Friday, 4 February 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया वेगानं सुरु -केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल

·      दहावी -बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन होणार- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण

·      मनमाड - मुदखेड - ढो  रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी २२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

·      राज्यात ओमायक्रॉनचा एकही वा रुग्ण नाही, कोविड संसर्गाचे १ हजार २५२ नवे रुग्ण, मराठवाड्यात १२ जणांचा मृत्यू तर एक हजार ४६९ बाधित

·      नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं आवाहन

आणि

·      एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धेविजेतेपदासाठी उद्या भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध सामना  

****

मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, यासाठीची प्रक्रिया वेगानं सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देतांना मेघवाल यांनी ही माहिती दिली. यासाठीचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्तावावरचा भाषा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे पाठवला होता. तिथे या अहवालातल्या त्रुटींची पूर्तता झाली आहे. आणि आता हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजपाचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनीही या विषयावर झालेल्या चर्चेत भाग घेतला.

****

राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिलदरम्यान होणार आहे, त्याची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा चार ते ३० मार्च दरम्यान होणार असून, १४ फेब्रुवारी ते तीन मार्च प्रात्यक्षिक परीक्षा होईल, अशी माहिती गोसावी यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल, असं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परिक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धातास, तर ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. सर्व परिक्षा केंद्रांवर, कोरोना विषाणू संसर्गामुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल. एखादा विद्यार्थी आजारी पडला, किंवा अपरिहार्य कारणामुळे तोंडी परीक्षा, अंतर्गत तसंच तत्सम मूल्यमापन, प्रात्यक्षिक- सादर करु शकला नाही, तर लेखी परीक्षेनंतर त्याला यासाठी पुन्हा संधी दिली जाईल. संसर्गामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या काळात पुन्हा परीक्षा देण्याची संधी देणार असल्याचंही गोसावी यांनी सांगितलं. बोर्डाच्या परिक्षेसाठी कोविड प्रतिबंधक लस बंधनकारक नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

****

मनमाड - मुदखेड - ढोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं २२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी दिली. त्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना, अर्थसंकल्पातल्या तरतुदींची माहिती दिली. रेल्वे मार्ग विद्युतीकरणासाठी पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजनाथ या मार्गासाठी १२९ कोटी रुपये, परळी वैजनाथ - विकाराबादसाठी १०९ कोटी रुपये, पुर्णा - अकोलासाठी १०३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिणमध्य रेल्वेसाठी नऊ हजार १२५ कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असल्याचं किशोर यांनी सांगितलं.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही वा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ झाली असून, यापैकी एक हजार ९२९ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे हजार २५२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७ लाख ६८ हजार ८०० झाली आहे. काल रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ८५९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८ शतांश टक्के आहे. काल हजार ३५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७ लाख ६३ हजार ८६८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९ पूर्णांक ०७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख ५८ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ४६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर  १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, नांदेड आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ३३२ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात २२७, नांदेड २०५, उस्मानाबाद २००, जालना १४४, हिंगोली १२९, परभणी १२२, तर बीड जिल्ह्यात १४९ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा,सं  आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल काल औरंगाबाद दौऱ्यावर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाड्याचं वनक्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, इको-बटालियनच्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल म्हणाले. मानव विकास कार्यक्रम, मराठवाडा विकास मंडळ, रेड क्रॉस सोसायटीने केलेलं सामाजिक कार्य, जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेले उपक्रम आदींचं सादरीकरण राज्यपालांसमोर यावेळी करण्यात आलं.    

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अवैध परवाने, बनावट जात प्रमाणपत्र आणि आर्यन खान प्रकरणात सतत आरोप केल्यामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.   

****

किराणा दुकानात वाईन विक्री कारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात, `ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमीन` `एमआयएम`च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरातल्या क्रांतीचौक इथं काल धरणे आंदोलन केलं. राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकावत या कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनं केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू, इतर गौण खनिज संपत्तीची चोरी थांबवण्यासाठी महसूल प्रशासन आता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत या संपत्तीवर लक्ष ठेवत आहे. या भागातली ही चोरी रोखण्यासाठी `ड्रोन` कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरू आहे. तहसीलदार महेंद्र गिरमे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह या भागातल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी `ड्रोन` द्वारे नदी पात्राची निगराणी करत आहेत.

****

शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती, वेतनासह अन्य सर्व प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी, संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या विभागातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत कार्यक्रमनिहाय बाबींचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ आणि शिधापत्रिकेचं वाटप काल करण्यात आलं. नोंदणीकृत असलेल्या देह विक्रय करणाऱ्या ४५ महिलांना शिधापत्रिकेचं वाटप, तसचं ४० महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात या महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी शासकीय बालगृह, वसतीगृहामध्ये मोफत व्यवस्था, विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांना कायदेशीर मदत दिली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघाची लढत उद्या इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतानं उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९६ धावांनी सहज मात करत अंतिम लढतीत स्थान मिळवलं. इंग्लंड संघानं उपांत्य सामन्यात अफगाणीस्तानवर विजय मिळवला आहे. भारतीय एकोणीस वर्षाखालील संघ सलग चौथ्यांदा विश्र्व चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.  

****

लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते पानगाव मोड या सिमेंट मार्गाला तडे गेल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित संस्थेला नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासंबधी काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित एजन्सीला पत्र पाठवून तात्काळ खुलासा करण्यास सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या सुलीभंजन रस्त्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागानं एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. सुलीभंजन हे जवळपास ४०० फुट उंच असलेलं थंड हवेचं ठिकाणं म्हणून ओळखलं जातं. मात्र खुलताबाद ते सुलीभंजन या सहा किलोमीटर असलेल्या रस्त्याची चाऴणी झाल्यानं पर्यटकांची संख्या घटत चालली असल्याचं, आमदार चव्हाण यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. या पर्यटनस्थळाच्या विकासाला चालना देण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पात्र अनुदानासाठी शासनाला शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर योजना सन २०२१-२२ या वर्षासाठी राबण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...