Monday, 3 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात प्रस्तावित कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पीटलाईनचं भुमिपूजन आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होत आहे. या पीटलाईनसाठी २९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी उपस्थित आहेत.

****

इंडोनेशिया इथं सॉकर मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १२५ वर गेली तर जखमींची संख्या ३२३ वर गेली. इथं झालेल्या फुटबॉल सामन्यात स्थानिक संघाचा पराभव झाल्यानंतर संतापून मैदानात उतरलेल्या प्रेक्षकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला.

****

खादी आणि ग्रामीण उद्योग प्राधिकरणानं त्यांच्या सर्व उत्पादनांवर २० टक्के सवलतीची घोषणा केली आहे. खादी उत्पादनांवर २० टक्के, तर ग्रामीण उद्योग उत्पादनांवर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी काल नवी दिल्लीच्या खादी भवन इथं भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

****

उरण इथल्या जे एन पी ए बंदरातून दुबईतल्या जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटी रुपयांचं तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागानं जप्त केलं आहे. दोन आठवड्यापूर्वी देखील अशाच प्रकारे रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं.

****

नवी मुंबईत वाशीमध्ये संत्र्याच्या ट्रकमध्ये लपवून नेण्यात येत असलेले एक हजार ४७६ कोटी रुपये किमतीचे १९८ किलो अंमली पदार्थ आणि नऊ किलो कोकेन जप्त करण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली.

****

'प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे' या मुंबई ते डेहराडून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल राजभवन इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ही यात्रा ४० दिवसांत दहा हजार लोकांशी संपर्क साधेल तसंच एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देणार आहे.

****

लातूर इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यात अवैध मद्याचे एकूण १६ गुन्हे नोंदवण्यात आले, त्यामध्ये ३१ आरोपींना अटक करण्यात आली.

//**********//

No comments: