आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
क्वाड
देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी
जपानची राजधानी टोक्यो इथं दाखल झाले. जपानमधल्या भारतीय नागरिकांनी पंतप्रधान मोदींचं
जोरदार स्वागत केलं. पंतप्रधानांच्या आगमनावेळी अनेक लहान मुलं विविध भारतीय भाषांमध्ये
‘स्वागत’ असं लिहिलेले फलक घेऊन आपल्या पालकांसोबत उभी होती. भारत आणि जपान मधली धोरणात्मक
आणि जागतिक भागीदारी मजबूत करणं हे आपल्या जपान दौऱ्याचं उद्दीष्ट असेल, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
****
विद्यापीठ
अनुदान आयोग - युजीसी च्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा
- नीट साठी ऑनलाईन शुल्क भरण्याची मुदत येत्या ३० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. यूजीसी
चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ही माहिती दिली. २० मे पर्यंत हे ऑनलाईन शुल्क भरण्याची
अंतिम मुदत होती. यूजीसी नेट डिसेंबर-२०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा ८२ विषयांसाठी ऑनलाईन
पद्धतीनं घेण्यात येणार आहे.
****
केंद्र
सरकार पाठोपाठ राज्य सरकारनं काल पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर ‘व्हॅट’मध्ये
कपात केली आहे. पेट्रोलवर दोन रुपये आठ पैसे तसंच डिझेलवर एक रुपया चव्वेचाळीस पैसे
प्रती लिटर कपात करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे अडीच
हजार कोटी रुपये भार पडणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. केंद्र आणि राज्य
सरकारनं कर कमी केल्यामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी तर डिझेलच्या दर ८ रुपये ४४
पैशांनी स्वस्त झाला आहे.
****
भुसावळ
ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी मेमू गाडी पुढील आठवड्यात चार दिवस इगतपुरीला
न जाता, नाशिक पर्यंतच धावणार आहे. इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८
मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ही गाडी
नाशिकपर्यंतच धावणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागीय प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
१८
वर्षांवरील नागरिकांच्या कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा १०० टक्के पूर्ण
करणारी नवी मुंबई ही राज्यातली पहिली महानगरपालिका ठरली आहे. सद्यस्थितीत १८ वर्षावरील
सर्व लाभार्थ्यांना दुसऱ्या मात्रेनंतर नऊ महिने किंवा ३९ आठवड्यांनी वर्धक मात्राही
देण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment