Monday, 28 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशभरातले कामगार आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत असल्याचं राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कामगार संघर्ष समितीनं कळवलं आहे. राज्यातल्या सहा जलविद्युत केंद्रांचं खासगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याच्या निर्णयाविरुद्ध हा संप पुकारल्याचं समितीनं म्हटलं आहे. सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी होत आहेत.

दरम्यान, वीजनिर्मिती, पारेषण, वितरण या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनं मध्यरात्रीपासून मेस्मा कायदा लागू केला आहे.

****

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते प्रमोद सावंत आज शपथ घेत आहेत. गोव्यातल्या श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानात हा सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रींमडळातले मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित आहेत.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रतीलिटर, तर डिझेलच्या दरात ३५ पैसे प्रतीलिटरने वाढ झाली आहे. एका आठवड्यात सहाव्यांदा ही दरवाढ झाली आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या सावखेडा गंगा इथं काल एका बिबट्यानं दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. हे शेतकरी दुचाकीवरुन शेतात पाणी देण्यासाठी जात होते. शुभम खटाने आणि अरुण होसाळे अशी जखमी शेतकऱ्यांची नावं आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी तालुक्यातल्या गोरठा इथल्या श्री संत कवी दासगणू महाराज साईभक्त मंडळाच्या वतीनं ऊमरी ते शिर्डी पदयात्रा पालखी काढण्यात आली आहे. ही पदयात्रा काल नांदेड शहरात दाखल झाली. ११ वर्षांपासून ही पालखी यात्रा काढली जाते. मात्र कोरोना संसर्गामूळे मागील दोन वर्षांत पालखी पदयात्रा रद्द करण्यात आली होती.

****

मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

No comments: