Tuesday, 26 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 26.09.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शासकीय सेवेत नव्यानं भर्ती झालेल्या सुमारे ५१ हजार कर्मचाऱ्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरु आहे. नांदेड इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होत आहे.

****

पुण्याहून नागपूरला जाणारी खासगी बस जालना जिल्ह्यात पुलावरून कोसळून २५ प्रवासी जखमी झाले. बदनापूर तालुक्यात म्हात्रेवाडी पुलावर काल मध्यरात्री हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, यापैकी चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड इथं काल जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमकडून आदित्य शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातल्या जवळपास ७०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आदित्य डेंटल कॉलेज आणि आदित्य आयुर्वेद महाविद्यालयातल्या २५ तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमकडून तपासणी करण्यात आली.

****

शाळांच्या खाजगीकरणासह पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करू नये, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात परळी इथं बौद्ध संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काल काढण्यात आला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना विविध मागण्याचं निवेदन दिलं.

****

भारत येत्या २०३० पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित पृथ्वी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के सिंह यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीतल्या फिक्की फेडरेशन हाऊसमध्ये इंडिया एनर्जी समिट २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

****

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थानच्या काही भागातून काल मोसमी पाऊस परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघारी जाईल असा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments: