Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०६ जानेवारी २०२३ सकाळी
७.१० मि.
****
·
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल-मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना विश्वास
·
राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत ५० वर्षांसाठी बिनव्याजी
कर्ज उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये मंजूर
·
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देण्याची उत्तर
प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तयारी
·
राज्याच्या मतदार यादीत साडे चार लाखानं वाढ
·
झारखंडमधलं सम्मेद शिखर जी हे तीर्थस्थळच असेल, केंद्र सरकारची अधिसूचना जारी
आणि
·
दुसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांत श्रीलंकेचा भारतावर १६ धावांनी विजय
****
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, शिवाय स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल,
असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं ऑरिक या
औद्योगिक नगरीत काल या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारोहात मुख्यमंत्री दूरदृश्यसंवाद
प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. ते म्हणाले..
‘‘वस्तूंची मागणी, रोजगार
निर्मिती, आणि उत्पादन या तिन्ही बाबत राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. याला सरकारचं
उद्योगपूरक धोरणदेखील कारणीभूत आहे. या प्रदर्शनामुळे केवळ करोडो रुपयांची उलाढाल होणार
नाही, तर स्थानिक उद्योगांना देशात आणि देशाबाहेरही ओळख मिळण्यास मदत होईल, असा विश्वास
मला वाटतो.’’
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ
भागवत कराड यांनी यावेळी बोलताना, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं
लक्ष्य गाठण्यात, एम एस एम ई ची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘‘मी एम एस एम ई बद्दल थोडं
बोलणार आहे. कारण उद्योग हा अत्यंत महत्वाचा आहे. उद्योगांमुळे उत्पन्न वाढतं. देशाच्या
तीस टक्के जीडीपी हा एम एस एम ई मुळे आहे. त्याचबरोबर जॉब क्रियेशनमध्ये एम एस एम ई
महत्वाची आहे. सहा करोड जॉब एम एस इम ई मुळे मिळतात. आणि आपल्या देशाची फाईव्ह ट्रिलियन
जर बनवायची असेल तर एम एस एम ई चा अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे.’’
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत
यांनी यावेळी केलेल्या भाषणात, लघु उद्योजकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील,
असं आश्वासन देत, विकासाच्या बाबतीत मराठवाडा मागे राहणार नाही, असं नमूद केलं. हे
प्रदर्शन राज्यातल्या इतर शहरातूनही भरवलं जावं, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले...
‘‘तुमच्या शक्य असलेल्या
सगळ्या मागण्या या शिंदे-फडणवीस सरकारकडनं मान्य केल्या जातील. या मराठवाड्याच्या भूमीतनं,
या एक्स्पोमधनं अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतात एवढी ताकत या एक्स्पोमध्ये आहे. आणि
म्हणून हे मुंबईला झालं पाहिजे, पुण्याला झालं पाहिजे, नागपुरला देखील झालं पाहिजे,
आमच्या कोकणामध्ये झालं पाहिजे. आणि नक्की उद्योग विभाग काय आहे, कशा पद्धतीनं इंडस्ट्री
चालते, हे ग्रामीण भागातल्या उद्योजकांना देखील कळलं पाहिजे.’’
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात
देशभरातल्या विविध शहरांमधून साडे सहाशेपेक्षा अधिक उद्योजकांनी आपापले स्टॉल्स उभारले
आहेत.
****
केंद्र सरकारनं राज्यांना भांडवली
खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा
निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले
आहेत. या निधीतून पहिल्या टप्प्यात वीज महानिर्मिती तसंच महापारेषणला २५० कोटी रुपये
देण्यात येणार आहेत.
****
उत्तरप्रदेशात अयोध्या इथं महाराष्ट्र
भवन उभारण्यास जागा देण्याची तयारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ यांनी दर्शवली आहे. आदित्यनाथ यांनी काल मुंबईत, राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आदित्यनाथ यांनी राजभवनात असलेल्या क्रांतिगाथा,
या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली
तसंच संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला
अभिवादन केलं.
****
महाराष्ट्रातली गुंतवणूक भाजपशासित
उत्तर प्रदेशात पाठवण्याचा सध्याच्या सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी
बोलत होते. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भाजपाशासित राज्यातली गुंतवणूक वाढावी,
आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी व्हावं, यासाठीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं,
असा आरोपही तयांनी केला. मुंबईत चित्रपट सृष्टीशी संबंधित उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याच्या
प्रयत्नांना राज्य सरकार मदत करत असल्याचं पटोले यावेळी म्हणाले.
****
लव्ह जिहाद विरुद्ध भारतीय जनता
पक्ष शासित राज्यात करण्यात येत असलेले कायदे, हे घटनेतल्या हक्काचं उल्लंघन करणारे
असल्यानं बेकायदेशीर आहेत, असा दावा, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन - एम
आय एम चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत
होते. सध्या देशपातळीवर लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करण्यासाठी काढण्यात येणारे मोर्चे
कायदेशीर नसल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच देशात लव्ह जिहाद पेक्षाही बेरोजगारी- महागाई
असे अनेक प्रश्न असून, सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे असं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचा
साक्षीदार असलेल्या नळदूर्ग इथल्या ऐतिहासिक
अलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळावी, तसंच या पुलाच्या रक्षणासाठी
हुतात्मा झालेले आणि पहिला अशोकचक्र पुरस्कार मिळालेले सैनिक बचिंतरसिंग
यांचं याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं, केंद्रीय
गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर
तालुक्यात नळदुर्ग इथल्या अलियाबाद पुलाला भेट दिल्यानंतर बोलत होते. याचबरोबर त्यांनी
हुतात्मा सैनिक बचिंतरसिंग यांच्या प्रतिमेच पूजन करुन अभिवादन केलं.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक
सीमावादावर निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त आहे. सोलापूर इथं
ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात देशात समान नागरी कायदा येणार असल्याचं सूतोवाचही
त्यांनी यावेळी केलं.
****
राज्य निवडणूक आयोगानं मतदार
पुनरीक्षण कार्यक्रमानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. राज्यात सध्या नऊ कोटी
तीन लाख मतदार आहेत, यापैकी चार कोटी ७१ लाख पुरुष तर चार कोटी ३१ लाख महिला आहेत.
सात लाखावर मतदार दिव्यांग असून, तृतीयपंथी मतदारांची संख्या सुमारे पाच हजार एवढी
आहे. एकूण मतदारांच्या संख्येत गेल्यावेळच्या तुलनेत सुमारे साडे चार लाखाने वाढ झाली
आहे.
****
झारखंडमधलं सम्मेद शिखर जी हे
तीर्थस्थळच असेल, असा निर्वाळा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिला
आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी
बोलताना सांगितलं. या तीर्थ स्थळाचं पावित्र्य कायम राहावं, यासाठी केंद्र सरकारनं
ठोस पावलं उचलली आहेत. या भागात कोणतंही बांधकाम केलं जाणार नाही, तसंच परिसरात हॉटेल्स,
ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं
देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा करण्यात
आली आहे. यात औरंगाबाद विभागातल्या पैठण, लातूर विभागातल्या औंढा नागनाथ यासह मोहाडी,
धामणगाव, अमळनेर, जत, महाड, पुरंदर हे तालुका पत्रकार संघ मानकरी ठरले आहेत. स्मृतिचिन्ह,
आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लातूर जिल्ह्यात
चाकूर इथं लवकरच होणार असल्याचं, परिषदेकडून सांगण्यात आलं.
****
विधान परिषदेच्या
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यासाठी ३० जानेवारीला
मतदान होणार आहे. शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती, औरंगाबाद विभागाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी
दिली आहे.
****
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धांचं
औपचारिक उद्घाटन काल पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्य
क्रीडा ज्योत सुपुर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडीतल्या क्रीडा संकुलातली
क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन केलं. यावेळी राज्याच्या
विविध भागातून आलेल्या खेळाडूंनी मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली.
राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ३९
क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांमध्ये १० हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु
असलेल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल पुणे इथं झालेल्या
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं १६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या
संघाने निर्धारित षटकार २०६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल भारतीय संघ २० षटकात १९०
धावाच करु शकला. सूर्यकुमार यादवनं ५१, अक्षर पटेलनं ६५ धावा केल्या. तीन सामन्यांच्या
मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
औरंगाबाद इथं आज भव्य रोजगार
मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती केंद्र, तसंच फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट यांच्या संयुक्त
विद्यमानं, विद्यापीठातल्या नाट्यगृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ
वाजेपासून मुलाखती सुरु होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन विद्यापीठाचे
प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती केंद्राचे अधिकारी डॉ.गिरीश काळे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या कसबे
तडवळे इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद शाळेतल्या मुक्काम केलेल्या
ठिकाणी त्यांचं भव्य स्मारक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली. कसबे तडवळे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
मालकीची जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन देण्यास सहकार,
पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं काल पूर्वमान्यता दिल्यानं, गेल्या पाच वर्षांपासून
प्रलंबित असलेल्या स्मारकाचं बांधकाम आता होणार आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या लोहारा इथला ग्रामीण गृहनिर्माण
अभियंता सय्यद परवेज सलीम याला आठ हजार
रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी काल रंगेहात अटक करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल
काढण्यासाठी आष्टा कासार ग्रामपंचायतीच्या शिपायामार्फत त्याने ही लाच मागितली
होती.
****
कामगार
कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज दुपारी तीन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या आणि आस्थापनेत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणुक थांबविण्यासाठी, कामगार
कायद्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ आणि हक्क मिळवून
देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
अहमदनगर इथल्या
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे २०२१ यावर्षीचे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर
करण्यात आले. औरंगाबादच्या हबीब भंडारे यांना 'जगणं
विकणाऱ्या माणसांच्या कविता', या काव्यसंग्रहासाठी
पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध
साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
विभागाच्या वादग्रस्त शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
दाखल झाला आहे. बिरगे यांनी एका शाळेला नैसर्गिक वर्ग वाढ देण्याची संचिका गहाळ करून
शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिक्षण संचालक कार्यालयातले अधीक्षक
दीपक पाटील यांच्या तक्रारीवरून शिक्षण संचालक सूरज मांढरे यांच्या आदेशानंतर हा गुन्हा
दाखल करण्यात आला.
****
हिंगोली इथला पुढच्या आठवड्यातला
नियोजित राज्यस्तरीय हळद महोत्सव शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याने
पुढे ढकलण्यात आला आहे. आचारसंहिता संपताच या महोत्सवाचं नियोजन करण्यात येईल, अशी
माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषि महोत्सव समितीकडून देण्यात आली आहे.
****
परभणी इथं येत्या १३ ते १५ जानेवारी
दरम्यानं ११ वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. वारकरी
साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांनी ही माहिती दिली. खासदार संजय जाधव
हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील.
****
हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याचा
प्रकार समोर आला आहे. सेनगाव तालुक्यात कडोळी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. इथल्या तीस विद्यार्थ्यांना पोटदुखी तसंच मळमळीचा त्रास सुरू झाल्यानं, त्यांना तातडीने गोरेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या सर्वांची
प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment