Wednesday, 2 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभेत आणि राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होणार आहे. लोकसभेत खासदार हरीश द्विवेदी, तर राज्यसभेत गीता शक्य हा प्रस्ताव सादर करणार आहेत. 

****

केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून एक लाख ३७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ४०० नव्या वंदे भारत रेल्वे गाड्या पुढच्या तीन वर्षांत सुरू करण्यात येणार आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दोन हजार किलोमीटरचं रेल्वे मार्गांचं जाळं कवच या योजनेअंतर्गत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महिला लढाऊ वैमानिकांच्या सेवेची प्रायोगिक योजना आता पूर्णवेळ योजनेत रुपांतरीत करण्याचा निर्णय सुरक्षा मंत्रालयानं घेतल्याचं, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. भारताच्या नारी शक्तीच्या क्षमता जाणून घेण्यासाठी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाबद्दलची वचनबद्धता यासाठीचा हा एक प्रयोग असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलं होतं. यामुळे ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत झाला आहे.

****

कणकवली इथले शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्जही सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं काल फेटाळून लावला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं राणे यांना दहा दिवसांचा दिलासा दिला आहे, यामुळे त्यांना काल अटक झाली नाही.

****

नेपाळमध्ये झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ ऍथलेटीक्स स्पर्धेत, भारताच्या कलश खंडारे यानं भालाफेक क्रीडा प्रकारात, १९ वर्षाखालील गटात सुवर्णपदक पटकावलं. कलश हा अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...