Thursday, 25 November 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार करण्याची हमी देणारा राज्य सरकारचा प्रस्ताव 

·      खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसणाऱ्या विमा कंपन्यांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार

·      तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

·      राज्यात ९६० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एका रुग्णाचा मृत्यू तर ३० बाधित

·      बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाचं जामीनपात्र अटक वॉरंट

·      राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा, २१ डिसेंबर रोजी मतदान  

आणि

·      भारत-न्यूझीलंड यांच्यात कानपूर इथं आजपासून पहिला कसोटी क्रिकेट सामना

****

राज्य परीवहन महामंडळ -एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार करण्याची हमी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या प्रस्तावानुसार एक वर्ष ते दहा वर्षापासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपये, दहा ते वीस वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चार हजार रुपये तर वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच हजार रुपये वाढ, सरकारनं देऊ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तसंच घरभाडे भत्ता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिले जातात, असं परब यांनी सांगितलं. यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत होईल, अशी हमी सरकार घेत असल्याचं, परब यांनी नमूद केलं. याशिवाय एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर चालक आणि वाहकांना इन्सेंटिव्ह - प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, असं सांगून परब यांनी, सर्व कामगारांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. आर्थिक कारणांसाठी आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार केला जाईल, निलंबित कामगार कामावर हजर झाल्यास, निलंबन रद्द केलं जाईल, असं आश्वासनही परब यांनी दिलं.

एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरणारचा मुद्दा न्यायालयानं नेमलेल्या समितीसमोर असल्यानं, सरकार तुर्तास निर्णय घेऊ शकत नाही,  असं परब यांनी स्पष्ट केलं.

रम्यान, राज्य सरकारच्या या प्रस्तावानंतर कर्मचारी संघटना सध्या सुरु असलेल्या संपाबाबत आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

****

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसणाऱ्या विमा कंपन्यांवर तत्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालया पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठक झाली, त्यावेळी पवार बोलत होते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर परवानगी दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा कोरोना अस्तित्त्वात आहे, नवीन प्रकार आलेला नाही, संपूर्ण लसीकरण हाच सध्या कोरोनावर एकमात्र उपाय आहे. राज्यात आतापर्यंत कोविड लसीच्या १० कोटी ८४ लाख मात्रा दिल्या आहेत. आतापर्यंत ८० टक्के लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा, तर ४० टक्के लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आशा, अंगणवाडी कर्मचारी, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाचं लक्ष्य दिलं आहे, असंही ते म्हणाले.

****

राज्यात १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर; २२ डिसेंबरला मतमोजणी होईल. यासाठी एक ते सात डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. आठ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. निवडणूक होणाऱ्या नगर पंचायतींमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, आणि नवनिर्मित तीर्थपुरी नगर पंचायत, परभणी जिल्ह्यातल्या पालम, बीड जिल्ह्यातल्या केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आणि आष्टी, लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, चाकूर, देवणी, तसंच शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी आणि लोहारा, नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव, अर्धापूर, आणि माहूर, तर हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव आणि औंढा-नागनाथ या नगर पंचायतींचा समावेश आहे.

****

नांदेड- वाघाळा, धुळे, अहमदनगर आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. यासाठी २९ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. ७ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल तर ९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतमोजणी २२ डिसेंबरला होणार आहे.

 

केंद्र सरकारनं सुधारित तीनही कृषी कायदे रद्द करण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती,  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्द रण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं,  ठाकूर यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी १९ नोव्हेंबरला देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती.

 

राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना आणखी पाच वर्षांसाठी सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या अंतर्गत अंदाजे लाख प्रशिक्षणार्थींना उद्योग आणि व्यावसायिक संस्थांद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणार्थींना सुमारे तीन हजार ४ कोटी रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

****

राज्यात काल ९६० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३ हजार, ७ झाली आहे. काल ४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ८०७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ४३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ७ हजार ४२२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ नवे रुग्ण आढळले. जालना पाच,  लातूर चार, उस्मानाबाद तीन, नांदेड  दोन, तर हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

महिला सुरक्षेच्या मुद्यावर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका, खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. या विषयात महाविकास आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

*****

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. जिल्ह्यातील शासकीय जमिनीच्या अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय न घेतल्यानं दाखल अवमान याचिकेत न्यायालयानं हे वॉरंट बजावलं आहे. त्यांना दहा हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करुन, १८ जानेवारीला न्यायालसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषद सदस्य असलेले दुर्राणी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षांतर्गत घडामोडीत पक्ष श्रेष्ठींनी घेतलेल्या काही निर्णयावर नाराज होते, या अस्वस्थतेतूनच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं, बोललं जात आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून पेट्रोलपंप सायंकाळी सातनंतर सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पेट्रोल पंपचालकांसाठीनो लस, नो पेट्रोलया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी आणि कोविड जनजागृती साठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केल्यानं पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांचा तुटवडा होत आहे. यामुळे पेट्रोल डिलर्स संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शहरात आजपासून कोविड लसीकरणाची वेळ दोन तासानं वाढवण्यात आली आहे. आता सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण केलं जाईल असं महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी सांगितलं.

****

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून कानपूर इथं खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सलामीवीर के एल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

****

 

 

No comments: