Saturday, 31 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारनं एक जानेवारी २०२३ पासून सुरू होणाऱ्या चालू आर्थिक वर्षातल्या चौथ्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं. यानुसार पाच वर्ष मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीचा व्याजदर सहा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवरून सात टक्के इतका केला आहे.

****

२०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीच्या तुलनेत, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतल्या निर्यातीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सांख्यिकी महासंचालनालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, या अवधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीचं मूल्य अंदाजे १७ अब्ज डॉलरहून अधिक होतं.

****

पुढच्या तीन वर्षात पंचायत स्तरावर दोन लाख सहकारी समित्या स्थापन करण्याच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्राचा तिपटीने विकास होण्यास मदत होण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. बंगळुरू इथं आयोजित सहकार परिषदेला ते संबोधित करत होते. दूध वितरण, साठवणूक, मत्स्यपालन, पाणी आणि गॅस पुरवठा यामध्ये या सहकारी समित्या बहुआयामी भूमिका बजावतील असंही शाह म्हणाले.

****

सागरी क्षेत्रावर निगराणी ठेवण्यासाठी तसंच संरक्षण क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलानं प्रथमच दहा मल्टीकॉप्टर ड्रोनच्या खरेदीचा करार केला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या अनुषंगानंच तटरक्षक दलानं हा निर्णय घेतला आहे.

****

नागरिकांनी आपला आधार कार्ड क्रमांक कोणालाही सांगू अथवा देऊ नये, तसंच सार्वजनिकरीत्या तो जाहीर करू नये, तसंच कोणत्याही समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देऊ नये, असा सल्ला, विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दिला आहे. आधार कार्ड धारकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेला आपला ओ टी पी देऊ नये, त्याचप्रमाणे एम आधार पिन कोणालाही देण टाळावं, असं आवाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केलं आहे.

****

No comments: