Wednesday, 7 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात

·      कर्नाटकात महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोफोड - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.

·      दोषींवर कठोर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं बस्वराज बोम्मई यांचं आश्वासन

·      महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा संसअधिवेशनात उपस्थित करण्याचं खासदार शरद पवार यांचं महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन

·      राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

·      राज्यातील सत्ता संघर्षावर आता १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आणि

·      भारत -बांगलादेशमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली, विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, सरकार कुठल्याही मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भावासह मुद्यावंर सखोल चर्चेची मागणी केली.

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल संसदेच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. सदनाचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याबाबत बिर्ला यांनी केलेल्या आवाहनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोफोड केल्याच्या घटना काल घडल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी हा दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

****

दरम्यान, या नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखल्यानं घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली. या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यायचे पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली.

दुसरीकडे या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

****

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही काल चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपाइंच्या जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते.

दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.

केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उद्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांचं राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरया विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्यंही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी काल सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला.

डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं. नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.

****

राज्यातल्या कोणत्याही प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेत अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी शाळा स्थलांतर प्रमाणपत्र- टी सी अभावी प्रवेश नाकारता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यानुसारच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे २०२१ वर्षासाठीचे मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ३३ साहित्यिकांचा या पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शशिकाम्त्रे पित्रे यांना शाहू महाराज पुरस्कार, सदानंद कदम यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार, अरुण गद्रे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, तर विवेक उगलमुगले यांना बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

औरंगाबाद च्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार यंदा औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ स्वातंत्त्र्य सेनानी ताराबाई लड्डा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना देण्यात येणार आहे.  ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून येत्या १३ डिसेंबरला औरंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

२०१७ ते २०२० या कालावधीत औरंगाबाद महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडामोडे, नगरसचिव आणि अधिकाऱ्यांनी ऐनवेळचे २२० प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करुन हा गैरव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले. २५ कोटी रुपयांची रस्त्याची कामं गाळे वाटप, अतिरिक्त कामं, अशा नावाखाली २२० प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर करण्यात आले असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

****

राज्य सरकारनं राबवलेल्या माझी वसुंधरा अभियानात औरंगाबाद महापालिकेला विभागस्तरावर उत्तम कामगिरीसाठी दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या महसुली तसंच एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचं कौतूक करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीला दीड कोटी रुपये निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे. पारितोषिकात मिळालेल्या या निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

****

परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव इथं आज आणि उद्या मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतुक  अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहनं कोल्हापाटी इथून मानवत - पोखर्णी फाटा - पाथरी - उमरी मार्गे परभणीकडे जातील. गंगाखेड रोड - वसमत रोड - जिंतूर रोडवरुन येणारी वाहनं उमरी फाटा इथून पाथरीकडे वळवण्यात आली आहेत.

****

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज ढाका इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.

****

कतार मध्ये सुरु असलेल्या विश्वचष फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल, ब्राझिल आणि मोरक्कोचे संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पोर्तुगालनं काल स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला तर स्पेनच्या संघाला पेनल्टी शूट आऊट फेरीत ३-० अशा फरकानं मोरक्कोनं पराभूत केलं. अन्य एका सामन्यात ब्राझिलनं दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. परवा शुक्रवारी ब्राझिल आणि क्रोएशिया यांच्यात उपान्त्यपूर्व फेरीचा सामना होईल.

****

औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्य  क्रीडा महोत्सवात काल, बास्केटबॉल स्पर्धेत, अंतिम लढतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६-५९ अशा फरकानं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ संघाचा पराभव केला. तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा पराभव करत सावित्री फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं.

महाराष्ट्राची क्रीडादूत नवेली देशमुख हीच्या उपस्थितीत या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा  होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चार दिवसीय एकोणपन्नासाव्या  कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल मुलींच्या गटात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघानं परभणी आणि पुण्याच्या संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...