Sunday, 24 September 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ राहणार - पंतप्रधान मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन

·      नागपूरच्या पूरस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा, पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देणार

·      नांदेडमध्ये अतिवृष्टी, बीडच्या आष्टीत मुसळधार, तर बुलढाण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस, अनेक गावात नदीनाल्यांचं पाणी शिरलं

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शुभमन गील आणि श्रेयस अय्यरची शतकी खेळी, भारताचा धावांचा डोंगर

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची अंतिम फेरीत धडक

****

जी - ट्वेंटी शिखर परिषदेत भारतानं, आफ्रिकी महासंघाला जी- ट्वेंटी समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बातया कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे पाचवा भाग होता. जी - ट्वेंटीचं यशस्वी आयोजन आणि जागतिक पातळीवर भारताचं वाढणारं महत्वही पंतप्रधानांनी यावेळी विषद केलं. आधुनिक काळात भारतानं जी- ट्वेंटी परिषदेत, आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे. हा कॉरिडॉर पुढची शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार असून याची सुरुवात भारतीय भूमीवर झाली याची नोंद इतिहासात कायम राहील, असं पंतप्रधान म्हणाले. दिल्लीतील जी-ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान, अनेक जागतिक नेते राजघाटावर महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत, याचा हा एक मोठा पुरावा असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणखी नऊ वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा प्रारंभ केला. सध्या देशाच्या विविध रेल्वे मार्गांवर २५ वंदे भारत रेल्वे धावत असून आज आणखी नऊ रेल्वेंची त्यात भर पडल्याने त्यांची संख्या ३४ झाली आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग आणि प्रमाण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळत आहे. देशाला अशाच प्रकारचा पायाभूत विकास हवा आहे. नवीन वंदे भारत रेल्वे देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारतील आणि या रेल्वे नवीन भारताचा नवीन आत्मा आणि उत्साह दाखवतील. वंदे भारत रेल्वेची लोकप्रियता सतत वाढत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा या वंदे भारत रेल्वे देशाच्या सर्व भागांना जोडतील.

****

नागपुरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळं उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्या कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपये, तर दुकानाचं नुकसान झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेत काल झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यात काल पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यातल्या येवती, जाहूर आणि अंबुलगा या तीन आणि देगलूर तालुक्यातील शहापूर आणि नरंगल बुद्रुक या मंडळांचा समावेश आहे. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९ मिलिमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाळुंगी मंडळातल्या लोणवाडी, खडदगाव माळेगाव, तसच बरफगाव मंडळातल्या अनेक गावांमध्ये नदी ओढ्यांना पूर आला. गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरे पडली तसंच २० ते २५ जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, कापूस पिके वाहून गेली आहेत. दरम्यान, प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मध्यरात्रीच्या काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिनी इथल्या एका शेतकऱ्याच्या कुकूट पालनाचं मोठं नुकसान झालं आहे. तीन हजार कोंबड्या पावसामुळे दगावल्या असून त्यांचं खाद्यही वाहून गेले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

****

शिवसेनेच्या दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यातील ५४ आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांमोर सुनावणी होणार आहेत.

****

नर्मदा परिक्रमा करत असताना आपला आचार हा धार्मिक असतो, विचार हे सात्विक असतात आणि मुखात मातेच्याच नामस्मरणाचे उच्चार असतात, असं प्रतिपादन परिक्रमावासी डॉ. नीतू पाटील यांनी केलं आहे. जळगाव इथं आज इंडीयन मेडिकल आसोसिएशन - आयएमए सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जवळपास तीन हजार ६०९ किलोमीटर पायी चालत असताना मातेचं कोटीवेळा नामस्मरण होतं, असं पाटील म्हणाले. व्यासपीठावर जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे आदी हे उपस्थित होते.

****

इंदूर इथल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ४०० धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. सलामीवीर ऋतुराज गायकवाड झटपट बाद झाल्यावर शुभमन गील आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. के एल राहुल ५२ तर ईशान किशनने ३१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव ७२ आणि रवींद्र जडेजा १३ धावांवर नाबाद राहिले.

****

आशियाई क्रीडा स्पर्धांमधे भारतीय महिला क्रिकेट संघानं आज बांगलादेशाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगला देशाचा डाव भारतानं अवघ्या ५१ धावावंर गुंडाळला. हॉकीमधे भारताच्या पुरुष संघानं उझबेकिस्तानचा १६-० असा दणदणीत पराभव केला आणि अ गटात अव्वल स्थान मिळवलं. भारताचा पुढचा सामना सिंगापूरबरोबर होणार आहे.

****

राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी खेळाडू केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. तसेच लातूर जिल्ह्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा असून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदगीर येथे लवकरच दिवंगत खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उदगीर येथील पोस्ते पोतदार लर्न कॅम्पसमध्ये आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी बनसोडे बोलत होते.

****

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची परवा मंगळवारी लासलगाव इथं बैठक होणार आहे. सध्या बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आंदोलन सुरू असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून कांदा व्यापाऱ्यांनी जिल्ह्याती लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितलं.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या बेळगाव तालुक्यातल्या घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात नक्षलविरोधी अभियान पथकाच्या पोलिसांना यश आलं आहे. यावेळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरुन असलेली ४ पाकीटं आढळून आली, ज्यात सुमारे १२ किलो स्फोटकं पोलिसांनी हस्तगत केली. २१ सप्टेंबरपासून नक्षलवाद्यांच्या वर्धापन सप्ताहाला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाले असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

****

चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी शास्त्रज्ञांची कामगिरी आणि पंतप्रधान मोदी यांचं योगदान  महत्त्वपूर्ण असल्याचं असं मत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, त्यात भारतीय रिपब्लीकन पक्षाला स्थान मिळावं, अशी मागणी आठवले यांनी केली. आगामी निवडणुका शिवसेना भाजप युतीसोबतच लढवणार असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

****

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील काही रेल्वेगाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड ते इरोड एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी २९ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोंबर रोजी, तर इरोड ते नांदेड एक्स्प्रेस १ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर या २ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस उद्या २५ तारखेला तसंच येत्या २ आणि ९ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

****

No comments: