Friday, 25 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  25 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.

·      मतदार याद्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश.

·      जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथं श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ.

आणि

·      जागतिक वारसा स्थळाचा मान टिकवून ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी - केंद्रीय पुरातत्व विभागाचे क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांचं मत.

****

विकासाच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज कराड इथं, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले –

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं त्यांच्या मेहनतीपेक्षा म्हणजे जास्तीचं त्यांना उत्पन्न मिळणं यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण त्यामध्ये उपक्रम केलेत. आणि त्याचा फायदा देखील आहे. त्याचं उत्पादन वाढवण्याचं जे काही शेतकऱ्यांनी आणि आमच्या कृषी विभागानं प्रयत्न केलेच खरंच त्यांचं मी जाहीरपणे कौतुक केलेलं आहे. आणि मी नगरविकास मंत्री होतेा, त्यावेळेस ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा असं काही मी पाहिलं नाही. आणि आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे दुजाभाव तर बिलकुल आमच्याकडून विकासामध्ये होणार नाही.

शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवावेत आणि आर्थिक प्रगती साधावी, हीच यशवंतराव चव्हाण यांना खरी आदरांजली ठरेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सातारा जिल्ह्यातल्या कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी कराडच्या प्रीतिसंगम इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. कराड शहरात शंभुतीर्थ इथं उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं.

****

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी मदान यांनी हे निर्देश दिले. निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत आठ डिसेंबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत विधानसभा मतदार यादी दुरुस्तीची मोहीम राबवावी, असं मदान यांनी सांगितलं.

****

धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह सर्व राज्यांना लागू करुन लव्ह जिहाद विरुध्द कठोर कायदा करावा यासह इतर मागण्यांसाठी आज धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. अल्पसंख्याकांप्रमाणे बहुसंख्य लोकांना धर्माचे शिक्षण शाळा कॉलेजमधून देण्यास परवानगी द्यावी, निसर्ग नियमानुसार आणि परंपरेनुसार स्त्री - पुरुषाच्या लग्नाच्या वयाबाबत फेरविचार करावा, लैंगिक शिक्षण शाळा कॉलेजमधून सक्तीने देण्यात यावं, अशा अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं.

****

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथं युवा मतदारांची भेट घेऊन संवाद साधला. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारधारेत बदल झाला तर देशाची प्रगती होईल असं ते यावेळी म्हणाले. आठ वर्षांपूर्वी जगात भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. ती आज पाचव्या क्रमांकावर आली असून २०३० पर्यंत आपण जपान आणि जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर येण्याचं ध्येय ठेवलं आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

****

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोखले यांची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली होती, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून, ते डोळे उघडत असल्याचं, तसंच हातपायांची हालचाल करत असल्याचं रुग्णालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथं रामदास स्वामी यांच्या श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण सीता आणि हनुमंतासह सर्व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला. घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते मूर्तींची विधीवत पूजा करण्यात आली. जांब गावातून मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाआरती होऊन, कृतज्ञता सोहळा झाला. उद्या सकाळी मूर्तींची पुनर्स्थापना तसंच इतर धार्मिक विधी आणि दुपारनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या या मूर्तींचा गेल्या महिन्याच्या अखेरीस तपास लागला, या प्रकरणी काही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

****

अजिंठा आणि वेरुळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे. मात्र, तो टिकवून ठेवणं सर्वांचीच जबाबदारी सर्वांचीच असल्याचं मत केंद्रीय पुरातत्व विभागाचे औरंगाबाद क्षेत्रीय अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठात राष्ट्रीय वारसा सप्ताहाच्या समारोप सत्रात ‘पुरातत्व स्थळे आणि स्मारके - व्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावर चावले बोलत होते. पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व जाणून घेत, वारसा स्थळांना इजा पोहोचेल असं वर्तन टाळायला हवं, असं आवाहन चावले यांनी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी उत्तम खेळ करत, निर्धारित ५० षटकांत सात बाद ३०६ धावा केल्या. त्यामध्ये कर्णधार शिखर धवनच्या ७२, शुभमन गिल ५०, श्रेयस अय्यर ८०, संजू सॅमसन ३६ तर वॉशिंग्टन सुंदरच्या ३७ धावांचा समावेश आहे. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव आज अनुक्रमे १५ आणि चार धावांवर बाद झाले. भारतानं दिलेल्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडचे सलामीवर झटपट बाद झाले, मात्र केन विल्यम्सन च्या ९४ आणि टॉम लॅथमच्या नाबाद १४५ धावांच्या झंझावाती खेळीमुळे न्यूझीलंड संघाने ४८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच ३०९ धावा करून सामना जिंकला.

१०४ चेंडूत १९ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद १४५ धावा करणारा टॉम लॅथम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत पुढचा सामना परवा रविवारी होणार आहे.

****

संविधान दिन उद्या साजरा होत आहे. औरंगाबाद इथं मिलिंद नागसेनवन स्टुडंन्टस वेल्फेअर असोसिएशन आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीनं संविधान गौरव फेरी काढण्यात येणार आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान आणि सध्याची राजनीती या विषयावर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या मौलाना आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा होणार आहे.

****

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि औरंगाबाद जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं उद्या आणि परवा औरंगाबाद शासकीय ग्रंथालय परिसरात ग्रंथोत्सवासचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी नऊ वाजता क्रांतीचौक इथून ग्रंथदिडीनं या गंथ्रोत्सवाला सुरवात होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद, काव्यवाचन होणार आहे. उद्या उद्धाटन प्रसंगी संविधान दिनाच्या अनुषंगानं संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.

****

देशात सर्वप्रथम विमान बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या शेठ वालचंद हिराचंद यांच्या सोलापुरातच विमानसेवा नसणं हे दुर्दैवी असल्याचं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केलं आहे. सोलापुरात होटगी रस्त्यावरील विमानतळावर नागरी सेवा देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चक्री उपोषणाला गांधी यांनी पाठिंब्याचे पत्र पाठवलं. त्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं. सध्याच्या युगात विमानसेवा ही अत्यावश्यक बाब असल्याचं मत त्यांनी या पत्रात व्यक्त केलं आहे.

****

No comments: