Monday, 26 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

 वीर बाल दिवस आज पाळला जात आहे. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जात आहे. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या शौर्याचं स्मरण केलं आहे.

****

देशभरातल्या सर्व बँकांनी लॉकरधारकांच्या कराराचं नूतनीकरण करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासाठी सर्व लॉकरधारकांना पात्रता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. एका निश्चित कालमर्यादेत या करारांचं नूतनीकरण करावं, असं बँकेनं म्हटलं आहे.

****

महात्मा फुले कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत असून, भूविकास बँकेकडे गहाण असलेली ६९ हजार एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे. सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथल्या यात्रेत ताडपत्री आणि चटई बाजार फुलला असून, या खरेदी विक्रीसाठी व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. माळेगाव यात्रेत पाणी, स्वच्छता, समृद्ध आरोग्य, यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या दालनामध्ये, विविध कलापथकं प्रबोधनपर कार्यक्रम सादर करत आहेत.

****

मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्याची मागणी मराठा सेवा संघानं केली आहे. काल परभणी इथं झालेल्या महाधिवेशनात या मागणीसह विविध ठराव संमत करण्यात आले.

****

भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कांस्य पदक विजेती लवलिना बोर्गोहेन आपापल्या श्रेणींमध्ये अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. रेल्वे विभागाच्या आठ मुष्टियोद्धा देखील अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. यामध्ये मंजू राणी, ज्योती गुलिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेतल्या १२ वजन श्रेणींमध्ये ३०२ महिला मुष्टियोद्धा सहभागी झाल्या आहेत. अंतिम फेरीचे सामने आज होणार आहेत.

****

No comments: