Monday, 30 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ, केंद्र सरकारची आज सर्वपक्षीय बैठक

·      योगाभ्यासासह भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन

·      औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीनच्या ५६ व्या निरंकारी वार्षिक संत सत्संग सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

·      लिंगायत समाजाचं मुंबईतलं आझाद मैदानावरचं आंदोलन स्थगित

·      ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा मुंबईत ’हिंदू जनआक्रोश मोर्चा

·      विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी आज मतदान

·      औरंगाबाद जिल्ह्यात शेलुद ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य पदाचा लाखो रुपयांत लिलाव झाल्याची तक्रार

·      १९ वर्षांखालील मुलींच्या टी- २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद

आणि

·      लखनऊमध्ये झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पुरुष संघ सहा गडी राखून विजयी

 

सविस्तर बातम्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसद भवनात आज दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि सर्व राजकीय पक्षांचे सभागृह नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सर्व पक्षांनी संसदेच्या या सत्रात सहकार्य करावं आणि कामकाज सुरळीतपणे चालावं, यासाठी सरकारतर्फे या बैठकीत आवाहन केलं जाणार आहे. उद्या  सकाळी ११ वाजता संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल.  वुधवारी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल. अधिवेशनाचं पहिलं सत्र १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात संसदेच्या विविध विभागांच्या समित्यांना वित्त मागण्यांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक बैठका होणार आहेत. त्यानंतर अधिवेशनाचं पुन्हा सुरु होणारं दुसरं सत्र ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

****

निरोगी जीवनासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात योगाभ्यासासह भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ९७ वाव्या भागातून त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. योगविद्येचा संबंध आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्हीबाबतचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जी- २० परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्यांपासून तयार केलेली आरोग्यवर्धक पेय, कडधान्य आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात येत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

पर्यावरण संरक्षणासाठी ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सोने, चांदी, तांबे आणि निकेलसह सुमारे १७ प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. त्यामुळे ई- कचऱ्याचा योग्य वापर झाला पाहिजे असं ते म्हणाले.

देशातल्या पाणथळ जागांची संख्या आता ७५ झाली असून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक समुदायांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचही पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून अभिनंदन केलं.

प्रजासत्त्ताक दिनाच्या औचित्यानं सादर झालेल्या दिमाखदार पथसंचलनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

****

राज्यातील शिवसेना पक्षाची अधिकृतता आणि पक्ष चिन्हाच्या वादासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर लेखी म्हणणे सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. लवकरच निवडणूक आयोग याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद पुर्ण झाला असून आयोगाकडे सर्व कागदपत्रे लेखी स्वरूपात सादर केली आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकारीणीची मुदत २३ जानेवारीला संपली असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची परवानगी मागितली आहे. 

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. या निमित्तानं ठिकठिकाणी अभिवादन सभा तसंच प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज हुतात्मा दिनानिमित्त सकाळी ११ वाजता सर्वत्र दोन मिनिटं स्तब्धता पाळून आदरांजली अर्पण केली जाणार आहे. राज्य शासनानं याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.

****

सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून राज्य सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक इथं श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेले पाच दिवस सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना औषधी वनस्पतींची माहिती मिळते, शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळतं, तसंच पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठं पाठबळ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. राज्यातील अडचणीत असणाऱ्या ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन इथं ५६ व्या निरंकारी वार्षिक संत सत्संग सोहळ्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल हजेरी लावली. या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. निरांकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

****

लिंगायत समाजाचं मुंबईल्या आझाद मैदानावरचं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा काल अविनाश भोसीकर आणि विनय कोरे यांनी केली. आपल्या ७० टक्के मागण्या मान्य झाल्या असल्यानं हे आंदोलन थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचं काम त्वरीत सुरु करण्यात यावं, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलं होतं. आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे यांनी सरकारचे आभार व्यक्त केले.

****

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं  काल मुंबईत शिवाजी पार्क इथून ’हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असून, त्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून जातीजातीत तेढ निर्माण केलं जात आहे, असं विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कासेगाव इथं विरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचं उद्धाटन काल पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. धर्मनिरपेक्ष या शब्दाला आज तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, हे देशाच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात सर्व मतदान पथकं साहित्यासह मतदान केंद्रावर काल दाखल झाली. निवडणुकीसाठी जिल्हानिहाय पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.

मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाही. मतदान प्रक्रियेचं अखंडीतपणे व्हिडीओग्राफी तसंच वेबकास्टींग केले जाणार आहे. मतमोजणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.

****

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष उमेद्वार सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठींबा जाहीर केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल नाशिक इथं माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. हा निर्णय पक्षाच्या वतीने नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर घेण्यात आला असल्याचं, विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शेलुद गावात गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य पदाचा लाखो रुपयांत लिलाव करून पदे लाटल्याची तक्रार विभागीय आयुक्त कार्यालयात लिलाव प्रक्रियेच्या व्हिडीओसह दाखल करण्यात आली आहे. उपसरपंच पदासाठी इच्छूक असलेले राजू मस्के यांच्यासह तीन सदस्यांनी निवेदनाद्वारे ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार देणाऱ्या तिन्ही सदस्यांनी राजीनामा दिला आहे. शेलूद गावात मतदान न होता निवडणुकीची बिनविरोध प्रक्रिया पार पडली होती. मात्र, सदस्य पदाचा लिलाव करून गावानं बिनविरोध निवडणूक झाल्याचा देखावा केल्याचा आरोप राजू मस्के यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या लिलावात सरपंच पदासाठी १४ लाख ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली होती. यात ९ सदस्यांची मिळून एकूण २८ लाख ५६ हजार रुपये जमा झाले होते, असं मस्के यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत महिनाभरापासून साखळी उपोषण करत असलेल्या जालना जिल्ह्यातल्या वडीकाळ्या इथल्या ग्रामस्थांनी काल गावातून आरक्षण जनजागृती फेरी काढली. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं या पायी फेरीत सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, वडीकाळ्या ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळानं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु यावर काहीच तोडगा न निघाल्यानं वडीकाळ्या ग्रामस्थांनी येत्या पाच फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर मात करत विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचनं ६-३, ७-६ आणि ७-६ अशा सरळ सेट मध्ये विजय मिळवत जेतेपद मिळवलं. त्याच्या कारकिर्दीतील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे हे १० वे विजेतेपद आहे. 

****

१९ वर्षांखालील भारतीय मुलींच्या क्रिकेट संघानं काल टी- २० क्रिकेट विश्वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. काल दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा सात खेळाडू राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीकरत पाचारण केलं. इंग्लंडच्या संघानं सतरा षटकं आणि एक चेंडूत सर्वबाद ६८ धावा केल्या. उत्तरादाखल भारतीय संघानं चौदा षटकांत तीन खेळाडूंच्या बदल्यात हे आव्हान पार केलं. सौम्या तिवारीनं नाबाद २४ तर गोंगडी त्रिशा आणि कर्णधार शेफाली वर्मानं अनुक्रमे २४ आणि १५ धावा केल्या.

****

लखनऊमध्ये झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडवर सहा गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत एक- एक अशी बरोबरी केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित वीस षटकांत आठ बाद ९९ धावा केल्या. विजसाठी १०० धावांचं लक्ष्य गाठताना भारतीय संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात सुर्यकुमार यादवने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. सुर्यकुमार यादवच्या नाबाद २६ धावा सामन्यातील सर्वाधिक धावा ठरल्या. स्पर्धेतला शेवटचा आणि अंतिम सामना येत्या बुधवारी अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.

****

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघांत काल इंग्लंड इथला टी - ट्वेंटी क्रिकेट सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्याची नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना थांबवण्यात आला तेव्हा भारतीय संघाच्या दोन षटकांत बिनबाद ४ धावा  झाल्या होत्या.

****

ओडीसात झालेल्या १५ व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद जर्मनीनं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात जर्मनीनं गतविजेत्या बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव केला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...