Sunday, 2 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 October 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      5-G सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश- पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      लोकसहभागातून स्वच्छतेचा इंदूर शहराचा प्रयोग देशभर राबवण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

·      नक्षलग्रस्त भागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      राज्यातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरचे पथकर नाके बंद करण्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची मागणी

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना आज देशभर आदरांजली

·      राज्यातल्या ३४ जिल्हा परिषअध्यक्षपदाचं अडीच वर्षांसाठीचं आरक्षण जाहीर, औरंगाबाद सर्वसाधारण,  हिंगोली, लातूर, उस्मानाबाद महिलांसाठी, बीड, परभणी अनुसूचित जाती तर नांदेड आणि जालना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव

·      असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी ई-श्रम योजनेला गती देण्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भुपेंद्रसिंग यादव यांचे निर्देश

आणि

·      आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर  ४१ धावांनी विजय तर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना

****

5-G सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत 5-G इंटरनेट सेवेचा प्रारंभ करताना बोलत होते. 5-G तंत्रज्ञानामुळे देशाच्या गावागावात क्रांती होणार असून शैक्षणिक क्रांतीही होणार आहे, त्यामुळे या दिवसाची इतिहासात नोंद होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून एक लाख ७५ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोचल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 5-G सेवेसाठी पहिल्या टप्प्यात तेरा शहरांचा समावेश असून मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5-G सेवा पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं.. 

पहिल्या टप्प्यात देशातल्या १४ शहरांमध्ये ही सेवा सुरु होत आहे.  मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, कलकत्ता, अहमदाबाद, वाराणसी, चेन्नई, लखनौ, चंदीगढ, गांधीनगर, गुरुग्राम, जामनगर या शहरांचा यात समावेश आहे.

या कार्यक्रमात व्हर्च्युअल क्लासरुमसाठी राज्यातून रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधून तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून दिलं.

पंतप्रधान - विद्यार्थी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असून शाळेचे वर्ग हे स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

लोकसहभागातून स्वच्छता हा इंदूर शहराने राबवलेला प्रयोग देशभर राबवला जावा, असं सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला आहे. २०२२ चे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत इंदूर शहरानं एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात सलग सहाव्यांदा प्रथम पुरस्कार पटकावला. याच श्रेणीत नवी मुंबई शहरानं तिसरा क्रमांक पटकावला. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये पाचगणीने पहिला क्रमांक तर कराड शहराने तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे.

****

नक्षलग्रस्त भागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली इथं काल वार्ताहारांशी बोलताना ही माहिती दिली. याबाबतचं परिपत्रक उद्या सोमवारी काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राज्याचे गडचिरोली इथं नव्याने मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठासाठी जमीन अधिग्रहीत करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

****

राज्यातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावर असणारे पथकर नाके बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून रस्ते पायाभूत सुविधा अधिभार आणि कृषी अधिभार अगोदरच वसूल करतं. त्यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल आणि पेट्रोल डिझेलवरचा अधिभार असा दुहेरी कर वसूल केला जातो. ही वाहनधारकांची लूट असून ती त्वरित थांबवावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं या दोन्ही राष्ट्रपुरुषांना देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन केलं जात आहे.

राज्यभरात आज "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धा इथून या अभियानाचा शुभारंभ होईल. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप, तसंच ७५नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ आज होत आहे.

****

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुढील अडीच वर्षांकरता आरक्षण काल जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातल्या १६ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असणार आहे. यात मराठवाड्यातल्या हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. मराठवाड्यात औरंगाबाद या एकमेव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. बीड, परभणी अनुसूचित जाती तर नांदेड आणि जालना जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या जिल्हा परिषदा वगळता  इतर २५  जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद पुढील अडीच वर्षाच्या कालावधीपासून अनुसूचित जाती जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

****

ऊसतोड मजूर आणि महिला यांचे प्रश्न समन्वयानं सोडवण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. ऊसतोड मजूर नोंदणी, त्यांच्या पाल्यांची शिक्षण, भोजन आणि निवासाची सोय, महिलांचे प्रश्न, ऊसतोड मजुरांचा विमा यांचा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आढावा घेतला. अवैध गर्भपात आणि गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आरोग्य विभागाची समिती स्थापन करण्याची सूचना गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

****

असंघटीत क्षेत्रातले मजूर तसंच कामगार वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास घडवण्यासाठी ई-श्रम योजनेला गती द्यावी अशी सूचना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भुपेंद्रसिंग यादव यांनी केली आहे. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही परिवर्तनाची चळवळ व्हावी, असं मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केलं आहे. उस्मानाबाद इथं काल ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सक्षमपणे अंमलबजावणीया संदर्भात प्राचार्य, समन्वयकांची कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन, स्वायत्त महाविद्यालयांना प्राधान्य आणि ऑनलाईन शिक्षण ही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्रिसुत्री आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे चांगल्या महाविद्यालयांनी स्वायत्ता घ्यावी, असं आवाहनही कुलगुरू येवले यांनी यावेळी केलं. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं कुलगुरू डॉ. येवले यांना विद्यापीठ उपकेंद्रात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या वालूर, ताडकळस, हिस्सी या परिसरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पास झाला.  वालूर इथल्या गारपिटीसह झालेल्या पावसामुळे या ठिकाणच्या पिकांचं तर हिस्सी आणि पूर्णेतल्या ताडकळस इथल्या जोरदार पावसामुळे याही ठिकाणच्या काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस आणि ऊस यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवाया अभियानात आज ५६३ ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदान करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत हिंगोलीतल्या या ५६३ गावांमध्ये गावांमधल्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती, प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल जागरुकता, पाणवठ्यांजवळील परिसरांची स्वच्छता, असे उपक्रम आज राबवण्यात येतील.

****

नांदेड इथल्या कालमहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा बालकवी सुभाष वसेकर यांचं काल हृदयविकारामुळे निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. प्राचार्य वसेकर यांनी ३६ वर्ष कलेच्या क्षेत्रात आपलं योगदान दिलं. बालकवी म्हणून प्रसिद्ध असलेले वसेकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. प्राचार्य सुभाष वसेकर यांनी देहदानाचा संकल्प केलेला आहे.

****

अहमदाबाद इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावलं तर महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.  पुरुष संघानं अंतिम फेरीत सेनादल संघाचा २-० असा पराभव केला तर महिलांच्या संघाला अंतिम फेरीत गुजरात संघाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. महिला कबड्डी संघालाही हिमाचल प्रदेश संघानं २७-२२ असं पराभूत केल्यानं, रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघानं काल कांस्यपदक पटकावलं. महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघानं दिल्ली संघाचा ३-१ असा सहज पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना आज तेलंगणाशी होणार आहे.  या स्पर्धेत ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १० कांस्यपदकासह महाराष्ट्र पदकतालिकेत ७ व्या स्थानी आहे.

****

आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद १५० धावा केल्या. श्रीलंकेचा संघ १८ षटकं २ चेंडूत १०९ धावांवर सर्व बाद झाला. बांगलादेशात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती असे एकूण सात संघ सहभागी झाले आहेत.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज गुवाहाटी इथं होणार आहे. पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने मालिकेत आघाडीवर आहे

****

शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर इथं काल सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. देवीची आज भवानी तलवार अलंकार महापूजा होणार आहे. दरम्यान काल, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार उषा खापरे यांच्याहस्ते तुळजाभवानीची आरती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या पुढाकारातून नवरात्रात तुळजाभवानी देवीची विविध क्षेत्रात कार्यरत नवदुर्गांच्या हस्ते आरती केली जात आहे.

दरम्यान, श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव, कोजागिरी पौर्णिमा या सणाच्या काळात तुळजापूर इथं वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असेल असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या जर-जरी-जर बक्ष उर्सच्या पार्श्वभूमीवर आजपासून १५ ऑक्टोबर दरम्यान सोलापूर - धुळे राष्ट्रीय महार्गावरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद कडून कन्नड, धुळेकडे जाणारी सर्व जड वाहनं, दौलताबाद टी पाँईट, माळीवाडा, कसाबखेडा फाटा वेरुळमार्गे कन्नडकडे जातील. कन्नड कडून येणारी सर्व जड वाहनं याचमार्गे औरंगाबादकडे येणार आहेत. या उर्ससाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला असल्याचं पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...