Sunday, 2 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. यापूर्वीदेखील ७ सप्टेंबर रोजी अशा प्रकारची बंदी घालण्यात आली होती.

****

कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा इथल्या भाविकांनीही हजेरी लावल्यामुळे दिवसागणिक भाविकांची संख्या वाढत आहे.

अंबाबाईच्या दर्शनासाठी १३ लाखांहून अधिक भाविकांची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केली आहे.

काल करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मुक्ती भक्ती प्रदायिनी या रूपात पूजा बांधण्यात आली होती.

****

भारतीय जनता पक्षानं लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आगामी निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबादच्या २ दिवसांच्या दौऱ्यादरम्यान मंत्री यादव यांनी संघटनात्मक बांधणी तसंच कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.

****

ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य सन्मान प्राप्त व्हावा तसंच त्यांना आरोग्याच्या सुविधांसह इतर सर्व सुविधा अधिक सुलभ पद्धतीनं उपलब्ध करुन देण्यासाठी शासन नेहमी सकारात्मक असल्याचं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं. नांदेड इथं काल जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची जेव्हा कोणत्याही ज्येष्ठांना गरज पडणार नाही तेंव्हाच या कायद्याचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल, असं मत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

//********//

No comments: