Monday, 25 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  25 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जुलै २०२   सायंकाळी ६.१०

****

·      पुढच्या २५ वर्षात ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करणं आवश्यक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन.

·      लोकसभेत गदारोळ करणारे काँग्रेसचे चार खासदार अधिवेशन काळासाठी निलंबित.

·      ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण विभागाच्या कामकाजाचं ऑडिट करण्याचा केंद्राचा निर्णय.

·      विदर्भ तसंच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा - विरोधी पक्षनेते अजित पवार.

आणि

·      जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९० टक्क्यांवर; आज संध्याकाळपासून पाणीविसर्गात वाढ.

****

पुढच्या २५ वर्षात ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. आपल्या सारख्या आदिवसी महिलेला नगरसेवकापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, ही लोकशाहीची ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतातली गरीब व्यक्ती स्वप्न पाहू शकते आणि ते पूर्णही करु शकते, हाच याचा अर्थ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्या २६ जुलै – कारगिल विजय दिनानिमित्त सैन्य दलांना आणि सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून, द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

****

लोकसभेत गदारोळ करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अधिवेशन काळापुरती ही कारवाई आहे. 

आज सकाळी कामकाजाला सुरुवात होताच, हातात फलक घेऊन या सदस्यांनी महागाई आणि इतर मुद्यांवरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी तीन वाजेनंतर या विषयावर चर्चा घेण्यास तयार असल्याचं सांगूनही गदारोळ थांबला नाही, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या सदस्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार मणिकम टागोर, जोतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन या चौघांना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं.

****

राष्ट्रपती नामनिर्देशित नवनियुक्त राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण इलियाराजा यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी त्यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ दिली. इलियाराजा यांनी तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम् भाषेत अनेक चित्रपटातली गाणी संगीतबद्ध केली आहेत.

****

ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात पर्यावरण विभागाने घेतलेल्या निर्णय आणि कामकाजाचं केंद्र सरकारकडून ऑडिट केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई मुख्यालयाबरोबर औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, ठाणे, आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री होते.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची मोहिम १५ जुलैपासून सुरु केली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात कार्यरत आशा कार्यकर्त्यांनी नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

मधुमती जगताप, मीना केदारे आणि सुनीता प्रदीप नवगीरे यांचा बाईट

 

औरंगाबाद इथले तरुण अभियंते गोविंद काळे यांनीही नागरिकांना मोफत बूस्टर डोस योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.

 

गोविंद काळे यांचा बाईट

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १६ लाख ८२ हजार ३९० नागरीकांचं लसीकरण झालं. ‌देशात आतापर्यंत या लसीच्या २०२ कोटी १७ लाख ६६ हजार ६१५ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

विदर्भ तसंच मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण या मागणीचं पत्र लिहीलं असल्याचं, पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले –

 

मी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा. सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत आहे. आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा दिलासा मिळत नाही. त्याच्यामुळे तातडीनं दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. त्याला तिथं मदत दिली गेली पाहिजे. आणि नेहमीच्या एस डी आर एफच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे मदत करून चालणार नाही.

 

या पार्श्वभूमीवर तातडीनं विधीमंडळाचं अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना विधानसभेत लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून योग्य ती मदत तत्काळ करता येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणीसाठा आज ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या ३६ हजार १२९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर जलविद्युत प्रकल्पातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून होणारा विसर्ग जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायंकाळपासून वाढवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

****

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या प्रचारासाठी शिर्डी इथं साईबाबा महाविद्यालयाच्या प्रांगणात आज ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरूवात करण्यात आली.

दरम्यान, साईबाबा मंदिराच्या प्रांगणात २६ ते २८ जुलै पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील घडामोडींच्या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेसाठी उस्मानाबाद तालुक्यातल्या कनगरा इथल्या एनपीके महिला उत्पादक गटानं, शिवण यंत्रावर तिरंगा ध्वज तयार करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने एक लाख तिरंगा ध्वज निर्मितीचा गटाचा प्रयत्न आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...