Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 March 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
केंद्र
तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ.
·
सध्या
तरी मास्कमुक्तीचा विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट.
·
औरंगाबाद
इथं रेल्वेच्या पीटलाईनसाठी खासदार आमदारांचा दिल्लीत पाठपुरावा.
आणि
·
अजिंठा
इथं तीन किशोरवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू.
****
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे.
यामुळे आता महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. केंद्र सरकारचे ४७ लाख ६८ हजार कर्मचारी
तसंच ६८ लाख ६२ हजार निवृत्ती वेतन धारकांना लाभ होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यातही तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णय
आज जारी करण्यात आला. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना २८ टक्क्यांऐवजी ३१ टक्के दराने महागाई
भत्ता दिला जाणार आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या
कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२१
पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होईल. नऊ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता
मार्च महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याची सूचना करण्यात आली आहे. असुधारित वेतन
संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १ जुलै ते ३० सप्टेंबर
२०२१ या कालावधीत महागाई भत्त्यातली २५ टक्के वाढीची थकबाकीही मंजूर करण्यात आली आहे.
****
जगभरातल्या काही देशात कोरोनाची
चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आज यासंदर्भात वार्ताहरांशी बोलताना
टोपे यांनी, कोरोनाचा प्रदुर्भाव आणखी कमी झाला तर, आपतकालीन कायदा मागे घेण्याबाबत
सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा
यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली तर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची विनंती केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
जयंती उत्साहात साजरी करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आाहे, पण शिस्तबद्द पद्धतीनं
ही जयंती साजरी करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
****
दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक
मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा निर्णय आज जारी करण्यात आला. आता यापुढे महाराष्ट्रातल्या
सर्व दुकानं तसंच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार
आहे. ज्या दुकाने किंवा आस्थापनांमध्ये मद्य पुरवलं जातं किंवा मद्य विकलं जातं अशा
दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावं लिहिता
येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं रेल्वेच्या
पीटलाईनसाठी खासदार आमदारांकडून दिल्लीत पाठपुरावा करण्यात आला.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज
जलील यांनी औरंगाबाद इथं प्रस्थावित रेल्वे पीटलाईन जालना इथं स्थलांतरण करु नये अशी
मागणी आज लोकसभेत केली. तसंच शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे पटरीच्या भुयारी मार्गाचं
प्रलंबित काम त्वरीत सुरु करण्याबाबत लोकसभेत मुद्दा उपस्थित करुन कामास होणाऱ्या विलंबनाबाबत
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितलं.
औद्योगिक तसंच पर्यटनाच्या
दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे मराठवाड्यातले प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीने
मार्गी लावावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी आज दिल्लीत दानवे यांची
भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प
पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
जालना इथं ‘पीटलाइन’ जरूर करावी मात्र औरंगाबाद इथंही ‘पीटलाइन’ झाल्यास ते मराठवाड्याच्या
फायद्याचं ठरणार असल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब
दानवे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी
लावले जातील असं आश्वासन दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात
कार्यरत निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना निलंबित करण्यात आलं आहे. तत्कालीन
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी असतांना हदगल यांनी धुळे - सोलापूर राष्ट्रीय
महामार्ग २११ च्या भुसंपादनामध्ये गंभीर स्वरुपाची अनियमितता केल्याचं निदर्शनास आल्यानं
त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत हदगल यांना जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांच्या संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं या आदेशात नमूद आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी पत्र लिहिलं आहे. कोरोना काळामुळे किमान समान कार्यक्रम राबवणे शक्य झालं
नाही, परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपली आहे. त्यामुऴे किमान समान कार्यक्रम
पुन्हा राबवण्यात यावा. दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजना
आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
मुंबै बॅँक फसवणूक प्रकरणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात आज आम आदमी पक्षाच्या
वतीनं मुंबईत प्रविण दरेकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. दरेकर यांनी
राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा
प्रयत्न केला, बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
प्रलंबित सेवा विषयक मागण्या
मान्य न झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं आंदोलनाचा
इशारा दिला आहे. एक एप्रिलला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे
आंदोलन, तसंच १८ एप्रिलला रजा टाकून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास चार मे पासून बेमूदत कामबंद आंदोलनाचा
इशारा संघटनेनं दिला आहे.
****
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
झोपेची अथवा इतर औषधांची विक्री करणाऱ्या औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित
करण्याची सूचना अन्न-औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहरात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतच्या
बातम्यांची गंभीर दखल घेत, यड्रावकर यांनी, यासंदर्भात प्रशासनानं पोलीस विभागाशी समन्वय
साधून कडक कारवाईचे निर्देश दिले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा
इथं तीन किशोरवयीन मुलांचा आज शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे सोळा वर्ष वयाची
ही तिन्ही मुलं दहावीची परीक्षा झाल्यानंतर शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता बुडून
मरण पावल्याचं, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद
इथं आज सव्वा चार लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सय्यद अजिम सय्यद युनूस
याने त्याच्या घरात गुटख्याचा बेकायदेशीररित्या साठा करुन ठेवला होता. अन्न औषध प्रशासन
विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकासह छापा टाकून
गुटख्याचा साठा आणि आरोपीला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद पोलिसांनी आज शहरात
तलवारीचा मोठा साठा जप्त केला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका खासगी कुरिअर
कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून, कुरिअरमार्फत आलेल्या ३७ तलवारी आणि एक कुकरी पोलिसांनी
जप्त केली.
****
राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक
निवडताना निकषांच्या पातळीत नव्याने बदल करून परीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. सांस्कृतिक
विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आज सोलापूर इथं ही माहिती दिली
****
नांदेड जिल्ह्यात हेल्मेट
सक्ती करण्यात आली आहे. एक एप्रिल २०२२ पासून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास
करावा अशी सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कार्यालयात जाऊन केली आहे.
****
No comments:
Post a Comment