Wednesday, 5 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

                         Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 October 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आज शक्तीप्रदर्शन

·      राज्यातल्या पावणे दोन कोटी शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयात शिधा वस्तुंचे दिवाळी पॅकेज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देण्यासाठी ११ हजार ७३ रुपयांच्या सुधारित खर्चाला, राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

·      लम्पी चर्मरोगानं बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना सरसकट नुकसान भरपाई

·      गुजरातमधल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ७२ पदकं

·      आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरात संघावर १०४ धावांनी विजय तर दक्षिण आफ्रिकेविरुद्च्या तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ४९ धावांनी पराभव 

   आणि

·      लातूर - उदगीर रस्त्यावरच्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू

****

 

 

 

 

विजयादशमीनिमित्त मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट आज वेगवेगळे मेळावे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला गट शिवसेनेच्या परंपरेनुसार शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला गट बांद्रा कुर्ला संकुलातल्या मैदानात आपला पहिला दसरा मेळावा घेणार आहे. खरी शिवसेना कोणाची या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मुंबईत पोहोचत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरात रेशीमबाग मैदानावर होणार आहे. मुख्य कार्यक्रम सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी सुरू होणार असून, त्यापूर्वी पथसंचलन होत आहे. यंदा या कार्यक्रमाला प्रसिद्ध गिर्यारोहक संतोष यादव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सहसचिव पंकजा मुंडे या देखील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव इथं दसरा मेळावा घेणार आहेत. तर भगवानगड कृती समितीच्या पुढाकारानं गडाच्या पायथ्याशी दुसरा मेळावा होणार आहे.

हिंगोली इथं १६८ वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची रावण दहनानं सांगता होणार आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमीला नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होतो. ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम काल स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते झाला. थायलंडच्या बौद्ध भिक्खू संघाद्वारे दीक्षाभूमीला देण्यात आलेल्या ५६ फूट उंच बुद्ध मुर्तीच्या स्थापनेसाठी जागेचं भूमीपूजनही यावेळी करण्यात आलं. दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तुपात आज सकाळी नागार्जून सुरेई ससाई सामुहिक बुद्‌धवंदना घेतील. संध्याकाळी  धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

****

नवरात्रौत्सवाचा आज विजया दशमीनं समारोप होत आहे. काल महानवमीला ठिकठिकाणी षड्‌रस भोजनाचा नेवैद्य दाखवून घटोत्थापन करण्यात आलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या. दसरा हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय दर्शवतो, तसंच लोकांचा धर्मावरचा किंवा नैतिकतेवरचा विश्वास जागृत करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला दसराच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आनंदाची लयलूट करण्याऱ्या या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, जनतेला सुख-समृद्धी लाभावी, दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद आणि सकारात्मकता सर्वांना लाभावी, असं म्हटलं आहे.

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विविध माध्यमातून साजरा होतो. शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन, सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, सीमोल्लंघन, या पारंपरिक सांस्कृतिक कारणांबरोबरच राजकीय आणि सामाजिक संघटनांचे महत्त्वाचे कार्यक्रमही या दिवशी होत असतात.

****

राज्यातल्या पावणे दोन कोटी शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयात शिधा वस्तुंचं दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रालयात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यशिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ आणि साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल दिलं जाणार आहे. यासाठी ५१३ कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. या वस्तूंचा पुरवठा दिवाळीपूर्वी करावा, आणि नागरिकांकडून कुठल्याही तक्रारी येणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला दिले आहेत.

पोलिस दलातल्या अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचा, तसंच नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापनातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देण्यासाठी या प्रकल्पाच्या ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला, कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा, आणि उमरगा तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी या आठ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.

या योजनेमुळे तुळजापूर तालुक्यात पांगरदरवाडी आणि रामदरा साठवण तलावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेतून मराठवाड्याच्या हक्काचं २३ पूर्णांक ६६ टीएमसी पाणी २०२४ पर्यंत मिळणं अपेक्षित असून, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातलं २३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या सेवा पंधरवड्याला पाच नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं काल घेतलं.

****

गेल्या सरकारच्या कार्यकाळात त्रुटींमुळे अनुदानास अपात्र ठरवलेल्या १९१ शाळांना अनुदान देण्याची एक संधी राज्य सरकारनं देऊ केली आहे. तसंच दोनशेहून अधिक शाळांच्या वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. संबंधित शाळांना १५ दिवसांत त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालय -ईडीने दाखल केलेल्या एका प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. मात्र, ईडीने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे उच्च न्यायालयानं या जामिनाला येत्या तेरा तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे.

****

 

 

ुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळ - एसटीतल्या, २०१९ च्या चालक आणि वाहक पदाच्या भरतीतल्या सत्तावीस पात्र पुरूष उमेदवारांना नेमणुकीचं, आणि बावीस पात्र महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षणाचं पत्र काल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.

****

लम्पी चर्मरोगानं बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल, असं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या रोगाच्या नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथील करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गठित राज्यस्तरीय कार्यदलाच्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४०७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २२ हजार ८३९ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यु झाला, तर ४२९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७१ हजार ७७५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ, औरंगाबाद सात, जालना दोन, तर लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

गुजरात इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र २० सुवर्ण, १७ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांसह एकूण ७२ पदकं जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.

जलतरणच्या ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अवंतिका चव्हाण हिनं सुवर्ण पदक पटकावलं, तर टेनिस महिलांच्या दुहेरीत वैष्णवी आडकर आणि ऋतुजा भोसले यांनीही सुवर्ण पदकाची कमाई केली. खो-खो मध्ये देखील राज्याच्या पुरुष आणि महिला संघानं सुवर्ण पदक जिंकलं आहे.

तलवारबाजीत महाराष्ट्राच्या संघानं एक रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली.

राज्याच्या पुरुष स्क्वॉश संघानं सेनादलाच्या संघाला दोन - एकनं पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. तर महिला संघानं कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या हायबोर्ड डायव्हिंगमध्ये ओम अवस्थी यानं कांस्यपदक जिंकलं.

हॉकीतील पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघानं उपांत्यपूर्व फेरीत हरियाणा संघावर ३-१ असा विजय नोंदवला.

****

बांगलादेशात सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरात संघाचा १०४ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, वीस षटकांत पाच बाद १७८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करणारा युएईचा संघ वीस षटकांत चार बाद ७४ धावाच करू शकला.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान काल इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताचा ४९ धावांनी पराभव केला. भारतानं ही मालिका दोन - एकनं जिंकली आहे. काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं २२८ धावांचं लक्ष्य साध्य करताना भारताचा संघ १७८ धावातच सर्वबाद झाला.

दोन्ही संघादरम्यान येत्या गुरुवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना लखनौ इथं खेळला जाणार आहे.

****

लातूर - उदगीर रस्त्यावर लोहारा गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस आणि एका चारचाकी गाडीच्या झालेल्या अपघातात, चारचाकीतल्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. उदगीरमधल्या एका बाल रुग्णालयातले पाच कर्मचारी तुळजापूरहून दर्शन घेऊन परत येताना हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा ग्रामपंचायतचे सरपंच ओम कदम यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराला वारंगा ग्रामपंचायतच्या हद्दीत पोल्ट्री फार्म सुरू करण्याकरता ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र आणि लोकसंख्या प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

वंजारी समाजाला भटक्या जमाती प्रवर्गातून इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी या समाजातल्या तरुणांनी शासनाचा पाठपुरावा करावा, असं आवाहन, भाजपा नेते ज्ञानोबा मुंढे यांनी केलं आहे. संत भगवान बाबा विवेक विचार मंचच्या वतीनं औरंगाबाद शहरात वंजारी समाज विचार मंथन मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वंजारी विकास मंडळाच्या वतीनं औरंगाबाद शहरात वसतीगृह बांधण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं.

****

निवडणूक ओळखपत्राशी आधारपत्र जोडणी करण्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी यासाठी नांदेड जिल्हा निवडणूक विभाग फिरत्या वाहनांद्वारे विशेष प्रसिद्धी मोहीम राबवत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते काल दोन डिजिटल व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी करण्यासाठी जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखा आणि शिल्लेगाव पोलिसांनी गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव हद्दीत एका खाजगी फार्म हाऊसमध्ये जुगार खेळणाऱ्या लोकांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पंचवीस लाख रुपये रोख रक्कम तसंच पाच चारचाकी लक्झरी गाड्यांसह एक कोटी ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या लोकांमध्ये जिल्ह्यातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अल्पसंख्यक समाजातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी  २०२२-२३ या वर्षासाठीच्या  प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास येत्या पंधरा तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कॉलरशीप्स डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असं आवाहन नांदेडच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या शेतक-यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक उद्योग म्हणून किमान एक एकर तरी रेशीम शेती करून आर्थिक विकास साधावा, असं आवाहन, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. सेवा पंधरवड्यानिमित्त हिंगोली जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे रेशीम शेतीच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सतरा शेतकऱ्यांचा, जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रेशीम शेतीतून आर्थिक उन्नती साधणाऱ्या शेतकऱ्यांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग काल बंद करण्यात आला. या पावसाळ्यात एक जून ते चार ऑक्टोबर दरम्यान ६६ दिवस धरणातून चार हजार ४२५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आला.

****

No comments: