आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ मार्च २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र
सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
बजावणाऱ्या ३६ व्यक्तींना आज नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत
यांच्या हस्ते विशेष राष्ट्रीय जल प्रवाह सन्मान २०२२ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आलं. यात महाराष्ट्रातून नांदेड ईथले जलमित्र दिपक मोरताळे आणि प्राध्यापक डॉक्टर सुनंदा
मोरताळे यांचा समावेश आहे. मोरताळे पती पत्नी यांनी नद्यांच्या दुषित पाण्यावर संशोधन
करून जैविक पध्दतीने जलप्रदूषण कमी करण्यात यश मिळविले आहे.
****
महात्मा
गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत कामासाठी दिल्या जाणाऱ्या
दैनंदिन मजुरीत वाढ करण्यात आली असून, उद्यापासून देशभर त्याची अंमलबजावणी केली जाणार
आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मनरेगाच्या दैनंदिन मजुरीत पूर्वीच्या २४८ रुपयांवरून
२५६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विविध राज्यात या मजुरीचे दर वेगवेगळे असून
सिक्कीमच्या तीन ग्राम पंचायत हद्दीत तो दर सर्वाधिक म्हणजे ३३३ रुपये आहे तर मध्य
प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सर्वात कमी म्हणजे २०४ रुपये आहे.
****
येत्या
तीन ते चार दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत
वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यात काल सर्वात
जास्त ४३ पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. जळगाव जिल्ह्यात पारा
४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. मराठवाड्यातही काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असून,
नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
राज्यात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्या एक एप्रिलपासून मास्क वापरण्याची
सक्ती वगळता सर्व निर्बंध हटवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं घेण्यात येईल,
असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
उद्यापासून आपत्कालीन कायदा मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले.
मात्र जगभरातल्या काही देशात कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही
विचार राज्य सरकार करत नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं
निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली, तर निर्बंध शिथील
करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची त्यांनी विनंती
केली.
****
कोल्हापूर
मुंबई महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्या एप्रिल महिन्यापासून विद्युत
इंजिनवर धावणार आहेत. कोल्हापूर - मिरज ते पुणे या ३२८ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. ही रेल्वे
चालवण्यासाठी पुणे विभागातील ५५ चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. महालक्ष्मी, कोयना
एक्सप्रेस विद्युत इंजिनासह धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व एक्सप्रेस पॅसेंजर,
मालगाड्यांसाठी विद्युत इंजिन असणार आहे.
****
पंढरपूरच्या
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पदस्पर्श दर्शन, गुढीपाडव्यापासून
पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित
पवार यांची भेट घेऊन यावर चर्चा केली.
****
No comments:
Post a Comment