Tuesday, 22 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

डिसीजीआय अर्थात भारतीय औषध महानियंत्रकांनी १२ ते १८ या वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स या कोविड १९ लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई या कंपनीनं ही लस विकसित केली असून रिसेप्टर बाइंडिंग डोमेन प्रोटीन सब-यूनिट प्रकारची ही पहिलीच स्वदेशी कोविड प्रतिबंधक लस आहे. 

****

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. एपीएमसी प्रशासनाच्या पुढाकाराने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत काल उशीरा झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. या बैठकीत माथाडी कामगारांनी ५३ किलोपर्यंतच्या गोणी उतरवण्यासाठी मान्यता दिली आहे. तसंच ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी मागवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन बाजार समिती प्रशासनानं दिलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातून लांब पल्ल्याच्या काही बस सुरु करण्यात आल्या आहेत. यात पुणे, अकोला, औरंगाबाद, बीड, लातूर, हिंगोली, तसंच अंबड, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, वसमत, सेलू, सोनपेठ आणि हिंगोली या मार्गांचा समावेश आहे. प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन आगार व्यवस्थापकांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध हटवले जाणार आहेत. यासंदर्भातला प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.

****

भारताचा १६ वर्षांचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं जगज्जेत्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पराभूत केलं आहे. प्रज्ञानंदनं काळ्या मोहऱ्यांसह खेळताना कार्लसनला ३९ चालींत पराभूत करण्याची किमया साधली. या पराभवामुळे कार्लसनची सलग तीन विजयांची मालिका खंडित झाली. कार्लसनवर मात करणारा प्रज्ञानंद हा केवळ तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याच्याआधी विश्वनाथन आनंद आणि पी. हरिकृष्णा यांनी ही कामगिरी केली होती.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...