Monday, 25 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.07.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी

·      राष्ट्रध्वज रात्रंदिवस फडकावण्यास केंद्र सरकारची परवानगी

·      कोविड काळात फेरी विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे मोठा आधार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र न वापरता निवडणूक लढवून दाखवण्याचं उद्धव ठाकरे यांचं बंडखोर आमदारांना आव्हान  

·      खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार १५ रुग्ण, मराठवाड्यात १३० बाधित

·      जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला रौप्यपदक

·      दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर दोन गडी राखून विजय

आणि

·      पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा ९० टक्क्यांवर, कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता

****

सविस्तर बातम्या

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सव्वा दहा वाजता हा शपथग्रहण समारोह होणार आहे. शपथग्रहणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर त्या राष्ट्रपती भवनाकडे प्रस्थान करतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तीनही सैन्य दलांच्या वतीने मुर्मू यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही यावेळी यथोचित सन्मान केला जाईल.

दरम्यान, कोविंद यांनी काल देशाला उद्देशून निरोपाचं भाषण केलं. एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं या दृष्टीनं देश सज्ज होत असल्याचं, ते म्हणाले. राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी बोलतांना पर्यावरण संवर्धनाची गरज व्यक्त केली. युवकांनी आपल्या मातीशी नाळ जोडलेली असू द्यावी, आपल्या शिक्षकांच्या सदैव संपर्कात राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाकडे कोविंद यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले...

Kovind Byte

कोविड कि वैश्विक महामारी ने सार्वजनिक स्वास्थ सेवा के बुनियादी ढांचे में आौर भी अधिक सुधार की आवश्यकता को रेखांकीत किया है. शिक्षा और स्वास्थ सेवाओं का लाभ उठाते हुये हमारे देशवासी सक्षम बन सकते है, और आर्थिक सुधारों का लाभ लेकर अपने जिवन निर्माण के लिये सर्वोत्तम मार्ग अपना सकते है. मै एक बार फिर सभी देशवासियोंके प्रती हार्दिक कर्तव्यता व्यक्त करता हु भारतमाता को सादर नमन करते हुऐ मे आप सभी के उज्वल भविष्य की मंगल कामना करता हु. धन्यवाद. जय हिंद!

****

केंद्र सरकारनं भारतीय ध्वज संहितेत दुरुस्ती केली असून, मोकळ्या जागा आणि घरांवर रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी दिली आहे. या आधी मोकळ्या जागेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावण्यास मान्यता होती. मात्र आता कुठलाही भारतीय नागरिक राष्ट्रध्वजाचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी तिरंगा फडकवू शकतो. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे राष्ट्रध्वजासोबत आपलं नातं अधिक दृढ होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे.

****

कोविड काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे मोठा आधार मिळाला, अनेक लोकांचे संसार वाचले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत झाली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं डोंबिवली इथं पथ विक्रेत्यांसाठी काल स्वनिधी महोत्सव घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. राज्य शासन लवकरच पुढील शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना त्यांनी, केंद्र शासनाच्या विविध आठ योजनांमुळे अनेक लोकांना लाभ झाला असून, सर्वसामान्यांचं जीवन सुरक्षित करण्याचं काम विमा योजनेमुळे झालं असल्याचं नमूद केलं.

****

शिवसेनेच्या बंडखोरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र न वापरता निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. काल शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी, बंडखोरांविरोधातलं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायदेवतेवर आपला विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचं, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध तालुकाप्रमुखांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची मोहिम १५ जुलैपासून सुरु केली आहे. ही मात्रा सर्वांनी घ्यावी यासाठी, सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. उस्मानाबाद इथले प्रशांत कल्याणी तसंच अर्पणा कवठेकर या नागरिकांनी कोविड लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Byte’s ….

मी प्रशांत कल्याणी अंतर्डी. राहणार उस्मानाबाद. मी आज कोविडची तिसरी लस घेतलेली आहे. अगोदर माझे दोन लस पुर्ण झालेले होते. याबद्दल मी केंद्र सरकारचे आाभार मानत असून, सर्वांनी या लसीचा लाभ घ्यावा, ही माझी विनंती आहे.

 

मी अपर्णा अभिजित कौठेकर. मी उस्मानाबाद इथे राहते. मी कोविशिल्ड लस घेतलेली आहे, आणि आज बुस्टर डोस घेऊन संपूर्ण सुरक्षित झाली आहे. आणि सगळ्यानां आवाहन करते की आपणही बुस्टर डोस लवकरात लवकर घेऊन सुरक्षीत व्हा.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार १५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ३४ हजार २६१ झाली आहे. काल या संसर्गानं सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ६२ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल एक हजार ९१६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ७१ हजार ५०७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १३० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३४, औरंगाबाद ३०, लातूर २९, जालना आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी १३, तर बीड जिल्ह्यातल्या ११ रुग्णांचा समावेश आहे. 

****

उदयपूर, अमरावती तसंच देशातल्या विविध भागात झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट इथून निघालेला हा मोर्चा टिळकपथ, गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक परिसरात विसर्जित झाला. विविध संस्था, संघटना, समाज, पंथ, राजकीय पक्ष, तसंच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, दंडावर काळ्या फीती बांधून उत्स्फुर्तपणे मोर्चात सहभाग घेतला होता.

****

लातूर जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीच्या दहा किलो मीटर काठालगत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते काल वृक्षारोपण करून वृक्ष लागवड मोहिमेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या चौदा गावात १० किलोमीटरची मानवी साखळी, करून २८ हजार वृक्षाची लागवड यावेळी करण्यात आली. यानिमित्ताने वृक्षदिंडीही काढण्यात आली. कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

****

अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं रौप्यपदक पटकावलं आहे. काल सकाळी झालेल्या अंतिम फेरीत नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १३ मीटर भालाफेक करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या यशाबद्दल नीरजने सर्वांनी दिलेल्या सहकार्याने ही कामगिरी करू शकल्याची भावना व्यक्त केली. यापुढे अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला...

Byte….

बहोत अच्छा लग रहा है आज सिल्व्हर जीता है देश के लिये। और अभी अगले साल फिर हमारी वर्ल्ड चॅम्पियनशिप मे कोशिश करेंगे की वहां पर इससे बेहतर करें। और बहोत बहोत थँक यू करता हूं साई का, फेडरेशन का और हमारी गव्हर्नमेंट का, जिन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और बाहर ट्रेनिंग के लिए भेजा है और जिससे मै हर कॉम्पिटीशन खेल सकता हूं बाहर के जो इंटरनॅशनल कॉम्पिटीशन होते है। और आशा करता हूं की ऐसे ही हर स्पोर्ट मे हमको सपोर्ट मिलता रहेगा। और हमारा देश तरक्की करेगा स्पोर्ट्‌स मे।

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल नीरजचं अभिनंदन करत आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजचा हा ऐतिहासिक विजय असून भारतीय क्रीडा विश्वाचा हा मोठा गौरव असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही नीरजचं अभिनंदन केलं आहे.

****

पोर्ट ऑफ स्पेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर दोन गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघानं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३१२ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतानं निर्धारित षटकात आठ गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला तिसरा सामना बुधवारी खेळला जाणार आहे.   

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात ६२ हजार ३६५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत होती. धरणाच्या उजव्या कालव्यातून ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर जलविद्युत प्रकल्पातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यास, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान मराठवाड्यात काल सर्वत्र पावसाची संततधार सुरु होती. लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणातला पाणीसाठा ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जालना, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यातही काल दिवसभर पाऊस सुरु होता.

विदर्भात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथल्या एका औषधी दुकानात विनापरवाना तसंच कोणतीही बिलं न देता गर्भपात, शक्तिवर्धक गोळ्यांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत जवळपास पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दुकान मालक मुकेश मलप्पा सौंदर्गे आणि त्याचा साथीदार निर्दोषकुमार विजयकुमार गोसावी या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

राज्यात शिक्षक भरती तत्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल औरंगाबाद इथं या संदर्भात पत्रकार परिषदत घेतली. शासनानं शिक्षकांच्या जागा राज्य सेवा आयोग -एमपीएसीसी द्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एमपीएससीद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्याला विलंब होणार असल्यानं शासनानं तातडीनं शिक्षक भरती करण्याची मागणी माजी आमदार विजय गव्हाणे यांनी यावेळी केली.

****

भागवत धर्माची पताका देशभर पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं काल कामिका एकादशी अर्थात परतवारी निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

****

No comments: