Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेच्या
७२ सदस्यांना त्यांचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर आज निरोप देण्यात आला. येत्या एप्रिल ते जुलै दरम्यान
हे सर्व सदस्य निवृत्त होत आहेत. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या
सर्व सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. क्लीष्ट समस्या सोडवतांना अनुभव महत्वाची भूमिका
बजावतो असं ते म्हणाले. राज्य सभेच्या सदस्यांचा अनुभव हा खूप मोठा असून अनेक प्रसंगी
ज्ञानापेक्षा अनुभव सरस ठरतो असं सांगून या सर्व सदस्यांनी आपले अनुभव शब्दात नमूद
करावेत जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठी ते आदर्श ठरतील, असं ते म्हणाले.
****
कायम
खाते क्रमांक - पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत आज संपणार आहे.
जर हो दोन्ही क्रमांक एकमेकांशी जोडले नाही तर एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा
त्याच बरोबर पॅन क्रमांकही रद्द केला जाईल, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ -सीबीडीटीच्या
सूचनेत म्हटलं आहे. मात्र दंड भरून पॅनकार्ड पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकेल.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक
आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणू संकटाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर,
सध्या देशात शाळा- महाविद्यालयांमध्ये वार्षिक परीक्षांचा काळ सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी
तणाव विरहित परिस्थितीत परीक्षेला सामोर जावं यासाठी, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद
साधणार आहेत.
****
देशव्यापी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८४ कोटी लस मात्रांचा टप्पा पार केला. काल दिवसभरात
लसीच्या २२ लाख २७ हजारांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
म्हटलं आहे. १२ ते १४ वर्षं वयोगटातल्या १ कोटी ५९ लाख मुलांनी लसीची पहिली मात्रा
घेतली आहे. तर एकंदर २ कोटी ३० लाख आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ६० वर्षांवरच्या
नागरिकांना लसीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे. १५ ते १८ वर्षं वयोगटात आत्तापर्यंत
लसीच्या ५ कोटी ७० लाखांहून जास्त पहिल्या मात्रा तर ३ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त दुसऱ्या
मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रशासित
प्रदेश पाँडेचरी कोरोना विषाणूमुक्त झाला आहे. गेल्या फेब्रुवारीपासून तिथं कोविड रूग्णामध्ये
घट दिसून येत होती. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रदेशाच्या चारी क्षेत्रात कोविडचा
एकही रूग्ण आढळून आलेला नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या कोविड लसीकरणामुळं हे शक्य
झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
अंमलबजावणी
संचालनालय- ईडीनं आज नागपूरमधील प्रसिद्ध विधीज्ञ सतीश उके यांच्या निवासस्थानी छापे
मारले. सकाळपासून इडीचं पथक त्यांच्या घराची झडती घेत आहे. उके यांचे राजकीय नेत्यांशी
घनिष्ट संबध आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या विरूद्ध याचिका दाखल केल्यामुळं ते चर्चेत आले होते.
****
वीज
मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट
इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी
महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी तसंच वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत
यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे
निर्देश दिले आहेत. विषयाबद्दल सखोल माहिती
घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबादमधील महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकांना
दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
तीन
लाखापर्यंतचं पिक कर्ज घेऊन ते नियमित परतफेड केलेल्या सांगली जिल्ह्यातल्या २१ हजार
शेतकऱ्यांना व्याज सवलत म्हणून ३ कोटी ३७ लाख रुपये राज्य सरकार कडून प्राप्त झाले.
डॉ. पंजाबराव देशमुख योजने खाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ही रक्कम जमा झाली
आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा केली जाणार असल्याचं बँकेच्या
सूत्रानं सांगितलं.
****
आठ
वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जळगावच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं
मरेपर्यंत जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातल्या धरणगाव
तालुक्याच्या एकलग्न इथला हा आरोपी आहे. अत्याचार झालेली मुलगी गतिमंद असल्यानं मूकबधीर
विद्यालयाच्या शिक्षकांच्या मदतीनं सांकेतिक भाषेद्वारे तिची साक्ष नोंदविण्यात आली
होती.
****
No comments:
Post a Comment