Tuesday, 20 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 20.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 June 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० जून २०२३ दुपारी १.०० वा.

****

आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार आहेत. वसुधैव कुटुंबकम या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी अमेरिका आणि इजिप्तच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसंच परराष्ट्र व्यवहारमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहेत. अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत २२ तारखेला त्यांचं भाषण होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अमेरिकेतल्या उद्योजक आणि गुंतवणूकदार कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून, भारतीय समुदायालाही भेटणार आहेत. २४ जून रोजी पंतप्रधान अमेरिकेहून इजिप्तकडे रवाना होतील.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत उद्या विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात विधान भवन' हा कार्यक्रम होणार आहे. योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी असून सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद घटना असल्याचं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. उद्या सकाळी सात ते नऊ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह सुमारे दोन हजार योगप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस मरमुगाव या नौदल जहाजांवर विशेष योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आयएनएसचे अधिकारी आणि द योग इन्स्टिट्यूटचे संचालक  डॉ. हंसाजी योगेंद्र उपस्थित राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

योग दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावात, शाळा, महाविद्यालयात, सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनामंध्ये योग कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

जी - 20 अंतर्गत असलेल्या शैक्षणिक कार्यगटाची चौथी बैठक आजपासून पुण्यात सुरु झाली. जी - 20 समूहातले सदस्य देश, अतिथी देश तसंच आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना - ओ ई सी डी, युनेस्को आणि युनिसेफ यासारख्या प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी या बठैकीत सहभागी झाले आहेत.

दरम्यान, बैठकीच्या सुरवातीला आज पुण्यात परदेशी पाहुण्यांसाठी हेरिटेज वॉक घेण्यात आला. ऐतिहासिक शनिवार वाड्यावर ढोल, लेझीम च्या निनादात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. स्थानिक लोककलांचं यावेळी प्रदर्शन करण्यात आलं. लाल महाल आणि नाना वाड्याची देखील त्यांनी पाहणी केली.

****

दरम्यान, जी - 20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यात समृद्ध शिक्षणाची रॅली काढण्यात आली. केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याअनुषंगानं घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणं आणि अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याच्यादृष्टीनं या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचं मांढरे यांनी सांगितलं.

****

जी - 20 पर्यटन कार्यगटाची चौथी बैठक कालपासून गोवा इथं सुरु झाली. या बठैकीचं औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झालं. विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण किनारपट्टी, सागरी जीवन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला भारत, किनारी आणि साहसी पर्यटनासाठी एक उत्तम स्थान असल्याचं नाईक यावेळी म्हणाले. या बैठकीत आज क्रूझ पर्यटनावर चर्चा होणार आहे.

****

कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगम - ई एस आय सी द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये ३० हजाराहून अधिक नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या असून, तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. एप्रिलमध्ये नोंदणी झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २५ वर्ष वयापर्यंतच्या आठ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांची, तर महिला सदस्यांची नोंदणी तीन लाख ५३ हजार इतकी झाल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत  आहे.  

****

जर्मनी इथं सुरु असलेल्या विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या विशालनं चमकदार कामगिरी केली असून, पावरलिफ्टिंग प्रकारात चार रौप्य पदकं पटकावली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...