Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण
· जमावाची पोलिसांवर दगडफेक;पोलिसांकडून लाठीमार तसंच प्लास्टिक बुलेट्सचा वापर
· मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश;विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
· विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या चौदा सदस्यांच्या समन्वय समितीची घोषणा
· लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारानं 'एक देश एक निवडणूक' समिती स्थापन
· भारताच्या सौरमोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज प्रक्षेपण
· क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर; मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान लढत
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला, काल दुपारनंतर हिंसक वळण लागलं. या ठिकाणी काल सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपोषण सोडून रुग्णालयात भरती होण्याची विनंती, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी करत होते. यावेळी जमावातल्या काहींनी अचानक दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार तसंच प्लास्टिक बुलेटचा वापर करावा लागला.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलीस अधिकारी आणि जवळपास ३२ पोलीस कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीमारातमध्ये काही आंदोलकही जखमी झाले असून, यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांच्या या कारवाईनंतर संपप्त जमावाने धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतुक टायरची जाळपोळ करून बंद पाडली. यावेळी काही एस टी बस, एक पोलीस वाहन आणि इतर काही वाहनंही आंदोलकांनी पेटवून दिली. या घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद सह अनेक ठिकाणी या घटनेच्या विरोधात नागरिकांनी काल निदर्शनं केली. या आंदोलनामुळे काही मार्गांवरच्या बसगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. अंबड चौफुली इथं सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आंदोलकांवर लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जनतेने शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सर्वस्वी सरकार जबाबदार असून, पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली, तर विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे सरकारने स्पष्ट करावं, असं म्हटलं आहे.
****
देशभरातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या चौदा सदस्यांच्या समन्वय समितीची घोषणा काल करण्यात आली. इंडिया आघाडीची दोन दिवसांची बैठक मुंबईत झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूक शक्यतो एकत्रितपणे लढवण्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विविध राज्यातल्या जागावाटपाबाबतचा विचार तातडीनं सुरू करण्यात येईल आणि याबाबतचा निर्णय लवकरात लवकर, सहकार्याच्या भावनेनं घेण्यात येईल, असं या ठरावात म्हटलं आहे. जनहिताच्या मुद्द्यांवरून देशाच्या विविध भागात मोर्चे काढण्यात येतील तसंच, जुडेगा भारत, जीतेगा इंडिया, हे या युतीचं घोषवाक्य असेल, असंही या ठरावात म्हटलं आहे.
****
भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या दोन दिवसीय बैठकीचा काल मुंबईत समारोप झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, विकासाच्या मुद्यावर महायुती एकत्र काम करत असल्याचं सांगितलं.
****
राज्यात लवकरच अठरा हजारहून जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती करण्यात येणार असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या घोटी इथं, राज्यस्तरीय पोषण अभियानाचा शुभारंभ काल तटकरे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या सहा वर्षांपासून राबवण्यात येत असलेल्या पोषण माह उपक्रमात, महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याचं पूर्ण श्रेय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना जातं, असं त्या म्हणाल्या. राज्यातल्या प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध करून देणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं.
****
संपूर्ण देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारानं केंद्र सरकारनं, 'एक देश एक निवडणूक' समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर लोकांकडून मतं मागवली जातील. संसदेतही यावर चर्चा होण्याची शक्यता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. ते काल जयपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक देश एक निवडणूक या संकल्पनेचं स्वागत केलं आहे. एकाचवेळी सर्व निवडणुका झाल्या तर उर्वरित वेळ विकासकांमाना गती देण्यासाठी वापरता येईल, असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.
‘‘दर पाच वर्षांमध्ये सारख्या कुठे ना कुठे निवडणुका या डेव्हलमेंटच्या दृष्टीकोनातून अडचणीच्या ठरतात. आपल्याला बाकीच्या बाबतीमध्ये जो विकास साधायचा असतो, किंवा केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या असतात, त्यावेळेस निवडणुका आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार चार महिने काम ठप्प राहतं. आणि मग इतके दिवस काम ठप्प राहणं हे, आपल्याला या काळामध्ये परवडणारं नाहीये. आणि विकासकामावर याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणून जसं ‘वन नेशन वन टॅक्स’ तसं ‘वन नेशन वन इलेक्शन’ याची गरज होती.’’
****
भारताच्या सौरमोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या मोहिमेतून सूर्याचं वातावरण, पर्यावरण आणि संबंधित बाबींचा अभ्यास केला जाईल. सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरणार असल्याची माहिती, बंगळुरुच्या भारतीय अंतराळ भौतिकी संस्थेचे शास्त्रज्ञ बी.रविंद्र यांनी दिली आहे.
****
महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं काल मुंबईत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सुविद्य पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण झालं. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असून, देशाच्या सागरी इतिहासातला हा एक मैलाचा दगड असल्याचं, उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
****
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था - एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी अभिनेते आर माधवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी काल ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. माधनव यांचा अनुभव आणि नैतिकतेमुळे एफटीआयआय अधिक समृद्ध होईल आणि त्यात सकारात्मक बदल होतील, असं ठाकुर यांनी म्हटलं आहे.
****
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत पेट्रोलियम कंपन्यांनी १५८ रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी एक हजार ६४० रुपयांना मिळणारं १९ किलो वजनाचं सिलिंडर, आता मुंबईत एक हजार ४८२ रुपयांना मिळेल. औरंगाबादमध्ये या सिलिंडरची किंमत १ हजार ५८६ रुपये ५० पैसे इतकी असेल.
****
राज्यशासनाचे २०२२-२३ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. या पुरस्कारांसाठी शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांचा समावेश आहे. औरंगाबाद इथले सरस्वती भुवन शाळेतले शिक्षक डॉ विनोद सिनकर, शारदा मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक डॉ सविता मुळे, तसंच देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक डॉ संतोष भोसले यांचा गौरव होणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध उपक्रम राबवत ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रो पर्यंत नेणारे, कोंढुर जिल्हा परिषद शाळेतले प्राथमिक शिक्षक शंकर लेकुळे, आणि सर्वाधिक विद्यार्थी संख्या असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे, आखाडा बाळापूर जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक, अशोक सुरवसे, यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत, प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेलं नुकसान निश्चित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या एकूण ५७ महसूल मंडळापैकी ३६ महसूल मंडळासाठी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी, शेतकरी आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत पाच टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. या सर्वच ३६ मंडळामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचं या अहवालात नमूद आहे. यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब आणि परंडा तालुक्यातील एकूण ३६ मंडळाचा समावेश आहे. या अधिसूचनेनुसार पुढील महिन्याभरात पिक विमा कंपनीला उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या नुकसानाच्या २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के अग्रीम देण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, ही मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात अवर्षणाची स्थिती असल्याने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा, पशुधनासह जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. या जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला असून, पावसाअभावी चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानं पशुधन संकटात आहे, या संकटातून सावरण्यासाठी सगळे निकष बाजूला ठेवून तातडीनं एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेत कँडी इथल्या पल्लेकेले क्रिकेट मैदानावर दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
मनमाड- धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं असून, यामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. या प्रश्नाची शासनस्तरावरून निश्चित दखल घेतली जाईल, असं आश्वासन दानवे यांनी दिल्याचं, भामरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सुसंवाद हा कार्यक्रम लाभदायक असल्याचं मत, या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ किशोर झाडे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं, ९० व्या शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात बोलत होते. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या, औरंगाबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्रात हा कार्यक्रम झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा कार्यक्रम केंद्राच्या वतीने घेतला जातो. पिकं, पशूपालन, फळ, भाजीपाला उत्पादन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी या कार्यक्रमातून संवाद साधला. शेतकऱ्यांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
****
पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यातल्या वाढलेल्या विजेच्या मागणीचा आणि उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी, काही ठिकाणी नाईलाजानं आकस्मिक भारनियमन करावं लागत असल्याचं, महावितरणनं कळवलं आहे. मात्र हे भारनियमन तात्पुरतं असून मागणीइतकी वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण आणि शासन कसोशीनं प्रयत्न करत आहे. नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीनं करावा आणि संयम राखून सहकार्य करावं, असं आवाहनही महावितरणनं केलं आहे.
****
पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी इथं उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून होत असलेल्या वीजचोरीचा, महावितरण विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असं या वीजचोराचं नाव असून, त्याला दोन कोटी चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या हजरत जर जरी जर बक्ष यांच्या ७३७ व्या उर्सनिमित्त, येत्या २१ ते २९ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. हा उर्स महोत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा करतांना सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत व्हावा, त्यासाठी स्थानिक रहिवाशी आणि प्रशासनाने समन्वय राखावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment