Tuesday, 4 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय कोविड १९ लसीकरण मोहीमेत मुदत संपलेल्या लसी वापरल्या जात असल्याचे आरोप केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. या प्रकारची वृत्तं चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. लस कंपन्यांनी केलेलं सर्वसमावेशक विश्लेषण आणि माहितीचा अभ्यास यावर आधारित असल्याची खात्री झाल्यावरच, लस वापराला मुदतवाढ दिल्याचा निर्णय घेतल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देय असलेला महागाई भत्ता आणि महागाई सहाय्याला तात्पुरती स्थगिती दिल्याचा दावा करणारा आदेश बनावट असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशा आशयाचा एक आदेश समाजमाध्यमांवरून फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि आव्हानांचा आढावा घेतला. दहशतवाद, जागतिक पातळीवरच्या दहशतवादी संघटना, दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा, सायबर गुन्हे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. केंद्र आणि राज्यांच्या सुरक्षा संस्थांमधला समन्वय वाढवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून, याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. १२ दिव्यांग जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा, काल पुण्यात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

मराठवाड्यात काल ९७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ३७, उस्मानाबाद १८, जालना १४, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दहा, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात दोन रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...