरेदी किमान आधारभूत दरानं होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डाळी, तेलबिया आणि कापसाची खरेदीही किमान आधारभूत दरानं सुरु झाली, असं ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शब्दात आणि कृतीत अंतर नाही हे कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकावरुन स्पष्ट झालं आहे. हे कायदे रद्द करण्याचीच मागणी विरोधक करत होते. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याची गरज नव्हती असंही तोमर म्हणाले.

****

येत्या ६ डिसेंबर - महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबईत कोविडचे सावट असल्या कारणानं चैत्यभूमीवर जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनानं निर्बंध घातले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घरी राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या नेतेमंडळी आणि मान्यवरांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेलं असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असं यामार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

राज्यात उद्यापासून प्राथमिक शाळा सुरू होत आहेत, मात्र मुंबई आणि पुणे शहरात येत्या १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय संबंधित महापालिका प्रशासनानं घेतला आहे. नाशिक महापालिकेनंही १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे.  

दरम्यान, प्राथमिक शाळा सुरू करताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं शंभर टक्के लसीकरण आणि ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

बीड जिल्ह्यात प्राथमिक शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं कोरोना विषाणू प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यासंदर्भात आढावा घेतला. शिक्षकांचं लसीकरण देखील पूर्ण करण्यात आल्याचं प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी सांगितलं. ते म्हणाले –

या शाळा सुरू करत असताना आपल्या प्रत्येक शाळेकडे थर्मल गन आहेत, सॅनिटायझर्स आहेत, मास्कचा वापर करायचा आणि शाळा सगळ्या सॅनिटाईझ करून घेण्याच्या सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत. आता सगळ्या शाळा १०० टक्के निर्जुतुकीकरण केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी आपल्याला जे काही निर्देश देणार आहेत सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमधे आणि त्या शाळांच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण सगळी दक्षता घेत आहोत. आणि शाळा १०० टक्के पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत.

 

औरंगाबाद शहरातल्या शाळाही १० डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

****

औरंगाबाद शहरातील जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं आज निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे राज्य सचिव तर काही काळ राष्ट्रीय परिषदेचे ते सदस्य होते. दलित अत्याचार विरोधी संघर्ष समिती तसंच महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. भारतीय खेत मजदूर युनियनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांनी काही काळ काम केलं. उद्या सकाळी कॉम्रेड टाकसाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

//**************//

No comments: