Thursday, 1 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  01 September    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      देशात तयार करण्यात आलेल्या गर्भाशयाच्या कर्क रोगावरच्या पहिल्या लशीच्या सर्व चाचण्या पूर्ण.

·      कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपयांचं इनाम देण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेची घोषणा.

·      व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात.

·      तासगावच्या श्री गणेशाचा २४३ वा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, राज्यात दिड दिवसाच्या गणपतीला निरोप.

आणि

·      पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणी विसर्गात वाढ, औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस.

****

देशात तयार करण्यात आलेल्या गर्भाशयाचा कर्क रोग- सर्व्हायकल कॅन्सरवरच्या पहिल्या लशीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटनं तयार केलेली ही एच पी व्ही लस सर्वसामान्य भारतीय नागरिकाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले. महिलांच्या आरोग्यावर आता लक्ष केंद्रीत केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रानं एकत्रितरित्या काम केलं तर देश स्वयंपूर्ण होऊ शकतो, असं ते म्हणाले.

****

महिला आणि बाल विकास मंत्रालय आजपासून संपूर्ण देशभर पाचवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करत आहे. ‘महिला और स्वास्थ्य आणि बच्चा और शिक्षा’ या कार्यक्रमांतर्गत हा महिना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून साजरा होत असून ग्रामपंचायतींना पोषण पंचायत म्हणून ओळखलं जाणार आहे. राष्ट्रीय पोषण महिन्याच्या माध्यमातून पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुपोषित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी या योजनेद्वारे जन आंदोलनाला लोकसहभागामध्ये परिवर्तीत करुन पोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. सहा वर्षांखालील मुलं, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तन्यदा माता यांच्या पोषणासाठीच्या या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांनी ८ मार्च २०१८ रोजी राजस्थानच्या झुनझुनु या गावातून केला होता.

****

राज्यातही ठाण्यात राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलतांना लोढा यांनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगितलं.

****

नांदेडमध्ये आज राष्ट्रीय पोषण अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी - प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियाना अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून ते प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन घुगे यांनी यावेळी केलं.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा- एनआयएनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा केली आहे. दाऊदचा हस्तक छोटा शकील वर २० लाख रुपयांचं तर त्यांच्या अन्य तीन हस्तकांची माहिती देणाऱ्यांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं असल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.

दाऊद आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवायांमधे सहभागी असून लष्कर-ए- तय्यबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत.

****

व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैसे, कोलकात्यात १०० रुपयांनी, तर मुंबईत ९२ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडर एक हजार ८४४ रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती एल पी जी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

****

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आर्थिक मदत देण्याची तयारी आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं दर्शवली आहे. यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर दोन पूर्णांक नऊ दशांश अब्ज डॉलर्स एवढ्या मदतीची तयारी नाणेनिधीनं दर्शवली आहे.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथल्या देशातल्या पहिल्या बांबू वाटिकेची पाहणी केली. बांबूची लागवड करणारे प्रगतशील शेतकरी प्रशांत दाते यांनी ही बांबू वाटिका सुरू केली आहे. या वाटिकेमध्ये देशातील सर्वाधिक बांबू प्रजातींचे संकलन करण्यात आले असल्याची माहिती दाते यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

****

सांगली जिल्ह्यात तासगावच्या श्री गणेशाचा २४३ वा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा रथोत्सव पाहण्यासाठी विविध राज्यातले शेकडो भाविक तासगाव इथं आले होते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यापूर्वी तासगाव मध्ये गणेशोत्सव आणि रथोत्सव साजरा केला जातो. मराठा साम्राज्याचे सेनापती परशुराम पठवर्धन यांनी शके १७०० मध्ये तासगाव मध्ये उजव्या सोंडेच्या सिद्धीविनायकाची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून रथोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो. तीन मजली लोखंडी सागांड्यावर लाकडी कोरीव काम केलेल्या रथामध्ये १२१ किलो वजनाची पंचधातूची उत्सवमूर्ती ठेवली जाते, रथाला जोडलेल्या दोराच्या सहाय्याने शेकडो भाविक हा रथ ओढतात. शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही मिरवणूक काढली जाते.

****

दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेनं जागोजागी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनी देखील कृत्रिम तलावामध्ये विसर्जनाची व्यवस्था केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरात विसर्जनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या विविध भागात आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर, खुलताबाद, गल्ले बोरगाव, पैठण आदी ठिकाणी हा पाऊस झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात आली आहे. धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटावरुन एका फुटावर स्थिर करण्यात आले असून, त्यातून चार हजार १९२ आणि सांडव्याद्वारे चौदा हजार ६७२, असे एकूण १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणोयनं गतविजेत्या लो कियान येव चा २२ - २०, २१ - १९ असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. प्रणोयचा पुढचा सामना नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या चाऊ तिएन चेन सोबत होणार आहे. भारताचा दुसरा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत ह्यानं ली झ्याय जिया वर मात करत पुढची फेरी गाठली आहे. त्याचा पुढच्या फेरीतला सामना केन्टा त्सुनेयामा सोबत होणार आहे.

****

नाशिक महापालिकेच्या शहर बस वाहतुकीच्या वाहकांनी आज सकाळी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्यामुळं जवळपास साडे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. प्रलंबित वेतन मिळावं तसंच तिकीट चेकर कडून होणारी चुकीची कारवाई थांबवावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळं प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान, उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सात दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर साडे नऊ वाजता वाहक कामावर आले, त्यानंतर बस सेवा सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनं आज धुळे इथं महागाई विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. सत्ताधारी भाजप - शिंदे गटाच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

****

No comments: