Sunday, 23 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून व्यक्त.

·      ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची सर्वानुमते निवड.

·      ओबीसीत समावेशाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचं १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं ठिय्या आंदोलन.

आणि

·      तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदक.

****

आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. पॉन्झी ॲप्स- फसव्या गुंतवणूक योजनांवर कारवाईसाठी रिझर्व्ह बँक आणि संबंधित मंत्रालयांसोबत सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. कोविड काळात पाश्चिमात्य देशांनी चुकीचे निर्णय घेतल्याने तसंच कोविडपश्चात युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने भारतीय अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत सुस्थितीत असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.

****

भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानावर पोचवण्यासाठी देशातील युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असून गेल्या ८ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये ३९ हजार सुधारणा केल्याचं कराड यांनी सांगितलं. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नॅशनल युवा सोसायटी सारख्या संस्थांनी काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.

****

मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी, विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. स्तंभलेखिका, ब्लॉगर आणि प्राप्तिकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या ‘असेन्डन्स’ या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते. अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान आणि मेधावी विद्यार्थी आले पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

****

रेल्वे मंत्रालय देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत येत्या शुक्रवार पासून पुण्याहून भारत गौरव पर्यटनासाठी पुरी-गंगासागर दिव्य काशी रेल्वे यात्रेचं आयोजन करणार आहे. दहा दिवसीय यात्रेत ही रेल्वेगाडी जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या शहरांना भेटी देत जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, लिंगराज मंदिर, कालीबाड़ी, विष्णुपद मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर या धार्मिक स्थळांची यात्रा घडवणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांना भारतातील विविध स्थळांचं दर्शन घडवण्यासाठी रेल्वे मंत्रालय ही गाडी चालवत आहे.

****

९७ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं होणार आहे. साहित्य महामंडळानं गठित केलेल्या स्थळनिवड समितीतर्फे आज पुण्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अमळनेरच्या मराठी वाङमय मंडळ या संस्थेनं हे संमेलन घेण्याची शिफारस केली, त्याचा स्वीकार करत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं या प्रस्तावाला मान्यता दिली. या समितीनं सातारा जिल्ह्यातील औदुंबर आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची निवड केली आहे.

****

मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.

****

इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या आतापर्यंत पाच्या षटकांत एक बाद ३५ धावा झाल्या आहेत.

या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.

****

तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांच्या संघाचा चीनच्या संघाने पाच-चार असा पराभव केला. पुरुष रिकर्व एकेरीच्या उपान्त्यफेरीत भारताचा धीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सध्या सामना होत आहे.

****

उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. सामाजिक समावेशन, संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणं, रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव आदी उपक्रमांसाठी सोलापूर जिल्ह्याला शंभरपैकी ९० पूर्णांक ७ दशांश गुण मिळाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उद्या २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष तसंच पंचायत विभागाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत संत गाडगेबाबा पुरस्कार, महाआवास अभियान आणि इतर योजनेतील पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात सकाळी १० वाजता पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि सोलापूर इथलं रब्बी ज्वारी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं ‘मिल्लेट स्टार्टअप फेस्ट २०२३’ या भरडधान्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस  आणि रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर चे प्रमुख डॉ. बसवराज रायगोंड यांच्या हस्ते नुकतच झालं. या प्रदर्शनात नवउद्योजक आणि सरकारी यंत्रणा यांनी मिळून २३ दालनं उभी केली आहेत. या कार्यक्रमात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पात्रोटी यांनी विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना भरडधान्य आणि त्या संबंधित उद्योगाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केलं. एक हजार ५०० पेक्षा जास्त स्टार्टअप, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी यावेळी यात भाग घेतला.

****

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचं लक्ष लागून असलेल्या बुलडाण्यातील भेंडवळच्या घटमांडणी चे अंदाज आज जाहीर करण्यात आले. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी झाली होती. गेल्या ३५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते, भेंडवळच्या या भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही, मात्र संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष या अंदाजाकडे लागलेलं असतं. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या मांडणीचं आज सकाळी निरीक्षण करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार यावर्षी जूनमध्ये कमी पाऊस होणार असून पेरणी उशिरा होणार आहे, तसंच वर्षभर पीकपरस्थिती सर्वसाधारण राहणार आहे.

****

No comments: