आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या बालकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला
आजपासून सुरुवात झाली. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील,
असं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर लसीकरणासाठी
नोंदणी करता येईल. आतापर्यंत सात लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
औरंगाबाद शहरात किशोरवयीन मुलांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या
नियोजनाचा आढावा घेण्यासाठी, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची
तातडीची बैठक बोलावली आहे.
****
देशाच्या पहिल्या महिला शिक्षक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची
आज जयंती. महिलांच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व वाहून देत, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची
संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
आदरांजली वाहण्यात येत आहे.
****
नांदेड हिंगोली महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर इथून सोलापूरकडे
कामासाठी जाणाऱ्या कामगारांची खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले.
आज पहाटे हा अपघात झाला आहे. जखमींना नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आलं असून, पाच कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
रस्ते अपघातग्रस्तांवर तातडीनं उपचार व्हावेत, यासाठी परभणी जिल्ह्याच्या
पालम तालुक्यात पेठशिवणी इथं ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करावं, अशी मागणी, भाजपचे पालम
तालुका सरचिटणीस भगवान करंजे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली आहे. पेठशिवणी
इथं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आलं असून, या इमारत बांधकामासाठी पाच एकर
जमीन देण्यात आली आहे. शिल्लक जागेत ट्रामा केअर सेंटर उभारल्यास, या परिसरात अपघातग्रस्तांना
तत्काळ उपचार मिळतील, असं करंजे यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा कसोटी सामना आजपासून जोहान्सबर्गमध्ये
सुरू होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं एक
- शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment