Monday, 3 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 October 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीटलाईनचं भुमिपूजन

·      सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात आदरांजली, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोप

·      खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ

·      मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं निधन

·      अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट

आणि

·      दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय

****

औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात प्रस्तावित कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पीटलाईनचं भुमिपूजन आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. या पीटलाईनसाठी २९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी साडे नऊ वाजता तर जालना रेल्वे स्थानकावर सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठीचं आवश्यक नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण २०२२ आणि जल जीवन अभियान कामगिरी मूल्यमापन पुरस्कार प्रदान करण्यात आले. छोटे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अंदमान आणि निकोबारला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दादरा नगर हवेली आणि दीव दमणला प्राप्त झाला असून, सिक्कीम राज्याला तिसरा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातलया तीन लाख गावांमध्ये, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाचं काम सुरू असल्याचं, राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामीण विभागाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. काल दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुंबईत ‘नारेडेको’ - नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या, प्रॉपर्टी एक्स्पो, या प्रदर्शनाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकासकांनी गृहप्रकल्पांमध्ये सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत, असंही ते म्हणाले. पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरता योजना तयार करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र  म्हनूण ओळखलं जातं, या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचं ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितलं. सुरक्षा यंत्रणेत कोणतीही कुचराई न करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.

नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधी स्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

****

राज्यातही गांधीजी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनांदोलनात परावर्तित केला असल्याचं मत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, ७५ नद्यांची परिक्रमा, तसंच हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला.

दरम्यान, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी देश स्वावलंबी करणं गरजेचं असून, यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल वर्धा इथं, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या सेवाग्राम औद्योगिक क्षेत्र महोत्सव, या प्रदर्शन आणि कार्यशाळेचं उद्घाटन काल राणे तांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं एक समिती स्थापन केली असून, येत्या अडीच वर्षात या औद्योगिक क्षेत्राला आधुनिकतेचं स्वरूप दिलं जाईल, अशी घोषणा राणे यांनी केली.

****

औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या वतीने शहागंज इथं महात्मा गांधी यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मनपा मुख्यालयात शास्त्रीजींच्या प्रतिमेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या वतीनं स्वच्छता अभियान, संगीत आणि स्वदेशी वसन महोत्सव, रक्तदान शिबीर, तसंच तंत्रज्ञान आणि कल्पक प्रकल्पांच्या माध्यमातून गांधीजी, आणि शास्त्रीजींना यांना आदरांजली वाहण्यात आली.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, मराठवाडा ट्रेड अँड चेंबरचे, सचिव जगन्नाथ काळे, यांच्यासह व्यापारी संघटनांच्या वतीने गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं वितरणही काल करण्यात आलं.

****

परभणी इथं महात्मा गांधी जयंती निमित्त "फिट इंडिया फ्रीडम रन" घेण्यात आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली. नागरिक मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी झाले होते.

****

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात ठेवणं, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. खाद्यतेलाचे जागतिक स्तरावरील घसरलेले दर आणि कमी आयात शुल्क यामुळे भारतातही खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.

****

वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचं नियमन केलं जात होतं, आता नव्या कादयानुसार सुमारे दोन हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांचं नियमन केलं जाणार आहे. वैद्यकीय उपकरणे अधिनियम २०१७ नुसार एक ऑक्टोबर पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना बंधनकारक करण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३७९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २ हजार २५२ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३४४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ४९६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७० हजार ९८९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १८, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम आरोग्य यंत्रणेनं कराव, असं आवाहन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत, काल मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन, दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनामार्फत आरोग्य सेवांवर मोठा निधी खर्च करण्यात येतो. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करून त्यांना चांगल्या सेवा देणं आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कर्तव्य असल्याचं दानवे यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला काल श्री तुळजाभावानी देवीची भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन धर्म रक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला असं मानलं जातं, या घटनेची आठवण म्हणून ही पूजा मांडण्यात येते.

नवरात्रोत्सवातल्या सातव्या माळेनिमित्त काल जालना जिल्ह्यात अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

****

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं काल नाशिक इथं कर्करोगानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. शिराळकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. उच्चशिक्षित असलेल्या शिराळकर यांनी तरुण वयातच तत्कालीन धुळे जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा भागात आदिवासींचे नेते अम्बरसिंग महाराज यांच्या श्रमिक संघटनेच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली. अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या माध्यमातून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात संघटनेचं काम उभं केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

नांदेड इथल्या संत पाचलेगावकर महाराज यांच्या मानस कन्या गयाबाई लांजे यांचं काल रात्री उशिरा नांदेड इथं निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. मुक्तेश्वर आश्रम स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गयाबाई लांजे या रक्तदान, आरोग्य शिबिर, भूकंपग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कार्य राबवत होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज नांदेडच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल पदकांची लयलूट केली.

स्केटिंगमधे महाराष्ट्राच्या संघानं सांघिक रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. रोइंग क्रीडा प्रकारात विपुल घरटे आणि ओंकार मस्के या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिलं.

आर्य जुवेकर याने एक हजार मीटर्स रेसमध्ये रौप्यपदक जिंकलं. कुस्तीमध्ये वेताळ शेळकेनं रौप्य पदक, तर नरसिंग यादव, सोनाली मंडलिक आणि स्वाती शिंदे यांनी कांस्य पदक पटकावलं.

राजकोट इथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या जलतरण शर्यतींना काल प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी चार बाय शंभर मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकलं.

ॲथलेटिक्समधे तिहेरी उडीत पूर्वा सावंतनं १२ पूर्णांक ७६ शतांश मीटर्स पर्यंत उडी मारत कांस्य पदक पटकावलं. जिम्नॅस्टिकमधे इशिता रेवाळेनं, तर भारोत्तोलनात कोल्हापूरच्या अभिषेक निपाणेनं कांस्यपदक मिळवलं.

तिरंदाजीत महाराष्ट्राचे आदिती स्वामी आणि ओजस देवतळे कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले आहेत.

खोखो स्पर्धेत राज्याचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. आज सकाळी नऊ वाजता खोखोचे सामने सुरु होणार आहेत. स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी विजयी आगेकूच केली आहे.

****

क्रिकेट

गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात तीन बाद २३७ धावा केल्या. यात सलामीवीर सूर्यकुमार यादव ६१, के एल राहुल ५७, विराट कोहली ४९ तर कर्णधार रोहित शर्मानं ४३ धावा केल्या. सूर्यकुमारनं १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, सर्वात जलद अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. प्रत्युत्तरादक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात २२१ धावाच करु शकला. के एल राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना उद्या इंदूर इथं खेळला जाणार आहे.

****

महात्मा गांधी जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला कालपासून सुरुवात झाली. मागील वर्षात ज्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या अभियानात उत्कृष्ट काम केलं, त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातल्या समता नगर इथं विरंगुळा केंद्राचं भूमिपूजन काल ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत या विरंगुळा केंद्रासाठी  निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगाव जवळ दुचाकी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परच्या भीषण अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. रवींद्र अलशेट्टी आणि व्यंकटसाई कत्ती अशी मृतांची नावं असून, ते तुळजापूरहून देवीचं दर्शन घेऊन परत जात असताना हा अपघात झाला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...