Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 September
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर
२०२३ सायंकाळी ६.१०
****
·
मानवाधिकारांचं सर्वार्थाने
पालन करणं ही आंतरराष्ट्रीय समुदायाची नैतिक जबाबदारी - आशिया प्रशांत मानवाधिकार मंचाच्या
परिषदेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
·
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर
चर्चेला सुरूवात.
·
दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल
योजना राबवण्याची आमदार बच्चू कडू यांची मागणी.
आणि
·
दीड दिवसांच्या गणपतींचं आज
विसर्जन; उद्या ज्येष्ठा-कनिष्ठा
गौरींच्या स्वागतासाठी महिलावर्गाची लगबग.
****
संहिताबद्ध कायद्यापेक्षा मानवाधिकारांचं सर्वार्थानं पालन करणं ही आंतरराष्ट्रीय समुदायाची नैतिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज दिल्लीत आशिया प्रशांत मानवाधिकार मंचाच्या
वार्षिक साधारण सभा आणि द्वैवार्षिक परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं,
त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संविधानानं सुरुवातीपासूनचं स्त्री-पुरुष
समानतेसाठी तसंच नागरिकांच्या आयुष्य आणि सन्मानाच्या रक्षणासाठी आमूलाग्र बदल केले
असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. गेल्या काही वर्षात सरकारनं नागरिकांना घरं,
शौचालयं, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांसारख्या
मूलभूत सुविधा देण्यासाठी अनेक योजनाही सुरु केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
संसदेतही महिलांच्या आरक्षणासाठी विधेयक मांडण्यात आलं आहे. हे आरक्षण स्त्री पुरुष
समानतेसाठी महत्त्वपूर्ण क्रांती ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या दोन दिवसीय परिषदेत मानवी हक्काबद्दलच्या जाहीरनाम्याची ७५ वर्षे तर
राष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि पॅरिस तत्त्वे यांची ३० वर्षपूर्ती साजरी केली जाणार
आहे. यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल याविषयी चर्चा होईल. तसंच राष्ट्रीय मानवाधिकार
आयोग व्यवसाय आणि मानवी हक्क याविषयी चर्चासत्र होणार आहे.
****
लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू झाली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम
मेघवाल यांनी चर्चेला प्रारंभ करताना, या विधेयकानुसार
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केलं जाईल.
लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १८१ जागा महिलांसाठी राखीव असतील. आरक्षणाची ही तरतूद १५
वर्षांसाठी असेल, यानंतर संसदेच्या परवानगीने त्यात वाढ करता
येणार असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं
काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याची
घोषणा करत या विधेयकाच्या माध्यमातून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची स्वप्नपूर्ती
होत असल्याचं सांगितलं. हे विधेयक तत्काळ अंमलात आणावं, मात्र यासोबतच जातनिहाय जनगणना करुन इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जातीच्या महिलांना
संधी द्यावी, अशी मागणी गांधी यांनी केली.
द्रविड मुनेत्र कळघमच्या कनिमोझी यांनी यावेळी बोलताना, या विधेयकाची १५ वर्षांची मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली. महिलांना समान
हक्क, समान संधी पाहिजे असल्याचं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणासोबतच मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण तसंच धनगर आरक्षणाच्या मुद्यांकडेही सदनाचं लक्ष वेधलं.
भाजपचे निशिकांत दुबे, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या गीता वांगा, संयुक्त जनता
दलाचे राजीव रंजन सिंग, बीजेडीच्या राजश्री मलिक यांनी या चर्चेत
सहभाग घेतला.
****
राज्यसभेत आज चांद्रयान तीन मोहिम आणि आदित्य एल वन या सौर मोहिमेची प्रशंसा करत
यामध्ये सहभागी असलेल्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं. पोस्ट ऑफिस विधेयक २०२३
वर देखील आज राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे.
****
'मेरी माटी मेरा देश' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
संकल्पनेतील कार्यक्रमास आज धुळे शहरातून उत्साहात सुरूवात झाली. यासाठी मान्यवरांच्या
उपस्थितीत आज भव्य अमृत कलशयात्रा काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या या
कार्यक्रमासाठी कलश असलेलं वाहन धुळे महापालिकेच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलं
असून हे वाहन शहरातल्या विविध भागांमध्ये फिरणार आहे. धुळे शहर वासियांनी या राष्ट्रीय
कार्यात सहभागी व्हावे असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र
अंपळकर यांनी केलं आहे.
****
दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अशी मागणी दिव्यांग कल्याण विभागाचे
अध्यक्ष आणि मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली आहे. ते आज सोलापूर
इथं 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. यासंदर्भात आपण
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्र घरकुल योजना राबवण्याची मागणी केल्याचं
कडू यांनी सांगितलं.
दरम्यान, शेतकऱ्यांनी नेहमीच सरकारकडे दुष्काळ जाहीर
करण्याची मागणी करण्यापेक्षा आपल्या पिकांचा उत्पादन खर्च कमी करावा असं आवाहन आमदार
कडू केलं आहे. सोलापूर इथं शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. याप्रसंगी
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे
यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सरकारनं शेतकऱ्यांच्या शेती मालाला रास्त भाव दिला
पाहिजे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात कंपन्याकडे जात आहे. शेतीचा उत्पादन
खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन करण्यात आलं. काल सकाळी घरोघरी स्थापन
झालेल्या गणेशाचं भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन केलं.
दरम्यान, महिलावर्गाची आता महालक्ष्मी सणासाठी लगबग सुरू
आहे. उद्या घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होईल. गौरींच्या स्थापनेसाठी आवश्यक
पूजा साहित्य, मखर, कपडे, अलंकार तसंच अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. गौरी पूजनासाठी
निरनिराळी फळं, भाज्या, तसंच फुलांच्या
बाजारपेठाही सजल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शाळांसाठी स्मार्ट गुरु ॲप कार्यान्वित केलं आहे.
या माध्यमातून ऑनलाईन हजेरी सोबतच शाळांची सर्वंकष माहिती, शिक्षक प्रोफाइल, शाळांची प्रतवारी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता त्यांच्या प्रगतीची माहिती, शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधा आणि आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधांबाबत माहिती
मिळणार आहे.
****
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे आणि बांगलादेश स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण
होत आहेत यानिमित्ताने कोलकाता ते नौआखाली गांधी आश्रम अशी काढली जात आहे. अहमदनगर
इथल्या स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आयोजित ही यात्रा १४
सप्टेंबर रोजी कोलकाता इथून निघेल आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंती रोजी नौआखालीच्या गांधी
आश्रमात पोहोचेल. या यात्रेत १३० जणांचा सहभाग असून, अंबाजोगाई
इथले सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक दगडू लोमटे यांचाही यामध्ये समावेश आहे.
****
लातूर शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या सुमारे नऊशे झाली आहे. या पार्श्वभूमीवर
महापालिकेनं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी पाणीसाठे झाकून
ठेवावेत, अंगणात पाणी साचून राहू देऊ नये, घराची दारे तसंच खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात आणि ताप आल्यास,
अंगावर न काढता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
अशा सूचना महापालिकेनं केल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात हिंगणगावातील गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या
माफियांवर कारवाई करत पोलिसांनी दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केला. काल सायंकाळी पोलीस
अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय गणेश मुंडे यांनी हि कारवाई
केली. या कारवाईत ६ ट्रॅक्टर, ७ केन्या, चार दुचाकी आणि २५० ते ३०० ब्रास वाळू साठा जप्त केला.
****
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी संघटनेनं आज विविध कारणांसाठी लिलाव बंद आंदोलन
सुरू केले असून त्यामुळे जिल्ह्यातल्या १७ बाजार समित्यांमध्ये
आज कांदा लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नाही. केंद्र शासनाने निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने नाफेड
आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू केली. हा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकला
जात असल्यामुळे, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला कमी
भाव मिळत असल्याचं सांगत, व्यापाऱ्यांनी आजपासून लिलाव बंद आंदोलन
सुरू केलं आहे, नाशिक जिल्हा कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी
ही माहिती दिली.
****
सातारा जिल्ह्यात मांढरदेव इथल्या काळेश्वरी देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे
काम केलं जाणार असल्याने उद्यापासून येत्या २८ सप्टेंबर पर्यंत
मंदिराचा गाभारा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना
दर्शन घेता यावं यासाठी देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी
सहकार्य करण्याचं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment